मंगळवार, २६ जुलै, २०११

भेसळीचे बीज

-----------------------------------------------------------
१) भेसळीचे बीज
--------------------------------------------------------------
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥
नये पाहों कांहीं गोर्‍हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥
-------------------------------------------------------------
आजकाल जेव्हा आपण काही शेतकर्‍यांच्या व्यथा पाहतो तेव्हा भेसळीच्या बियाणांपायी त्यांना किती नुकसान होते त्याचा भीषणपणा आपल्यासमोर उभा राहतो. आधी शेताची मशागत करावी, बैल अथवा ट्रॅक्टरने नांगरणी करावी, योग्य ती खते द्यावीत व पावसाची प्रतिक्षा करावी, पाऊस झाल्यावर चांगली बियाणे घेऊन पेरणी करावी, उगवलेल्या पिकाचे संवर्धन करावे त्याची राखण करावी हे सगळे खटाटोप करीत असताना बियाणेच जर भेसळीचे असेल तर सर्व श्रमच वाया जातात. पीक चांगले येत नाही. शेतकर्‍यांच्या ह्या सर्व कष्टाच्या वाया जाण्यामागे केवळ भेसळीचे बियाणे हेच असते. अशावेळी ह्या भेसळीमागे जे लोक आहेत त्यांची निर्भत्सना करावी तेव्हढी कमीच पडेल.
तुकाराम महाराजांनी नेमके हेच हेरून जे बियाणात भेसळ करतात त्यांची यथेच्छ कान-उघाडणी व छीथू केली आहे. हे लोक किती नीच असतात असे दाखविताना ते त्यांना विष्ठा भक्षण करणारे असेही म्हणतात. असल्या ओंगळ माणसांचे मित्रही ओंगळच असतात असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा बियाणाची भेसळ करणारे शेतकरी, अधिकारी, व्यापारी ह्यांची जी चांडाळ चौकडी असते त्यालाच तुकाराम महाराज दूषणे देत आहेत हे सहजी ध्यानात यावे. ह्यांची छी:थू करताना मग तुकाराम महाराज त्यांच्या ह्या कुकर्माची तुलना हागणदारीशी करतात व त्याचा अंत जसा चांगल्या लोकांनी पाहू नये असा सल्ला देतात तसेच असल्या दुर्जनांचे संग, संत व चांगल्या मंडळींनी धरू नये असेही बजाऊन सांगतात. भेसळीच्या बियाणाला अस्सल बियाणासारखे गुण नसतात तर अमंगळ असेच अवगुण असतात. असल्या भेसळीच्या बियाणाकडे नुसते पाहणेही म्हणजे शीण आणणारे आहे. असल्या भेसळ करणार्‍यांकडे "आपली छी:थू" हेच भांडवल असल्याने त्याचा काही फायदा होईल, अशी सुतराम शक्यता नसते.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी", हे शुद्ध बियाणाची महती सांगणारे वचन सगळयांनाच माहीत असते. पण भेसळीच्या बियाणाचा धि:कार करणे हे ज्यास्त महत्वाचे आहे, हे पटून तुकाराम महाराज भेसळीची निर्भत्सना करतात. ती फारच अगत्याची आहे. कारण ह्याच भेसळीच्या बियाणापायी शेतकरी उध्वस्त होतो व मग त्याला जगवणे अवघड जाते. शेतकर्‍यांशी संबंधित असणार्‍या सगळ्या व्यक्तींनी, संस्थांनी, सरकारी अधिकार्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ह्या वचनाप्रमाणे भेसळीविरुद्ध मोहीमच काढावी इतका महत्वाचा हा अभंग आहे.

-----------------------------------------------------------------------------

सोमवार, ११ जुलै, २०११

तुकारामाच्या गजला --3


तुकारामाच्या गजला---३

६) तोवरी तोवरी शोभतील गारा
तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा:
तोवरी तोवरी शोभतील गारा । जंव नाही हिरा प्रकाशला ॥
तोवरी तोवरी शोभती दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥
तोवरी तोवरी सांगती संताचिया गोष्टी । जंव नाही भेटी तुक्यासवे ॥
तोवरी तोवरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिले नाही ॥
तोवरी तोवरी सिंधु करी गर्जना । जंव त्या अगस्तिब्राह्मणा देखिले नाही ॥
तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही ॥
तोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥
तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे । जंव तुक्याचे दर्शन जाले नाही ॥
आता मिर्झा ग़ालिबची ही रचना पहा :
दाम हर-मौज में है हल्क़ा-ए-सदकामें-नहंग
देखें क्या ग़ुजरे है क़तरे पे गुहर होने तक
आ़शिकी सब्र-तलब और तमन्ना बेताब
दिल का क्या रंग करूं ख़ूने-जिगर होने तक
हमने माना कि तग़ाफुल न करोगे, लेकिन
ख़ाक हो जाएंगे हम तुमको ख़बर होने तक
परतवे-ख़ुर से है शबनम को फ़ना की तालीम
मैं भी हूं एक इनायत की नज़र होने तक
यक-नज़र बेश नही, फ़ुर्सते-हस्ती ग़ाफ़िल
गर्मी-ए-बज़्म है इक रक़्से-शरीर होने तक
ग़मे हस्ती का "असद" किससे हो जुज़ मर्ग इलाज
शम्‌अ़ हर रंग में जलती है सर होने तक
तोवरी तोवरी व होने तक ह्या शब्दांवर सगळी रचना गुंफणे पाहिले की तुकारामाची ही ग़झलच वाटावी.
८) इतुलें करीं देवा ऐकें हें वचन
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥२॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥३॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥
वरील अभंगात तुकाराम महाराजांचे जे मागणे आहे, ते "सगळे संपूर्ण नाही तरी इतके तरी दे " अशा वळणाचे आहे. हेच मागणे ग़ालिबनेही "तो दे " अशा ढंगाने खालील ग़जलेत मांडले आहे. शिवाय दोघांचे मागणे देवाकडेच आहे. फक्त गा़लिब दारू पीत असल्याने त्याने "प्याला गर नही देता, न दे, शराब तो दे" हे म्हणणे तुकाराम महाराजांना लागू होत नाही :
वो आके ख्वाब में तस्कीने-इज़्तिराब तो दे
वले मुझे तपिशे-दिल मजाले-ख़्वाब तो दे
करे है क़त्ल लगावट में तेरा रो देना
तेरी तरह कोई तेगे-निगह की आब तो दे
दिखाके जुम्बिश-लब ही तमाम तर हमको
न दे तो बोसा, तो मुंह से कहीं जवाब तो दे
पिला दे ओक से साक़ी, जो हमसे नफरत है
प्याला गर नहीं देता, न दे, शराब तो दे
"असद" ख़ुशी से मेरे हाथ-पांव फूल गये
कहा जो उसने, जरा मेरे पांव दबा तो दे
९) बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी
साधारण चारशे वर्षांपूर्वी गझल निर्माण झाली असे म्हणतात. त्याच काळात तुकाराम महाराज होते. गझलेत जसे भोगलेल्या दु:खाचे कढ असतात तसेच तुकारामांच्या अभंगात ओढगस्तीच्या संसाराचे चटके असतात. सूफी गझलेत जसे देवाच्या शरणावस्थेतली झिंग असते तसेच तुकारामांच्या अभंगात भक्ती रसाचा लोट असतो. गझलेत जसे वृत्ताची अट असते तशीच अभंगात दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमकाची अट असते. ( तुलना करण्यासाठी समजा आपण अभंगातला चौथा चरण अलीकडे घेतला तर अभंग हे वृत्त यमकाचे होऊन गझलेच्या जवळ जाते. जसे खालच्या अभंगातला पहिला शेर जर असा लिहिला : बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी । आली रसा बहुत या गोडी ॥ तर साक्षात गझलच्याच वळणाचा होतो.). गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र असतो तसेच सर्व गझलेत एक सूत्र गुंफलेले असते. ह्या अभंगातही तसेच दिसते. शिवाय गझलेत एखाद्या शब्दाचा नाद घेऊन त्याभोवती रचना फेर धरते, तसेच ह्या अभंगात "बहु" ह्या शब्दाभोवती सगळी रचना उभारते.
बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥
बहु सोसें सेवन केले बहुवस । बहु झाला दिस गोमटयाचा ॥
बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥
बहु तुका झाला बहु निकट वृत्ति । बहु काकुलती येऊनिया॥
तुकाराम महाराजांच्या "बहु" या शब्दाच्या भोवती रुंजी घालण्यावरून ग़ालिबचा एक प्रसिद्ध शेर आठवतो. तो असा :
हजारों ख्वाहिशें ऐसी, कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले
इथे "बहु निकट वृत्ती " ह्या ग़ालिबच्या ख्वाहिशे व अरमान सारख्याच भासतात. बहु म्हणजे पुष्कळ. तुमची स्तुती करण्याची आवड असल्यामुळे तुम्हाला पुष्कळ नावे ठेविली आहेत. त्या योगाने भक्तिरसाला पुष्कळ गोडी आली आहे. मी त्या नांवांचे फार सोसाने पुष्कळ दिवस सेवन केले. त्या योगाने पुष्कळ चांगले दिवस उदयास आले आहेत. देव हा पुष्कळांना पुरून पुष्कळांकरितां उरला आहे व पुष्कळ वेष घेऊन त्याने पुष्कळांचा उद्धार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपली वृत्ती त्याच्या ठिकाणी पुष्कळ काकुळतीस येऊन प्रकट केली ( देवाच्या पुष्कळ जवळ ऐक्यरूपाने राहणारा झालो आहे,) अशा अर्थाचा हा अभंग आहे. ह्या पुष्कळाच्या भोवती जसा हा अभंग क्रीडा करतो तशीच "पुष्कळ" ह्या शब्दाभोवती रम्य चित्रण करणारे दुसरे एक कवी आहेत पु.शि.रेगे. त्यांची पुष्कळा नावाची एका प्रेयसीला उद्देशून केलेली ही गझलेच्या अंगाची कविता पहा:
पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन ;
पुष्कळातली पुष्कळ तू
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी.
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे ,
देताना पुष-पुष्कळ ओठ ;
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ ऊर,
पुष्कळाच तू, पुष्क-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी.
"बहुतां पुरला, बहुतां उरला" हे तर साक्षात सर्वोदयाचे ( सगळ्यात ज्यास्त जणांचे सगळ्यात ज्यास्त भले ) तत्व झाले. ते असे चपखलपणे विठठलासाठी वापरले आहे.
१०) पावलों पंढरी वैकुंठभवन
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥
"धन्य आजि दिन सोनियाचा" असे वाटायला लावणारे मिळणे ही फारच समाधानाची परमोच्च भावना आहे. तुकाराम महाराज तीच वर दाखवीत आहेत. ह्यात "पावलों" हा नाद अगदी ग़जलेच्या वळणाचा आहे. ह्याच वळणाची ग़ालिबची "पाया" ह्या शब्दाभोवती घुटमळणारी एक ग़जल आहे.
मिर्झा ग़ालिबची रचना पहा:
कहते हो, न देंगे हम, दिल अगर पडा पाया
दिल कहां कि गुम कीजे ? हमने मुद्दआ़ पाया
इश्क़ से तबीयत ने जिस्त का मज़ा पाया
दर्द की दवा पाई, दर्द बे-दवा पाया
दोस्त दारे-दुश्मन है, एतमादे-दिल मालूम
आह बेअसर देखी, नाला नारसा पाया
सादगी व पुरकारी, बेखुदी व हुशियारी
हुस्न को तग़ाफुल में जुरअत-आ़ज़मा पाया
गुंन्चा फिर लगा खिलने, आज हमने अपना दिल
खूं किया हुआ देखा, गुम किया हुवा पाया
हाले-दिल नहीं मालूम, लेकिन इस क़दर...यानी
हमने बारहा ढूंढा, तुमने बारहा पाया
शोर पन्दे-नासेह ने ज़ख्म पर नमक छिडका
आपसे कोई पूछे, तुमने क्या मजा पाया
११) ग़जलच्या वळणाच्या इतर काही रचना:
गजल-सम्राट कवी सुरेश भट ग़जलासंबंधी म्हणतात की ग़झलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग हे एक प्रकारच्या कळवळ्यातून आलेले असल्याने ते ग़झलेच्याच जातीचे आहेत असे दिसेल. तसेच ते कमीत कमी शब्दात ज्यास्तीत ज्यास्त सांगणारे असल्याने ग़झलच्या स्वभावाचे आहेत. ग़झलेतला शेर जणू आपण बोलत आहोत असा सहजी असावा असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा ते तुकारामाच्या रचनांसंबंधीच बोलत असावेत इतक्या तुकारामाच्या रचना लोकांशी संवाद साधणार्‍या आहेत. त्या इतकी वर्षे टिकून आहेत त्याचे रहस्यही तेच असावे. सुरेश भटांचे एक वचन आहे की काही वर्षांपुरता बोभाटा म्हणजे शाश्वत कीर्ती नव्हे, लिहिणार्‍याने स्वत:वर सतत जागता पहारा ठेवावा. हे वचन जणू काही तुकारामांना उद्देशूनच आहे इतके ते तुकारामांना लागू पडते. भट असेही म्हणतात की कोणत्याही कवीचा अखेरचा फैसला पाच-दहा वर्षात होत नसतो. साडे-तीनशे वर्षे टिकलेल्या तुकारामाच्या काव्याला हे तर फारच चपखल बसते. ग़झलेसंबंधी सुरेश भटांच्या व इतरांच्या अपेक्षा पुर्‍या करणारे तुकाराम महाराजांचे वरील अभंग व खालील रचना, छे, ग़झला, ह्या कसोटीला पुरेपूर उतरतात असे कोणालाही पहिल्याच वाचनानंतर प्रतीत होईल.
काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥
काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥
काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥
काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥
काय बा करीसी दंभलौकिकातें । हित नाहीं मातें तुका म्हणे ॥४॥
----------------
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥
देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥
देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥
देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥४॥
पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥
-------------------------
लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यापें ॥
लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥
लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्याचे ॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥
लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥
-------------------------------------------------------------------------
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥
लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥
लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥
----------------------------------------------
शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

( १८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई: ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२ )