शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

यमक जोड्या

भाषाशास्त्रात असे म्हणतात की आपण जे शब्द तयार करतो त्याने आपण केवळ भेद दाखवत असतो. म्हणजे जेव्हा आपण "गोड" हा शब्द योजतो तेव्हा तो "तिखट" ह्या शब्दापासून कसा वेगळा आहे हेच आपण दाखवत असतो. असे भेद दाखवणारे व विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपण एकत्र केले तर असे दिसते की विरुद्ध अर्थाचे शब्द हे नेहमी ( ७० टक्के ) त्या अर्थाच्या एका शब्दाला यमक योजून केलेले असते. उदाहरणार्थ आपण काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोडया प्रथम पाहू. त्या अशा आढळतील : १) अधोगती-प्रगती २) अनाथ-सनाथ ३) अपेक्षित-अनपेक्षित ४) अब्रू-बेअब्रू ५) आघाडी-पिछाडी ६) आदर-अनादर ७) आवक-जावक ८) आशा-निराशा ९) आस्तिक-नास्तिक १०) इमान-बेइमान ११) इलाज-नाइलाज १२) इष्ट-अनिष्ट १३) इहलोक-परलोक १४) उत्तीर्ण-अनुत्तीर्ण १५) उन्नती-अवनती १६) उचित-अनुचित १७) उच्चा-नीच १८) उत्कर्ष-अपकर्ष १९) एकमत-दुमत २०) कडू-गोड २१) कृतज्ञ-कृतघ्न २२) कृपा-अवकृपा २३) खंडन-मंडन २४) चल-अचल २५) जहाल-मवाळ २६) तारक-मारक २७) दुष्ट-सुष्ट २८) नि:शस्त्र-सशस्त्र २९) प्रसरण-आकुंचन ३०) प्राचीन-अर्वाचीन ३१) पुरोगामी-प्रतिगामी ३२) भरती-ओहोटी ३३) माजी-आजी ३४) माहेर-सासर ३५) राजमार्ग-आडमार्ग ३६) वंद्य-निंद्य ३७) विधायक-विध्वंसक ३८) विसंवाद-सुसंवाद ३९) वैयक्तिक-सामूहिक ४०) शुद्धपक्ष-वद्यपक्ष ४१) सगुण-निर्गुण ४२) सजातीय-विजातीय ४३) समता-विषमता ४४) सावध-बेसावध ४५) स्वकीय-परकीय ४६) स्वार्थ-परमार्थ ४७) साधार-निराधार ४८) साक्षर-निरक्षर ४९) सुकाळ-दुष्काळ ५०) सुचिन्ह-दु:श्चिन्ह ५१) सुपीक-नापीक ५२) सुरस-नीरस ५३) सुलक्षणी-दुर्लक्षणी ५४) सुसंगत-विसंगत ५५) सुर-असुर ५६) सुज्ञ-अज्ञ ५७) सोय-गैरसोय ५८) स्वतंत्र-परतंत्र ५९) स्वदेशी-विदेशी ६०) स्वस्ताई-महागाई ६१) स्वस्थ-अस्वस्थ ६२) होकार-नकार ६३) ज्ञानी-अज्ञानी ६४) ज्ञात-अज्ञात ....वगैरे.आपण नेहमी जे विरुद्ध अर्थाचे शब्द करतो त्यांची तुम्ही जंत्री केलीत तर तुम्हाला हमखास आढळेल की बहुतेक जोड्या ह्या यमकानेच होतात. "ऍन ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या मार्जोरी बोल्टन ह्यांच्या ग्रंथात आपण पाहिलेच आहे की यमकाने दोन अक्षरांच्या साम्यामुळे एक प्रकारचा समीपपणा येतो. तसेच इथे आपण पहात आहोत की यमकामुळे विरुद्ध अर्थाची दोन टोके वाटतील असे शब्द तयार होतात. आता कवीकल्पनेत व अध्यात्मात अनेक वेळा दोन टोकांच्या कल्पना सांगाव्या लागतात. त्यामुले यमके वापरून शब्द केले तर ते किती सहजतेने जमते हे आपल्या संतांना माहीत होते असे दिसते. कारण तुकाराम महाराजांनी अशा दोन विरुद्ध टोकाच्या कल्पना सांगण्यासाठी यमके वापरली आहेत हे सोदाहरण दिसते. पहा : १) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ ( सुख व दु:ख ह्या विरोधी कल्पना व जवापाडे-पर्वताएवढे हे यमक) २) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ ३) मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥  ४) ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥  ५) तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥  ६) विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा