सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

तुकाराम महाराजांचे आर्तभूत यमक


तुकाराम महाराजांचे आर्तभूत यमक
फक्त शेवटचे एकच अक्षर जुळवलेल्या यमकाला इंग्रजीत पुल्लिंगी यमक म्हणतात व दोन व ज्यास्त अक्षरे जुळवलेल्या यमकाला स्त्रीलिंगी यमक म्हणतात, असे मार्जोरी बोल्टन ही तिच्या "द ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री", ह्या पुस्तकात दाखवते खरी, पण प्रत्यक्षात बहुतेक यमके एकच अक्षर जुळवलेली असतात. ( पुरुष, स्त्री यमके असा भेद करण्यामागे लिंग-सादृष्यता असावी ! ) . बर्‍याच वेळा आपला समज होतो की यमके ही यांत्रिकतेने, शेवटचे अक्षर तेच ठेवायचे व अगोदरचे क,ख,ग,...असे क्रमाने बदलत करतात व हे "काम" बरेच सोपे असावे. पण लक्षात घ्या, इंग्रजीत "ऑरेंज" ( Orange ) ह्या शब्दाला अजूनही यमक साधणारा शब्द मिळालेला नाही. आणि ही नुकताच दहा लाखावा शब्द डिक्शनरीत नमूद करणार्‍या भाषेची परिस्थिती, तर केवळ ६०/६५ हजार शब्द असणार्‍या मराठीत यमकांची हालत कठीणच ! उदाहरण म्हणून व आपलीच परीक्षा घेण्यासाठी एक शब्द घेऊ : "आर्त". ज्ञानेश्वरांनी "विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले" ह्या अभंगातून म्हटलेला हा शब्द : आर्त. शिवाय आपण म्हणतो की तुकाराम महाराजांनी आपल्या सबंध काव्यात भक्तीची जी "आर्तता" दाखविली आहे ते वर्णन करणारा हा शब्द : आर्त. आता शेवटचा "र्त" कायम ठेवीत अगोदरचा "आ" क्रमाक्रमाने क,ख,ग,घ,....असा बदलत बघा काय शब्द मिळतात ते ! मला बर्‍याच प्रयत्नांती मिळाले : कीर्त ; तूर्त ; अमूर्त ; यथार्त ; शर्त ; ....बस्स. आता तुकाराम महाराजांनी ह्या "आर्त"शी कोणती यमके जुळविलीत ती पहा : पदार्थ ; समर्थ ; सर्वत्र ; मात्र ; आर्त ; आर्तभूत ; पात्र ; गीत ; त्वरित ; मात. एक दोन अभंग पहा ज्यात हे शब्द आर्तशी यमक म्हणून जुळवलेले आहेत . जसे : "पुरवी मनोरथ । अंतरीचे आर्त । धायेवरि गीत । गाईं तुझे ॥" ( ३८८८, देहू प्रत ) . "तुका म्हणे ऐसे । अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित । नारायणा ॥" ( ३८९६, देहू प्रत ) . आर्त हा शब्द यमक जुळवायला असा कठिण जातोय हे पाहून मग एखाद्या हुशार संपादकासारखे तुकाराम महाराज आर्त अशा ठिकाणी दुसर्‍या शब्दाने जोडुन घेतात की तिथे मग तिथे दुसर्‍या जोडलेल्या शब्दाला यमक जुळवावे लागते, आर्तला नाही. जसे: "नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटीं ॥ "( १६५३ देहू प्रत ); किंवा "आर्तभूत माझा । जीव जयांसाठी । त्यांच्या जाल्या भेटी । पायांसवे ॥"( १९५८, देहू प्रत ). तर यमक जुळवणे हे काही तसे यांत्रिक काम नाही. प्रतिभेची परिक्षा घेणारेच ते असते !

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

तुकाराम महाराजांच्या भेंड्या

तुकाराम महाराजांच्या भेंड्या
-----------------------------------
अंताक्षरी किंवा भेंडया ह्या खेळात शेवटच्या अक्षरापासून आपण वेगळे गाणे म्हणतो. हा एक प्रकारचा यमकाचाच खेळ आहे. एकाखडी किंवा बाळक्रीडेचे अभंग ह्यात शेवटी जे अक्षर येते त्याच अक्षरापासून पुढचा अभंग सुरू करतात, तुकाराम महाराज. वानगीदाखल पहा : "कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥"( ४४९४ देहू प्रत ). आणि ह्या पुढचा अभंग ( ४४९५, देहू प्रत) असा सुरू होतो: "जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥ ". असल्या रचनेत क्रीडेचा भास होतो.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

यमकांचा बाप : तुकान्त

ई-तुका
-----------------------
यमकांचा बाप, तुकान्त !
----------------------------------
२५ हजारापेक्षा ज्यास्त असणार्‍या यमक-जोड्या तुकाराम गाथेत एरव्ही वाचत शोधणे हे फारच जिकीरीचे काम . पण संगणकाची मदत घेऊन पाहिजे त्या शब्दांच्या यमकांना सहजासहजी शोधता येते. "हरी"ला जुळणारी यमके आपण वर पाहिलीच. भक्तीमार्गातले इतर काही कळीचे शब्द पाहिले तर असे आढळले की, "नारायण"ला जुळणारी १५० यमके आहेत ज्यापैकी वानगीदाखल ही पहा वैशिष्टयपूर्ण असणारी अशी आहेत : अभिमान, मेदिनी, जनार्दन, धणी, खाणी, वेदवाणी, समचरणी, पाळण, स्वगुण, वदन, वगैरे. "वाणी" ह्या शब्दाला जुळणारी ७५ यमके आढळली ज्यातली ही वानगीदाखल पहा : घाणी, कारणी, गणी, व्यभिचारिणी, शिरोमणी, आणी, प्राणी, छळणी, कडसणी,अंत:करणी वगैरे. "पांडुरंग" ह्या दैवताला जुळणारी यमके आढळली ७५, ज्यातली ही उदाहरणार्थ पहा : अंग, रंग, संग, चांग, पटंगा, तरंग, लिंग, मृदंग, पांग, भंगा वगैरे. "कीर्तन" ह्या शब्दाला जुळणारी यमके आढळली ६०, "ध्यान"ला जुळणारी ४०, व सर्वात ज्यास्त ( ५०० ) यमके आढळली "मन"ला जुळणारी. संत रामदासांनी "मनाचे श्लोक" करून "मनाचा" जो मरातब वाढवला व कदाचित भक्तिमार्गात त्याच "मन" ची महानता ओळखून तुकाराम महाराजांनी "मन"ला जुळणारी इतकी प्रचंड यमके जुळविली असावीत. पैकी खास वाटणारी अशी : घाणा, राणा, जना, ध्यान, सपनी, इंधन, आंचवण, दर्शन, खंडण, जन, दहन, मौन्य, दुकान वगैरे.
    इतकी प्रचंड प्रमाणात यमके पाहिल्यावर कोणालाही सजज जाणवावे की तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे, प्रतिभेचे, खरे गमक आहे यमक ! यमकांच्या बाबतीत सहस्त्रावधी यमके अवतरवून यमकाचे जणु "बापपण"च तुकाराम महाराजांनी स्वत:कडे घेतले आहे. पटवर्धनांच्या "छंदोरचना" ह्या पुस्तकात एक मोठी यथार्थ नोंद आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की यमकाला गुजरातीत व हिंदी छंदरचनेत चक्क "तुकान्त" असा शब्द आहे !
--------------------------------------------------------------------

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

यमक जोड्या

भाषाशास्त्रात असे म्हणतात की आपण जे शब्द तयार करतो त्याने आपण केवळ भेद दाखवत असतो. म्हणजे जेव्हा आपण "गोड" हा शब्द योजतो तेव्हा तो "तिखट" ह्या शब्दापासून कसा वेगळा आहे हेच आपण दाखवत असतो. असे भेद दाखवणारे व विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपण एकत्र केले तर असे दिसते की विरुद्ध अर्थाचे शब्द हे नेहमी ( ७० टक्के ) त्या अर्थाच्या एका शब्दाला यमक योजून केलेले असते. उदाहरणार्थ आपण काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोडया प्रथम पाहू. त्या अशा आढळतील : १) अधोगती-प्रगती २) अनाथ-सनाथ ३) अपेक्षित-अनपेक्षित ४) अब्रू-बेअब्रू ५) आघाडी-पिछाडी ६) आदर-अनादर ७) आवक-जावक ८) आशा-निराशा ९) आस्तिक-नास्तिक १०) इमान-बेइमान ११) इलाज-नाइलाज १२) इष्ट-अनिष्ट १३) इहलोक-परलोक १४) उत्तीर्ण-अनुत्तीर्ण १५) उन्नती-अवनती १६) उचित-अनुचित १७) उच्चा-नीच १८) उत्कर्ष-अपकर्ष १९) एकमत-दुमत २०) कडू-गोड २१) कृतज्ञ-कृतघ्न २२) कृपा-अवकृपा २३) खंडन-मंडन २४) चल-अचल २५) जहाल-मवाळ २६) तारक-मारक २७) दुष्ट-सुष्ट २८) नि:शस्त्र-सशस्त्र २९) प्रसरण-आकुंचन ३०) प्राचीन-अर्वाचीन ३१) पुरोगामी-प्रतिगामी ३२) भरती-ओहोटी ३३) माजी-आजी ३४) माहेर-सासर ३५) राजमार्ग-आडमार्ग ३६) वंद्य-निंद्य ३७) विधायक-विध्वंसक ३८) विसंवाद-सुसंवाद ३९) वैयक्तिक-सामूहिक ४०) शुद्धपक्ष-वद्यपक्ष ४१) सगुण-निर्गुण ४२) सजातीय-विजातीय ४३) समता-विषमता ४४) सावध-बेसावध ४५) स्वकीय-परकीय ४६) स्वार्थ-परमार्थ ४७) साधार-निराधार ४८) साक्षर-निरक्षर ४९) सुकाळ-दुष्काळ ५०) सुचिन्ह-दु:श्चिन्ह ५१) सुपीक-नापीक ५२) सुरस-नीरस ५३) सुलक्षणी-दुर्लक्षणी ५४) सुसंगत-विसंगत ५५) सुर-असुर ५६) सुज्ञ-अज्ञ ५७) सोय-गैरसोय ५८) स्वतंत्र-परतंत्र ५९) स्वदेशी-विदेशी ६०) स्वस्ताई-महागाई ६१) स्वस्थ-अस्वस्थ ६२) होकार-नकार ६३) ज्ञानी-अज्ञानी ६४) ज्ञात-अज्ञात ....वगैरे.आपण नेहमी जे विरुद्ध अर्थाचे शब्द करतो त्यांची तुम्ही जंत्री केलीत तर तुम्हाला हमखास आढळेल की बहुतेक जोड्या ह्या यमकानेच होतात. "ऍन ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या मार्जोरी बोल्टन ह्यांच्या ग्रंथात आपण पाहिलेच आहे की यमकाने दोन अक्षरांच्या साम्यामुळे एक प्रकारचा समीपपणा येतो. तसेच इथे आपण पहात आहोत की यमकामुळे विरुद्ध अर्थाची दोन टोके वाटतील असे शब्द तयार होतात. आता कवीकल्पनेत व अध्यात्मात अनेक वेळा दोन टोकांच्या कल्पना सांगाव्या लागतात. त्यामुले यमके वापरून शब्द केले तर ते किती सहजतेने जमते हे आपल्या संतांना माहीत होते असे दिसते. कारण तुकाराम महाराजांनी अशा दोन विरुद्ध टोकाच्या कल्पना सांगण्यासाठी यमके वापरली आहेत हे सोदाहरण दिसते. पहा : १) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ ( सुख व दु:ख ह्या विरोधी कल्पना व जवापाडे-पर्वताएवढे हे यमक) २) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ ३) मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥  ४) ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥  ५) तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥  ६) विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥.