सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

भक्त : अडचणीचे कोपरे ——————————— तुकाराम महाराजांचे अभंग मोठे मनोज्ञ व सार्वकालिक असतात. ते फक्त त्यांच्या काळातच लागू होत होते असे नसून ते सर्व काळात लागू पडतात असे जाणवते. भक्तांसंबंधी एका अभंगात निरूपण करतांना ते भक्तांना “ अडचणीचे कोपरे “ म्हणतात. काय अफलातून विचार आहे ! नाही तरी , आजकाल आपण पाहतो की भक्त हे कोपऱ्या कोपऱ्याने तिष्ठत असतात व अडचण करून असतात. भक्तांच्या दाटीने गुरूला जी अडचण होते ती मोठ्या मार्मिकतेने “ अडचण “ हा शब्द ध्वनित करतो. अडचण ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिली तर अंतर + चण् अशी देतात व चण हे stature / frame ह्या अर्थाने असते. फ्रेमला जसे चार कोन किंवा कोपरे असतात तसे भक्त म्हणजे गुरू/ परमेश्वराचे चार कोपरेच जणु. परत हे चार कोपरे चपखल ह्यासाठी की भक्तांचे जे चार प्रकार सांगितले आहेत ( आर्त ( रंजलेला-गांजलेला), अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी ) त्या चार कोनांवर हा अभंग उभा ठाकलेला आहे. अभंग : तुझ्या रूपे माझी काया । भरों द्यावी पंढरीराया । दर्पणीची छाया । एका रूपें भिन्नत्वें ।। सुख पडिलें सांठवणे । सत्ता वेंचें शनें शनें । ( शनै शनै ) अडचणीचे कोन । चारी मार्ग उगवले ।। वसो डोळ्यांची बाहुली । कवळें भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली । नव्हे परती माघारी ।। जीव ठसावला शिवें । मना आले तेथें जावे । फांटा पडिला नांवें । तुका म्हणे खंडले ।। ( जोग प्रत- अर्थ : हे पंढरीराया , तुझ्या स्वरूपाने माझे ह्रदय भरून जाऊ दे. आरशामध्ये बिंबाची छाया जरी दिसली तरी तो भेद एकरूपानेच आहे. तुझ्या ऐक्याचे सुख संचयास शिलकी पडले आहे. हळुहळु तुझ्या सत्तेने त्याचा वेंच होत आहे. अडचणीचे कोपरे ( भक्तांचे चार प्रकार : आर्त , जिज्ञासु , अर्थार्थी, ज्ञानी ) नाहीसे केले. डोळ्यातील बाहुली असूनही काविळीचे दोषाने आरशातील प्रतिबिंब भिन्न, पिवळे भासते. कृष्णांजनाचे योगाने परत माघारी दृष्टी चाल घेत नाही. डोळ्यात कृष्णांजन घालताच ती पुन: भेद आणि पिवळेपणा पाहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जीवात शिवाचा बोध ठसला गेला. आता मनास जिकडे जावयाचे वाटेल तिकडे जावे. त्याला विधींचे बंधन राहात नाही. द्वैताला फाटा दिला जातो. आता त्याला फाटा फुटला हे म्हणणे नाहीसे झाले. ). परमेश्वराची भक्ति करताना रंजलेले-गांजलेले ( आर्त ) न होता , त्यावर अर्थार्जन न करता ( अर्थार्थी ) , त्याचे सर्वार्थाने शोध घेऊन ( जिज्ञासु ) , ज्ञानी व्हावे हाच श्रेष्ठ मार्ग भक्तीचा हेच खरे ! —————-

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

तुकारामाची खूण

तुकारामाची खूण ———————— उठता बसता तुकाराम वाचणे हे कंटाळा येणारे होऊ शकते. पण तुकाराम महाराज तसे होऊ देत नाहीत. ह्याचा पडताळा घ्यायचा तर “कंटाळा” ह्या विषयावरचा तुकाराम महाराजांचा हा एक अभंग पहा: ——- नाही कंटाळलो परि वाटे भय । करावे ते काय न कळता । जन वन आम्हा समानचि झाले । कामक्रोध केले पावटणी । षडउर्मी शत्रु जिंकिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या । मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावे ते । म्हणवुनि तुका अवलोकुनि पाय । वचनाची पाहे वास एका ।। ( ३३०२ जोग प्रत ) —— ( हे देवा मी कंटाळलो नाही, पण मला काय करावे हे न कळल्यामुळे भय वाटत आहे. जन-वन हे सर्व आम्हाला सारखे आहे. आम्ही कामक्रोधाच्या पायाखालील पायऱ्या केल्या आहेत. हे अनंता, तुझ्या नामचिंतनाच्या बलाने क्षुधा, तृषा, शोक,मोह,जरा,मरण हे सहा मनोविकार व काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर हे सहा शत्रू जिंकले. स्वामी जे करील ते शिरसावंद्य करावे, हाच आमचा सेवकांचा मुख्य धर्म होय. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मा आपल्या पायांकडे पाहून आपल्या मुखातून एखादा शब्द येण्याची वाट पाहात आहे. ). —— रोजच्या ठिकाणी राहून कंटाळा यावा व सुट्टीच्या ठिकाणी जावे हे आता इतक्या वेळेला झालेय की जन-वन आम्हा समानचि झाले. हा आपला नित्याचा अनुभव झाला आहे. जरा म्हणजे म्हातारे होणे व मरणे म्हणजे जगणे सोडणे हे क्षुधा, तृषा, शोक व मोह ह्या मनोविकाराबरोबर जोडलेले पाहून हे त्तवविचार खोलात जाऊन पाहणे मोठे मनोहारी होईल. देवाने सेवकाला आज्ञा द्यावी व ती त्यांनी शिरसावंद्य मानावी म्हणून देवाच्या वचनाची वाट पाहणाऱ्या सेवकाची जाणीव वर्णन करताना जोग महाराजांनी तुकाराम महाराजांच्या मूळ “वास” ह्या शब्दाचा “वाट” असा अर्थ काढलेला असला , तरी “जन-वन” असा काव्यमय शब्द योजणाऱ्या तुकाराम महाराजांचे कवित्व ह्या अभंगात नक्कीच बहरून आले असावे व त्यांनी “ वाट” हा रुळलेला शब्द न योजता “वास” वापरले असावे. “वास” ह्याचा एक अर्थ “खूण” असा आहे. वास म्हणजे “ गंध” ह्या अर्थानेच ताडलेला खूण हा अर्थ आहे. नुकत्याच कोव्हिड झालेल्यांना हे पटेल की जेव्हा त्यांचे वास येणे गेले तेव्हाच कोव्हिड झाल्याची “ खूण” पक्की झाली होती. असेच देवाचे पाय पाहून काही करण्याबरोबर एखादी वचनाची “खूण” पटण्याची वाट पाहाणे हे सेवकाच्या जास्त भरवशाचे आहे. म्हणून कविराज तुकाराम महाराज वाट पाहण्याचा कंटाळा न करता “ वचनाची एका वास पाहे “ असे म्हणत आहेत. आणि हीच तुकारामाची खूण आहे. —————

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

 कळसाची विराणी !

“आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें || रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी || नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ||

( पहिला देहाकार जो नवरा त्याच्या संगतीने कामना ( सुखाची इच्छा ) पूर्ण होत नाही, म्हणून त्याचा त्याग करून श्रीहरीशी व्यभिचार ( आश्रय ) केला. रात्रंदिवस तो माझ्या जवळ पाहिजे ; त्याचेखेरीज मला एक क्षणदेखील करमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे नाव व हकीगत ह्यांचा तुम्ही आता सम्बन्ध सोडून द्या. मी अनंताच्या ठिकाणी रत झाले आहे. ---अर्थ जोग प्रतीमधून ). 

------------------  

संत मंडळींचे मोठे गंमतीचे असते. त्यांना ऐहिक भावनांचे काही सोयरसुतक नसते. त्या भावना त्यांना चांगल्याच माहीत असतात पण ते त्या पल्याड गेलेले असतात. त्यांना सुख काय अन् दु:ख काय, असेच विरह काय अन् व्यभिचार काय ? ह्याच बेदरकारीतून संतशिरोमणी तुकाराम महाराज विराणी लिहितात, व्यभिचाराच्या रूपकातून. आणि पारंपारिक व्यासंगी शिष्य त्याची नोंदणी करतात : “व्यभिचाराच्या रूपकाने केलेले अभंग: व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक : विराण्या ”.  

संस्कृतातले “विरह”चि व्युत्पत्ती बि + रह् काय किंवा फारसीतले “बिरह” काय दोन्हीकडे बढेजाव आहे तो “रह्” किंवा राहण्याचा. आणि हे काही नुसते शारीरिक राहणे नसून त्यात काही तरी वरच्या दर्जाच्या प्रेमाचे असणे गृहित आहे. म्हणजे “विरह” व्हायचा तर आधी दोघात खूप प्रेम असणे आवश्यक आहे. प्रियकर-प्रेयसी, आई-मूल, भाऊ-बहीण, अशा जोड्यात नुसते जुजबी प्रेम असले व मग ताटातूट झाली तर तो “विरह” गणल्या जात नाही. तर ह्यांच्यात कोटीचे प्रेम असले व मग त्यांच्यात शारीरिक ताटातूट झाली तरच तो “विरह” म्हणायचा . आता राहण्याच्या विरुद्ध जसे विरह तसे ह्या उदात्त प्रेमाविरुद्ध काय ? तर अनेकांशी प्रेम ? व्यभिचार ? आपले अस्तित्व आपल्याला खासम् खास वाटणारच पण त्याच्याविरुद्ध जसे आपले “नसणे” असते, तसेच अनेकांचे “असणे”, हेही असते. असेच प्रेम असून विरह-भावना ह्याच्या विरुद्ध अनेकांशी प्रेम/ व्यभिचार असणे ! आणि अशी भावना ही पारंपारिक विरहाच्या विराणीच्या तोडीची !

तुकाराम महाराज हे एक कळस तर विरहाच्या विराणीचा हा कळस. अशी ही कळसाची विराणी ! 

----------------------- 

अरुण अनंत भालेराव                                                                                               https://e-tuka.blogspot.in/

 विरह आहे म्हणून विरहिणी


---------------------------- 


विज्ञानात जसे कार्यकारण हे जसे महत्वाचे ( जसे पाण्याची वाफ होऊन ढग झाले, ते थंड झाले, त्याचा पाऊस आला ! ) तसेच ह्या विरहिणीत चांगल्या सगुणांची “लावणी” केल्याने सर्व चांगले होते, माझा “बापरखुमादेविवरु” सुद्धा हा माझ्या मानसीचा आहे म्हणून मला त्याची सय येते व मी जागी राहते, असे कार्यकारणभावाने सांगितले आहे. संपूर्ण विरहिणी अशी :


सुख शेजारी असतां कळी जाली वो पहातां | देठु फेडुनि सेवतां अरळ केले ||१|| अंगणीं कमळणी जळधरू वोले वरी | वाफा सिम्पल्यावरी वाळून जाये ||२|| मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी | सगुणाची लावणी लाउनि गेला ||३|| अंगणीं वोळला मोतें वरुषला | धन्य दिवसु जाला सोनियाचा ||४|| चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा | मोत्यांचा चारा राजहंसा ||५|| अंगणीं बापया तूं परसरे चांपया | असुवीं माचया भिनलया ||६|| वाट पाहे मी एकली मज मदन जाकळी | अवस्था धाकुली म्हणो नये ||७|| आता येईल म्हूण गेला वेळु कां लाविला | सेला जो भिनला मुक्ताफळा ||८|| बावन चंदनु मर्दिला अंगी वो चर्चिला | कोणे सदैवे वरपडा जाला वो माये ||९|| बापरखुमादेविवरु माझे मानसींचा होये | तयालागी सये मी जागी सुती ||१०|| 


एखाद्या वस्तूचे नाव मागे राहते व वस्तू गायब होते, तसे ह्या “सारणी” शब्दाचे आहे. पूर्वी आठ आण्यात मध्य रेल्वेचे टाईम टेबल मिळायचे. त्याला हिंदीत सारणी असे लिहिलेले असे . आता जशा गाण्याच्या भेंड्या ( अंताक्षरी ) खेळतात तशा तेव्हा गावांच्या नावाच्या भेंड्या खेळत असत व त्यात ही सारणी खूप कामी येई. आजकाल ही सारणी कुठे पहायला मिळत नाही . मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी || तर काय आहे ही “सारणी” ? पूर्वी शेतातल्या विहिरीवर मोटी असत. मोट म्हणजे चामड्याची एक मोठ्ठी पिशवी असे. ही विहिरीत खाली सोडत, त्याचे तोंड बंद करीत व बैलांच्या सहाय्याने ती वर ओढीत व पाणी सोडत कालव्या कालव्याने. बैलांना ओढायला सोपे जावे म्हणून एक उतार केलेला असे, विहिरीजवळ चढ व विहिरीपासून दूर उतार. ह्या उतरणीला “सारणी” म्हणत. मोटेचे तोंड उघडून जे पाणी पाटात पडे ते फेसाळे व मोत्यासारखे दिसे. म्हणून“मोतियाचे पाणी ”. आता सगळीकडे विहिरींना पंप आले आहेत त्यामुळे मोट, बैल, सारणी हे कसे कळावे व मोतियाचे पाणीही ? म्हणजे विरहिणीत अर्थ होतो की बैलांना ओढण्यासाठी जो उतार ( सारणी ) केला त्या सगुणाने मोटेचे पाणी मोत्यासारखे होऊन वाहते आहे.


असेच शेजारी सुख आहे म्हणून कळी होते आहे. देठ तसा जाड असतो पण तो मृदू ( अरळ ) करून सुखाने त्याची कळी होते आहे. अंगणातल्या पाण्यावर कमळ येते आहे पण तेच ते वाफा शिंपून लावले तर वाळून जाईल. पाऊस आला तो दिवस सोनियाचा होतो आहे. फुलांचा मध चोरणारा मधुकर ( मधमाशी/भृंग ) कमळाचा आसरा घेतो आहे. राजहंसाला मोत्याचा चारा मिळतो आहे. मी एकटी वाट पाहते आहे व मला ह्या पौगंडावस्थेत मदन जाळतो आहे. ह्या अवस्थेला कमी महत्वाचे ( धाकुली ) समजू नका. शेला हा मोत्यांनी भरला तेव्हाच सुंदर झाला. चंदन अंगाला चोळून कायमसाठी सुवासिक ( चंदनाने ग्रासलेला, वरपडा ) झालेला हा कोण झालाय माय ? हा बापरखुमादेविवरु माझ्या मनातला ( मानसींचा ) आहे म्हणून त्याच्या सयेने मी जागी राहते आहे.


विरह आहे म्हणून विरहिणी आहे !


----------------------

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

न वजे वाया, वाया न वजे

 तुकारामाची एक गज़ल 

—————————-

न वजे वायां काही ऐकता हरिकथा । आपण करिता वायां न वजे ।।

न वजे वायां काही देवळासी जाता । देवासी पूजितां वायां न वजे ।।

न वजे वायां काही केलिया तीर्थ  । अथवा कां व्रत  वायां न वजे ।।

 न वजे वायां काही झाले संतांचे दर्शन ।  शुद्व आचरण वायां न वजे ।।

तुका म्हणे भाव असतां नसतां  । सायास करिता वायां न वजे ।।

( जोग प्रतीतला अर्थ : श्रीहरीची कथा दुसऱ्याच्या मुखाने श्रवण केली, अथवा आपण केली तर ती काही वायां जाणार नाही. देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले अगर त्याचे पूजन केले कर ते काही वायां जाणार नाही. एखाद्या तीर्थयात्रेस जाणे अगर कोणतेही व्रत करणे , हे काही वायां जाणार नाही. संतांचे दर्शन घेतले असता वाया जाणार नाही ; अशा प्रकारची कोणत्याही चांगली आचरणे वायां जाणारी नव्हेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा कर्तव्यामध्ये भाव, श्रद्धा, असो अगर नसो, चांगल्या आचरणाचे श्रम केले असतां वायां जाणार नाहीत. )

न वजे वायां — —- — । — — —- वायां न वजे ।। हे शब्द व त्यांचा क्रम चारही ओळीत सारखा ठेवून एक अप्रतीम कुसर इथे दिसून येते. नेपोलियन बोनापार्ट ज्या एल्बाच्या लढाईत हरला त्याबद्दलचे एक त्याचे वाक्य फार प्रसिद्ध आहे: Able was I ere I saw Elba. ह्यातली अक्षरे पुढून मागे वा मागून पुढे वाचली तरी वाक्य तेच राहते. तशीच कुसर तुकाराम महाराज इथे करीत आहेत, तेच शब्द उलट सुलट वापरून. ह्याने नादमयता साधली जाते, जसे गजलेचे वृत्त देते. 

गजलेत एकाच कल्पनेला उलट सुलट करून, त्याच रूपकाला फिरवून शेर केलेला असतो व एक तत्व सांगितलेले असते. जसे: हजारों ख्वाइशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले. तसेच इथे चांगल्या आचरणाचे तत्व, फिरवून, सांगितलेय. जसे: हरिकथा आपण आपल्या मुखाने केली काय वा दुसऱ्याने केलेली ऐकली काय, ते आचरण चांगलेच होय. देवळात जाऊन देवांचें दर्शन केले काय किंवा घरच्या देवांची पूजा केली काय ते आचरण चांगलेच होय. 

एरव्ही हेच तुकाराम महाराज “भाव तेथे देव” म्हणणारे आहेत पण इथे चांगले आचरण वाखाणण्यासाठी ते भाव नसला तरी चालेल अशी मुभा देत आहेत. हे जमीनीवरचे संत असल्याचेच द्योतक आहे. 

———

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मरण पाषाण

 

 

मरण पाषाण

पूर्वी समाधी घेत, त्याचे वर्णन साधारण असे असायचे की एक बेसमेंट आहे; त्याला वर येण्याची वाट आहे; व वर एक आडवे दार आहे व समाधी घेणारा आतून त्या दारावर एक भला मोठा दगड ठेवतो. हळू हळू बेसमेंट मधली हवा श्वासागणिक कमी कमी होत जाते व श्वास बंद होत माणसाचा प्राण जातो. स्वतः घ्यायची ती हीच समाधी. आपसुक मरण यायच्या आधी आणलेले मरण. मरणाचे मरण.

हे दृश्य बघताना दगड व त्याचे आतून सरकवणे हे मोठे नाट्यमय दिसते. त्याला दगडाच्या सरकण्याचा आवाज पार्श्वसंगीत म्हणून दिला तर ते फारच प्रभावी दृश्य. हा दगड कशाचे प्रतीक आहे ? तर तुकाराम महाराज इथे हा दगड ज्ञानाचे प्रतीक आहे असे सांगत आहेत. कसले ज्ञान ? तर सुख दु:खे, हे भोग, हे देहाला होत आहेत व मी ह्या देहापासून वेगळा आहे हे ज्ञान. अशा यथार्थ ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला आणि देहादिकाला येणार्या मरणाला ह्याच यथार्थ ज्ञानाने मारले.

अद्वैत तत्वात जर देव सर्व व्यापून आहे तर मी वेगळा कुठे आहे ? आणि मग कशाची प्राप्ती करण्यासाठी मी अंगात बळ आणू ?

जर अंतरबाह्य केवळ तूच भरलेला आहेस तर आतून बाहेर काय काढू व बाहेरून आत काय आणू ?

कितीही वाद केला तरी तो कोरडाच राहतो. देहादिक प्रपंच हे मग स्वप्नवत वाटतात व त्याची पीड़ा कोणी घ्यावी ?

जगातले सगळे वाण सामान तुमच्या घरी आलेले आहेत. तुम्ही फक्त मजूराची रोख मजूरी द्यायची आहे.

मला काही लाभ किंवा हानी असे काही नाहीय. जो कोणी ह्या देहाचा धनी असेल तो आमच्या देहरुपी वाड्याचे रक्षण करील !

देवाक् काळजी !

--------------------

भोगावरी  म्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥1॥

विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥

काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2॥

केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची हे ॥3॥

वघेचि वाण आले तुम्हां घरा । मजरी मजुरा रोजकीर्दी ॥4॥

तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ||५||

-----------------------

 मुक्तीशी लग्न ?

———————


याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||

आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||

कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||

तुकाराम महाराज हे असे साधक होते की अगदी सामान्य माणसासारखे राहून संसारातली सुखदु:खे सोसून ते भक्तिमार्गात अत्युच्च पदाला पोचले होते. वारकरी जाहीरच करतात की “ तुका झालासे कळस ! “. 

आपण संसारात कसे सुरूवातीला काटकसर करीत, पैशाला पैशा जोडून बचत करतो व निवृत्त झाल्यावर आरामात राहण्याचे मनोरथ करतो तसेच ते इथे म्हणत आहेत की मी याचसाठी अट्टाहास केला होता की शेवटी सगळे आरामशीर गोड व्हावे. जे प्रयत्न केलेत त्याने निश्चित विसावा मिळणार आहे त्याची मला निचिंती आहे. तहान लागली की त्यामागे धावणे आता माझे खुंटले आहे. मी जे काही मार्ग वेचले व त्यामुळे जे मंगल गुण लाभले त्याचे मला खूप कौतुक वाटत आहे. जीवन मरणाच्या चक्रातून मोक्ष अथवा मुक्ती मिळते ती मला हमखास हक्काने मिळते आहे, जणु काही मी मुक्तीशी लग्न केलेय व मुक्ती ही माझी लग्नाची नवरीच आहे. लग्न झालेले नवीन जोडपे जसे चार दिवस खेळीमेळीने राहते तसे भक्तीमार्गातले मुक्तीबरोबरचे हे माझे खेळीमेळीचे चार दिवस आहेत. 

गृहस्थ धर्माची उपमा देत इथे तुकाराम महाराज अध्यात्मातली मुक्ती ही कशी हक्काची नवरी आहे हे सांगत आहेत. 

—————-