शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

तुकारामाचे ब्यूटी-पार्लर

तुकारामाचे ब्युटी-पार्लर
तुकारामाचे सौंदर्याबद्दलचे ग्रह फार ठाम आहेत. एके ठिकाणी तो म्हणतो की, बाकी सुंदरपणाची बत्तीस लक्षणे आहेत, पण ती काय करायची जर एक नाक नाही किंवा ते नकटे आहे, तरी ती व्यर्थ आहेत. “काय करावी ती बत्तीस लक्षणे | नाक नाही तेणें वाया गेली ||”
नकट्यांबद्दलचा त्याचा पूर्वग्रह जाऊ द्या, पण सुन्दरपणाची कोणती बत्तीस लक्षणे आहेत हे बरे त्याला माहीत आहे.  ती सौंदर्याची बत्तीस लक्षणे अशी :
१)    रंग २) डोळे ३) भुवया ४) केस ५) नाक ६) कान ७) मान ८) बांधा ९) वक्ष १०) उंची ११) पाय १२) हनुवटी १३) गाल १४) खळी १५) ओठ १६) जीभ १७) लांब-सडक बोटे १८) नितंब १९) कंबर २०) ओटीपोट २१) खांदे २२) कपाळ २३) पापण्या २४) मांड्या २५) पाऊल २६) चवडा २७) टांच २८) पायाची बोटे २९) पोटऱ्या ३०) हाताचे कोपर ३१) आजानु बाहू ३२) कंठमणी कंठ( अॅडम्स अॅपल).
कालमानाने जशा संस्कृतीच्या कल्पना बदलत जातात तशा आजच्या बदलत्या समाजात आपण ह्या वरील बत्तीस लक्षणात अजून तीन लक्षणांची वाढ करू शकतो. जसे : नखं , दात व डोके.
१)    रंग : भारतीय लोक सौन्दर्याच्या लक्षणात रंगाला नक्कीच प्रथम क्रमांक देतात. ही प्रवृत्ती अथवा पसंती आत्ताच्या वधूवरांच्या प्राथमिक माहितीतही दिसून येते. पिट्ट गोरी अर्थात पहिली. गहूवर्णी दुसरी, तर निमगोरी अगदी फड्डस. कृष्ण स्वतः सावळा पण राधा मात्र गोरीच हवी. मिस वर्ल्ड मध्ये काळ्या निग्रो मुली असतात खऱ्या पण मुकुट बहुतेक गोऱ्या ललनांच्याच शिरी ! अमेरिकेत मात्र बऱ्याच ठिकाणी नवरा गोरा व बायको निग्रो ( किंवा उलटे ) असे दिसून येते. काळ्या रंगाविरुद्धचा हा ग्रह जायला अजून कित्येक शतके लागतील व तोपर्यंत डार्विनचे उत्क्रांती शास्त्र गोऱ्यांचे प्राधान्य समजून काळ्यांनाच हळू हळू गोरे करायला लागेल अस दिसते. कारण निग्रो सुद्धा आजकाल बरेच उजळ दिसायला लागले आहेत. वेस्ट इंडीज मध्य मी नोकरी निमित्त असताना ऑफिसात ठार काळ्या व तसेच अगदी गोऱ्यापान अशा निग्रो बायका माझ्या सहकारी होत्या. दोन तीन वर्षांच्या अनुभवानंतर एकीला मी एकदा विचारले होते की “आपण गोरे असायला हवे होते ” असे तुला कधी वाटते का ? कारण भारतात प्रत्येक बाईला आपण गोरेच असावे असे वाटते ! ह्यावर ती काळी खूपच रागावली व रंगात काय आहे असे बरेच म्हणाली. पण काळे असण्याचे त्यांना काही वाटत नाही हे मात्र तिथे वेळोवेळी दिसून आले. अर्थात जगभरचे फेअरनेस क्रीमचे प्रचंड खपाचे आकडे पहिले तर सगळ्या जगाचाच कल गोऱ्या रंगाकडे आहे हे मात्र विवादातीतच म्हणायला हवे. गोरे व्हावे असे वाटत असताना एखाद्या ठिकाणी जास्त गोरे होऊन कोडचा डाग उठला तर मात्र त्या व्यक्तीला आयुष्यातून उठल्या सारखेच होते. कोडाबाबत तुकाराम महाराज म्हणाले होते : “कोडियाचे गोरेपण | तसे अहंकारी ज्ञान || त्यासी आता रिझे कोण | जवळी जाता चिळसवाणे ||”. तशीच चिळस वा किळस आजही कोडाबद्दल आपण पाहतोच.
चिन्यांचे गोरेपण वेगळेच. जरा पीत वर्णाकडे झुकणारे. अमेरिकनांचे गोरेपण अनेक प्रकारचे आहे. फटफटीत ते तांबूस व रसरशीत. काश्मिरी व पाकीस्तान्यांचे गोरेपणही खूप मोहक. कोकणस्थांचे गोरेपण वाखाणले असते पण मग जातीव्यवस्थेचा प्रकोप दिसेल.
२)    डोळे : भारतीय लोकांचे डोळे किती सुंदर आहेत हे मला नोकरीनिमित्त बॅंकॉकला गेल्यावर तिथल्या चीनी वंशाच्या मुलींनी सांगितले होते. अर्थात त्यांच्या मिचमिच्या चिऱ्यासारख्या डोळ्यांपुढे आपले डोळे खरेच मोठे व सुंदर वाटतात. त्यांना तर मोठ्या डोळ्यांचे खूपच अप्रूप आहे. काही लोकांना झोपाळू डोळेही मद्भरे व सुंदर वाटतात. पण आपल्याकडे काही लोक खूपच मोठ्या वटारलेल्या डोळ्यांचे असतात, ते मात्र असुंदर वाटते. भाव भावनांची भाषा डोळ्यांमधूनच बोलली जात असल्याने कुणाला ते जुलमी ( डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका ) वाटतात, तर कुणाला जादू भरे ! गोऱ्या रंगाच्या, लांबसडक केसांच्या चीनी मुली पाहिल्या की, डोळे व नाक ही सुन्दरपणातली किती वरची लक्षणे आहेत हे मात्र सहजी पटते. कारण ह्या दोन गोष्टीनीच त्यांचे सौंदर्य पेंड खाते ! डोळ्यांमधल्या झाकी तरी किती किती प्रकारच्या ( लेन्सेस न लावता) मांजरी सारख्या राखाडी, निळेशार, ते आकाशी वगैरे कित्येकांचे डोळे झोपाळू वाटतात तर कित्येकांचे बोलके. ह्यातले कुठले जास्त सुंदर ह्याचा क्रम लावणे कठीण असले तरी बत्तीस लक्षणात डोळे हमखास हवेत हे मात्र नक्की ! नेपाळी, आसामी, चिनी ह्यांना मोठ्या डोळ्यांचे किती वैषम्य !
३)    भुवया : चेहऱ्याचे भाव ठरविणाऱ्या त्या भुवया. सिनेमा, नाटकातल्या कलावंतांना तर भुवया हमखास खाली वर नाही करता आल्या तर त्यांचं काम करणं पार फिक पडत. कमानदार व रेखीव भुवया यांनी चेहऱ्याचे सौंदर्य नक्कीच खुलून दिसते. खलनायकी चेहऱ्यात दाट भरीव भुवया, भीती, दरारा अजुनच वाढवतात.
४)    केस : एकेकाळी लांबसडक केस हे सौन्दर्याचं लक्षण होतं. पण आजकाल कामाच्या घाई-गडबडीत स्त्रियांना लांब केस सोयीस्कर वाटत नाहीत. पण निखालस ग्रेस पहायची असेल तर बघायला हवे लांब सडक दाट केस. ब्लॉंड, सोनेरी केसांमुळे तर कित्येकांना सोनेरी केसांची परी होऊन गोष्टीत सजून बसायला आवडत असावे. काळेभोर केस लकाकत असले की सौंदर्याची परिसीमाच म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे रंगीत केसही स्त्रियांना त्यांची हौस पुरवण्यासाठी उपलब्ध आहेत.
५)    नाक : सरळ धारदार नाक असले की चेहरा उठून दिसतो. कित्येक सुंदर स्त्रियांना केवळ नाकापायी नाकी नऊ येतात व त्यांना नाकावर शस्त्रक्रिया करून “नोज जॉब” करावा लागतो. काही जणींची नाकं पोपटाच्या चोचीसारखी असतात तर काही जणींची नाकं फारच लांब अशी “खतरनाक” असतात. चीनी वंशाच्या स्त्रियांची नाकं अगदीच नकटी वाटतात. अपऱ्या नाकामुळे चेहऱ्याचा तोल नक्कीच बिघडतो, इतके नाक हे सौंदर्याचे महत्वाचे लक्षण आहे. कित्येक नात्या मेकअपने आपले जरा वाकडे असलेले नाक सरळ करून घेतात. नथणी, हिरा, असले अलंकार धारण करायला नाक हा फारच परिणामकारक अवयव आहे.
६)    कान : जगातल्या बहुतेक स्त्रिया कर्णभूषणे घालतात कारण त्याने कान उठून दिसतात व चेहऱ्याला एक छान बॅलन्स येतो. बहुतेक सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेहऱ्यातले कान थोडेसे उभट असतात व कानांच्या पाळ्या पातळ असतात. लाजल्यावर अथवा खूप क्रोधाने कान लालसर दिसू लागतात, असे कान सुंदर असतात. पूर्वीच्या काळी कानाचा वरचा भाग केसांनी झाकला जाईल अशी केशरचना स्त्रिया करत जी खूपच मादक असे. रती-क्रीडेत जे महत्वाचे स्पर्श-बिंदू उत्तेजना निर्माण करणारे म्हणून मानतात त्यात कानांचा पहिला नंबर मानतात इतके कानांचे महत्व आहे.
७)    मान : उंच मान साधारणपणे सुंदर समजली जाते. बॅंकॉकला काही आदिवासी स्त्रियांच्या मानेभोवती धातूच्या स्प्रिंग्ज लावून त्यांची मान खूपच उंच करतात. थोड्या थोड्या दिवसांनी स्पिंग्जची उंची वाढवत नेतात. नंतर ह्या स्पिंग्ज त्या काढू शकत नाहीत, काढल्या तर त्या मरतात अशी पाळी येते. आणि हे सर्व ते करतात ते उंच मान हे सौंदर्याचे लक्षण मानले म्हणून. सुरई सारखी मान असं सुंदर मानेच वर्णन असतं. ब्युटी-पेजेंट मधल्या उंच सौन्दर्यवतींच्या माना खरेच उंच आणि सुंदर असतात. मूर्तिमंत सौंदर्य समजली जाणारी मस्तानी हिच्या सुंदरपणाचं वर्णन करताना म्हणतात की तिने विडा खाल्ला तर तो विडा मानेतून खाली जातांना रंगीतसा दिसत असे इतकी तिची मान आरस्पानी व उंच. उंच मानेमुळे वेगवेगळे केशसंभार जास्त खुलतात.
८)     बांधा : वक्ष, कंबर, व नितंब ह्यांची प्रमाणबद्धता किंवा ठेवण म्हणजे बांधा. खेडेगावात ह्यात ढोबळ दोन प्रकार करतात, “एक हरणी व दुसरी बरणी ”. अर्थातच कंबर कमीत कमी,  वक्ष नितम्बापेक्षा कमी, अशा प्रमाणाला कमनीयच किंवा सुंदर समजतात. सुन्दरतेपेक्षा लैंगिक आकर्षणापायी वक्षाचा आकार खास इम्प्लांट रोपून घेवून मोठा करण्याची फॅशन परदेशात आली आहे. तसेच रॅम्प वर चालणाऱ्या मॉडेल्स ह्यांचे हात पाय खूप बारीक असण्याच्या गरजेपायी रोड म्हणजे सुंदर असाही कल होऊ पहात आहे.
९)     वक्ष : सुंदर स्त्रियांचे वक्षही अर्थातच सुंदर असावे लागतात. त्यात आकारमानाचे भरपूर वैचित्र्य असते. अगदी मादक सौंदर्याच्या अॅटम बॉम्ब पर्यंत. पण निरनिराळ्या समाजांच्या नीतीमत्तेन्च्या कल्पनाप्रमाणे सौंदर्यापेक्षा लैंगिकतेकडे वळणारे हे लक्षण आहे. कलेच्या अभ्यासक्रमात “न्यूड ” पेंटींग्जना फारच महत्व देतात व त्यामुळे चित्रकारांना वक्षांचे योग्य चित्रीकरण करणे हे खूप मोठे आव्हान असते. लैंगिकतेपेक्षा त्यात सौंदर्य दाखवणे हे कठीण काम असते. नुसतेच मोठे वक्ष हे सुंदर असत नाहीत तर ते प्रमाणबद्ध असावे लागतात तरच सुंदर दिसतात.
१०)                       उंची : आजकाल तर ह्याचे किमान मोजमापही जागतिक सौंदर्य-स्पर्धेत नक्की झालेले आहे. सुंदर असण्यासाठी कमीत कमी उंची म्हणे असावी लागते : ५ फूट ८ इंच.  ज्या सौंदर्यसम्राज्ञी होतात त्या तर जवळ जवळ ६ फूट उंच असतातच. भारतात मात्र अजूनही ५ फूट २ इंचाच्या मुली वधूवर संसोशधानात उंचच समजल्या जातात. मुलांच्या तुलनेतून जरी पाहिले नाही तरी बुटक्या मुलींना कुणी सुंदर समजत नाहीत. काही मुली उंची मोजल्यावर अॅव्हरेज उंचीच्या असल्या तरी दिसतांना उंच वाटतात. हे त्यांच्या स्वतःला कॅरी करण्याच्या स्टाईल मुळे होत असावे. अर्थातच उंची हे नक्कीच सौंदर्याचे लक्षण ठरते.
११)                       पाय / पाऊल : पूर्वी वधूपरीक्षेच्या वेळी पाय/ पाउल हटकून पाहिले जायचे व शक्यतो पाउल लहान असावे म्हणजे ते सुंदर असे समजत. पण त्यात जोड योग्य असावा ही निकड जास्त असायची. साडीच्या पेहरावामुळे पाउल बाहेर न दिसल्यामुळे ते नितळ असणे, लांबसडक असणे हे लक्षण आपल्याकडे सर्रास वाया जाते. स्कर्टसारख्या पेहरावामुळे लांब पायांची शोभा अधिक खुलून दिसते व मग पाय हे सुंदरतेचे लक्षण बनते. गुडघ्यापर्यंतचे पाय व गुडघ्याखालील पाय यांच्या योग्य प्रमाणबद्धतेमुळेही पाय सुंदर दिसतात.
१२)                       हनुवटी : चेहऱ्याच्या प्रकाराप्रमाणे ( गोल, चौकोनी, उभट, बसका वगैरे ) निरनिराळ्या प्रकारच्या हनुवटी शोभतात. तरीही हनुवटी जाड ( डबल चिन ) नसावी असा समज आहे. ती इतकीही लहान नसावी की गळा कुठून सुरू होतो तेही कळू नये. हनुवटीवर तीळ ( खाली/बाजूला ) असेल तर ते खाशा सुंदरतेचे लक्षण समजतात. गोल चेहऱ्याला थोडासा उभटपणा देणारी ही हनुवटीच असते व त्यामुळे हिचे अनन्यसाधारण महत्व आहे.
१३)                       गाल : सुंदर होण्यासाठी गाण्यातले “गोरे गोरे गाल ” गोरे असावेच लागतात. चेहऱ्यावरच्या मेकअपसाठी असणारे हे मासल गोळे फार फुगीर असले तर “चब्बी चिक्स ” म्हणून लहान बाळांना शोभतात. पण मोठ्यासाठी हे फार उठावदार नसावे लागतात. शिवाय ते मऊ सूत असावे लागतात तरच मोहक ठरतात. काही जणींचे हाय चीक बोन्स मुळे गाल वरपासून उठावदार असतात.
१४)                       खळी : प्रीती झिंटाच्या, माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे एकमेव राज व लक्षण गालावरची खळी आहे हे सर्वांना माहीतच आहे. सौन्दर्याच्या दुकानात अजून तरी “खळी ” हीच एकमेव अशी आहे की जी बाह्य साधनांनी तयार करता येत नाही. एरव्ही न दिसणारी ही खळी थोडेसे स्मित चेहऱ्यावर आले की पाहणाऱ्यांनाही बहार देउन जाते. खळीदार चेहऱ्यावर हास्य इतके सुंदरपणे विलसते की तो चेहराच सुंदर होउन जातो. कित्येकींना दोन्ही गालावर खळ्या पडतात तर काहींना एकाच गालावर खळी पडते.
१५)                       ओठ : मुलायम, कमानदार, आणि रेखीव ओठांमुळे सौंदर्य वाढते हे निश्चितच. सुंदर म्हणवऱ्यांचे ओठ राठ नसले पाहिजेत. एका बाजूला वाकडे झालेले नसले पाहिजेत. दोन्ही बाजूस समतोल असले पाहिजेत.  लवचिक असले पाहिजेत म्हणजे लाजणे, घाबरणे वगैरे भावना ओठ दाबून सुंदर स्त्रियांना व्यक्त करता याव्यात. लैंगिक वागण्यात चुंबनाचे खासे महत्व असल्याने ओठ सुंदर असणे ओघानेच महत्वाचे ठरते. शिवाय भाषेच्या उच्चारणातही बरेचसे उच्चार ओठानी होत असल्याने ते सक्षमही असणे अगत्याचे ठरते.
१६)                       जीभ : जीभ तशी फारशी नजरेत येत नाही. केव्हा केव्हा “अय्या ” किंवा तत्सम उद्गार स्त्रिया काढतात तेव्हा ती दिसते. किंवा एखादी चूक होते व जीभ चावली जाते तेव्हा ती दिसते. अर्थातच ती जाड असली तर चांगली दिसत नाही. टोकाकडे निमुळती व पातळ जीभ दिसते तेव्हा सुंदर दिसते. अगदी नाकाच्या शेंड्याला स्पर्श करू शकेल इतकी लांब नसली तरी लांब जीभ सुंदर दिसते. लालसर जीभ अर्थातच सुंदर. ओठ आणि जीभ विडा खाण्याने छान रंगतात म्हणून तर पूर्वी विडा खाण्याची पद्धत स्त्रियातसुद्धा रुढ झाली असावी.
१७)                       लांब सडक बोटे : पूर्वी हौसेने भविष्य सांगणारे ज्योतिषी बोटे किती लांब आहेत त्यावरून त्या व्यक्तीची कलानिपुणता वर्तवीत असत. विशेषतः सतार वगैरे सारखी वाद्ये वाजविणाऱ्या कलावंत स्त्रियांची बोटे लांब सडक असत. चित्रकारांचीही बोटे लांब असत. लांब हात सुंदर दिसतात तर मग त्याच्या टोकाला असलेली बोटेही ओघाने लांब हवीत व ती सौंदर्याची लक्षणे आहेत हे साहजिकच पटते. कदाचित लांब बोटांनी नृत्यातल्या मुद्रा अजून सुंदर दिसतात म्हणूनही हे लक्षण नक्की केले असावे. बऱ्याच वेळा अभिनयातही बोटांच्या हालचालींचे महत्व असते व म्हणूनही लांब बोटे सुंदर ठरली असतील.
१८)                       नितंब : ह्या अगोदरच्या बांधा ह्या लक्षणात नितम्बाचे वक्ष व कंबरेशी असणाऱ्या प्रमाणबद्धतेचे महत्व आपण पाहिलेच. नऊवारी साड्या नेसून लावणी पेश करणाऱ्या सौन्दर्यवती आठवल्या तर नजरेत रेंगाळतात ते नितंब व त्याने सौंदर्य निश्चितच खुलते. अर्थात आरोगयाबाबत जास्त दक्ष असलेल्या सध्याच्या पिढीच्या स्त्रियांचा कटाक्ष नितंब प्रमाणाबाहेर वाढू न देण्याकडेच असतो. सौंदर्य-स्पर्धेत बारीकातली बारीक बिकिनी घालून नितम्बाचे खरे सौंदर्य व मादकता निरखण्याचे म्हणूनच अगत्य असते.
१९)                       कंबर : सगळ्या सिनेमा नट्यांचे स्वप्न असते की त्यांना झीरो नंबरचा ड्रेस घालता यावा. हा आला तर त्या सगळ्यात फिट्ट व स्लिम. ह्या ड्रेस मध्ये कंबरेचे मोजमाप असते २१ इंच, जे साधारण १४ वर्षांच्या मुलीच्या कंबरेचे मोजमाप असते. पूर्वीच्या वाङमयात आदर्श सुंदर रमणीची कटी ती “सिंहकटी” असायची. अगदी झीरो नंबरची कंबर नसली तरी प्रमाणशीर बांधा म्हणजे “अवर ग्लास फिगर ” असे म्हणतात. म्हणजे पूर्वीची वाळूची घड्याळे असत तशी मध्ये चिंचोळी कंबर व वर खाली फुगीर भाग अशी. अर्थात चिंचोळी कंबर हे सध्याच्या स्त्रियांना असाध्य होत असले तरी ते सौंदर्याचे लक्षण आहे हे मात्र नक्की.
२०)                       ओटीपोट : नाभीच्या खालचे पोट ते ओटीपोट. कदाचित ओटी भरण्याच्या प्रकारातून हे नाव ठरले असावे. तरुण अविवाहित मुलींचे सपाट ओटीपोट लेकुरवाळ्यांच्या फुगीर ओटीपोटापासून लगेच ओळखू येते व ते निश्चितच सुंदर दिसते. अॅथलीट्स मुलींची ओटीपोटे ही सपाट व सुंदर असतात. सध्याच्या स्वास्थ्य समन्जसांच्या काळात योग, व्यायाम वगैरेने हे ओटीपोट प्रमाणशीर राहू शकते.
२१)                       खांदे : पडलेले खांदे सुंदर दिसत नाहीत तसेच रुंद पुरुषी खांदेही सुन्दरतेत शोभत नाहीत. पुढे बाक आलेले खांदेही सुंदर दिसत नाहीत. खांद्यांचे हे सुंदर दिसण्यातले महत्व तेव्हा लक्षात येते जेव्हा आपण पाहतो की पाश्चात्य पोशाखात खांद्याला पॅकिंग ( अस्तर ) दिलेले असते. कदाचित ह्याच हेतूने पूर्वीच्या उंटाच्या बाह्यांची फॅशन झाली असावी.
२२)                       कपाळ : फार मोठे उभट कपाळ असेल तर हेअर लाईन मागे सरकतेय असा भास होतो ( रीसीडिंग हेअर लाईन ). फारच छोटे कपाळ असेल तर चेहराही लहान दिसायला लागतो. आठ्या न पडणारे कपाळ अर्थातच सुंदर. साधना कट किंवा बटा, झुल्फे ह्यांच्या सहाय्याने कपाळ थोडे लपवता येते. कोणाच्या कपाळी काय लिहून ठेवलेय हे जरी आपण पाहू शकलो नाही तरी निरनिराळ्या प्रकारच्या बिंदिया, भांग, या मधून खाली लोंबणारे पेंडंट वगैरे आभूषणे लेवू शकेल इतके तरी कपाळ मोठे असावे लागते.
२३)                       पापण्या : डोळ्यांचे सौंदर्य हमखास खुलवितात त्या पापण्या. मेक-अप मधल्या खोट्या लांब पापण्या आता अगदी सर्रास झाल्याने मुळातल्या खऱ्या पापण्यांचे कौतुक एवढे राहिलेले नाही. बोलण्याची भाषा डोळ्यातून झाल्याने व आजकाल क्लोज-अपचे महत्व वाढल्याने पापण्या सुंदर असणे व दिसणे हे सुंदरपणाचे खास लक्षण झाले आहे. शिवाय ह्यांना निरनिराळ्या रंगांच्या छटाही देता येतात.
२४)                       मांड्या ; ह्या थुलथुलीत नसाव्यात हे तर ओघाने येतेच. त्या फार मांसल नसाव्यात. लांब पाय हे जसे सुंदरतेचे लक्षण तसेच लांब निमुळत्या मांड्याही. अर्थात ह्यावरची नितळ त्वचा सुंदरता अजून वाढवते. सुंदरता व मादकता ह्यांच्या सीमारेषेवर नेउन ठेवणारा हा अवयव आहे.
२५)                       पाऊल : लहान पाऊल असावे ह्या समजुतीपायी जपानी ललनांचे पाय वर्षानुवर्षे लाकडी बुटात बंदिस्त होते. नाजुकपणाच्या कल्पनेपायी आपल्याकडेही मुलगी पाहताना तिचे पाऊल लहान असावे असे बघत, चवडा, टाच, आणि पायाची बोटे ह्यांची प्रमाणबद्धता अगत्याची आहे. चवडा आणि टांचेत बांक असावा, सपाट तळवा नसावा असे स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहतात व दिसण्यातही ते सुंदर दिसते.
२६)                       चवडा : पावलातला रुंद असलेला हा पुढचा भाग. हा फारच रुंद असला तर फताडा पाय असल्यासारखे दिसते. पूर्वी पुरुषांचे चवडे देखील अरुंद निमुळते असावेत ह्या समजापायी पॉईंटेड शूजची फॅशन असायची. पण आजकाल हव्या त्या रुंदीचे बूट मिळतात, त्यामुळे स्वास्थ्याची सोय होते पण दिसण्यात फार रुंद चवडा नाजुक दिसत नाही.
२७)                       टांच : संपूर्ण शरीराचा भार चवडा व टांच पेलतात म्हणून शरीरशास्त्राप्रमाणे टाचेला महत्व आहे. पण वय झाल्यावर टाच दुखायला लागल्यावर हे समजते. मागील बाजूस पूर्ण गोलाकार व तळव्याला मध्ये चिंचोळी होणारी टाच पावलांच्या चित्रात सुंदर दिसते. अर्थात टाचेवर वा चवड्याला किनाऱ्याने भेगा नसाव्यात हे सुंदरतेचेच लक्षण . आजकाल ब्यूटी पार्लर मध्ये पेडीक्यूअर शिवाय प्रसाधन पूर्ण होत नाही त्यावरून पाऊल चवडा व टाचेचे सौंदर्याचे लक्षण ठरवणे किती रास्त होते हे पटते.
२८)                       पायाची बोटे : ह्यात इतके प्रकार दिसून येतात की त्यामुळेच हे सुंदरतेचे लक्षण ठरवावे लागते. बोटे अर्थातच सरळ, बांक नसलेली व करंगळीकडे लहान होत गेलेली असावीत. काही जणांच्या करंगळ्या अगदीच वाकलेल्या असतात. माणसाचे शेपूट जसे उत्क्रांतीत गेले तसे काहींच्या मते हळू हळू करंगळी ( पायाची )  नष्ट होणार आहे. पण अजून आहे तोवर ती प्रमाणबद्ध असावी अशी सौंदर्यासाठीची अपेक्षा आहे.
२९)                       पोटऱ्या : पाय ह्या लक्षणात मांड्या व पोटऱ्या येतातच पण स्वतंत्रपणे पोटऱ्या पाहतांना त्या मागील बाजूने किंचित भरलेल्या असाव्यात व मध्यभागी फुगीर व खाली जास्त निमुळत्या असाव्यात अशी अपेक्षा असते. अगदी वरपासून खालपर्यंत सारख्याच भरलेल्या दांडग्या पोटऱ्या अर्थातच दिसायला चांगल्या दिसत नाहीत. वरची त्वचा अर्थातच सफाईदार असायला हवी किंवा शेविंग करून साफ ठेवायला हवी.
३०)                       हाताचे कोपर : हात दुमडल्यावर खालच्या अंगाने कोपर टोकदार कोनात असावे तर वरच्या अंगाला वळी पडणार नाही असे असावे असे बऱ्याच वर्णनात येते. मनगटाशी बांगड्या पाटल्या तर बाहू वर वाकी अशी आभूषणे घातल्यावर कोपराचे सुंदर दिसणे महत्वाचे ठरते.
३१)                       आजान-बाहू : लांब सडक हात, अगदी गुडघ्यापर्यंत पोहचू शकणारे, हे सुंदरतेचे लक्षण मानतात. ज्यांचे हात आखूड, थोटे असतात त्या विचित्र दिसण्यावरून हातांचे लांब असणे सुंदर हे पटण्यासारखे आहे.
३२)                       कंठ , कंठमणी : गळ्यात सारखा हलणारा हा कंठ, कंठमणी ( किंवा इंग्रजीतला अॅडम्स अॅपल ) हा किंचितसा बाहेर आलेला असावा. फार बाहेर आलेला चांगला दिसत नाही. शिवाय तो बोलताना गाताना हलला पाहिजे इतका लवचिक हवा.
शास्त्राप्रमाणे बत्तीस लक्षणे संपली. पण आजकाल आवर्जून पाहिले जातात अशी तीन अधिकाची लक्षणे ठरतात ती : नखे, दात व डोक्याची ठेवण. नखांचे मॅनिक्यूअर तर हमखास पार्लरात करावे लागते. नखे किंचीतशी लांब व टोकाशी निमुळती ठेवतात. शिवाय हव्या त्या रंगाचे नेल पॉलिश हा “पोरखेळ” अत्यावश्यकच असतो. दात ओळीने, फट नसणारे व पांढरे असले पाहिजेत. परवा एक सिने छायाचित्रकार सांगत होता की, दातांची ठेवण कशी असावी तर वरची दातांची रांग हसल्यावर दिसली पाहिजे पण हसल्यावरही खालचे दात दिसले न पाहिजेत. काहींच्या डोक्याची ठेवण गोलाकार तर काहींची चपटी अशी असते. अर्थात केशसंभारामुळे हे झाकले जाते. पण मध्ये मागे पर्यंत सपाट व कडांनी गोलाकार अशी ठेवण सुंदर दिसते. गौतम बुद्धाचे डोके मधोमध वर आल्यासारखे, टोप घातल्यासारखे दिसते हे त्या काळच्या सुंदरतेच्या लक्षणाप्रमाणे आहे असे म्हणतात. ( ती केशरचना नाहीय .).
नाक सरळ मोठे असणे किंवा नकटे नसणे हे सौंदर्याचे लक्षण तुकारामाच्या काळापासून किती महत्वाचे होते हे अजून एका अभंगातून दिसून येते. “दर्पणासी नकटे लाजे | शूळ खिजे देखोनि | ऐसे अवगुणाच्या बाधे | दिसे सुधे विपरीत ||” ( नकटे मनुष्य आरशाला पाहून लज्जित होते. तो आरसा जरी शुद्ध आहे तरी त्याला पाहून नकटा लाजतोच. अवगुणाची बाधा ज्याला आहे त्याला जे सरळ आहे ते वाकडे भासते. ह्या अर्थावरून नकटेपणाबद्दल त्या काळी किती प्रभावी ग्रह होते ते दिसते.).
एवढी भराभर बत्तीस लक्षणे, पण आपल्या नशिबी एखादेच येते अशी खंत आपल्याला वाटत राहते. त्यावर वरवरच्या सौंदर्याची ही बत्तीस लक्षणे सांगितली असली तरी खरे सौंदर्य, अंतरी असते हे तुकारामांनी व इतर संतांनी वेळोवेळी व सर्वार्थाने सांगितले आहे. “काय भुललासी वरलीया अंगा ” अशी त्यांनी आपली कानउघाडणीही केली आहे. सावळे, सुंदर, रूप मनोहर, विठ्ठलाचे आहे असे म्हणत त्यांनी गोऱ्या रंगाचे अप्रूप फिके पाडले आहे. अंतरंगाच्या सौंदर्याचे मोठेपण सांगताना ते म्हणतात, “कस्तुरीचे रूप अति हीनवर | माजी असे मोल तया | आणिक ही तैसी चंदनाची झाडे | परीमळे वाढे मोल तया | काय रूप असे परीस चांगला | धातू केली मोला वाढ तेणे | फिरंगी आटीता नये बारा रुके | गुणे मोले विके सह्स्त्रावरी || ” ( कस्तुरीचे रूप वरून पाहता वाईट दिसते पण तिच्या आतमध्ये सारभूत सुगंध असतो, म्हणूनच ती मौल्यवान आहे. आणि त्याप्रमाणे आणखी चंदनाची झाडे दिसण्यात सुंदर नसतात, पण त्यांच्या ठिकाणी सुगंध असल्यामुळे तीही अधिक मौल्यवान झाली आहेत. परीस हा रूपाने काय चांगला आहे ? पण तो सामान्य लोखंडाचे अति मौल्यवान असे सोने करतो. चांगली तलवार आटवली तर त्याचे बारा पैसेही येणार नाहीत. ती जर तशीच कायम ठेवली तर आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे ती हजारो रुपयास विकली जाईल.). बत्तीस लक्षणे केवळ कुतुहूल म्हणून बघायची व अंतरंगी असलेल्या गुणांचे सौंदर्य वाढवायचे, हेच खऱ्या ब्युटी पार्लरातले ब्रीद वाक्य असायला हवे. हे खरे तुकारामाचे ब्युटी पार्लर !
अरुण अनंत भालेराव      
             


मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

कवित्व



कवित्व
गुजरातीतले एक प्रसिद्ध कवी आहेत, सुरेश दलाल नावाचे. त्यांना आम्ही एकदा आमच्या लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला बोलावले होते. जेवताना मी त्यांना विचारले होते की आजकालच्या साहित्यिकांचे साहित्य हे आठ दहा वर्षातच विस्मरणात जाते, पण आज साडे चारशे वर्षे होऊनही तुकारामाचे अभंग अजून कसे टिकले आहेत ? त्यावर त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. त्यांच्या मते आजकालचे साहित्यिक हे मुद्दाम काही पोज / आव  ( भूमिका ) घेवून लिहितात, तर त्या मानाने तुकारामाचे लिहिणे हे कुठलीही भूमिका न घेता, सहज सरळ प्रवृत्तीने आहे व म्हणून ते भिडणारे आहे, तसेच टिकणारे आहे .
भले, तुकारामाने आव आणला नसेल, पण आपण काव्य का लिहितो, कोणासाठी लिहितो, कसे लिहितो, ह्याबाबत त्याने विचार केला होता काय हे पाहणे मोठे मनोहारी ठरावे. तुकारामाबद्दल दुसऱ्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा खुद्द तुकारामानेच आपल्या कावित्वाबाद्द्ल काय लिहिले आहे ते पहावे असे ठरवले तर काय सापडते ?
कलियुगात अनेक पाखंडी लोक कुशलतेने कविता करीत आहेत पण ते सगळे दंभी असून बोलतात एक व वागतात वेगळे. द्रव्य व संसार ह्यातच ते रममाण होतात. देहाहून अलिप्त राहून ते वेदांनी सांगितलेले स्वहित करणारे नाहीत. असे रास्त वर्णन तुकाराम महाराज इथे असे करतात :    
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥1॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी। मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥2॥
वेदाज्ञे  करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥3॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥4॥
आपण बोलतो कसे व कोण आपल्याला बोलवतो हे अजून गूढच असले तरी तुकारामाची अशी नितांत श्रद्धा आहे की पांडुरंगच त्याला बोलका करीत आहे. हे मी केलेले, जोडलेले कवित्व नसून ते देवानेच माझ्याकडून वदवून घेतलेले आहे. मी केवळ मोजायला असलेला मापारी आहे अशी तुकारामाची श्रद्धा आहे. कवी जरी अश्रद्ध असेल तरी कविता कशी सुचली हे तो आजही ठामपणे सांगू शकत नाही. सश्रद्ध तुकारामाला मग  पांडुरंग हे करवितो आहे असे वाटल्यास नवल नाही.
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥
तुका म्हणे आहें पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥
ह्याच श्रद्धेपोटी खुद्द नामदेवांनी स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत दिलेला आहे व त्याबरहुकूम आपण कवित्व करीत आहोत असे तुकारामाला वाटत असावे.
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥1॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥2॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥3॥
तुकारामाच्या दृष्टीने कवित्व हे काही फावल्या वेळात करायची विरंगुळ्याची गोष्ट नसून ती एक भक्तीसाधना आहे व त्यासाठी तो कवित्व करतो आहे.
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥1॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥2॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥3॥
पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥4 ॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥5॥
तुका ह्मणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥6॥
केवळ कवित्व केले म्हणून काही कोणी संत होत नाही हा साधा विचार तुकाराम असा सांगतात : नव्हती ते संत करितां कवित्व
दणादण टाकसाळी सारखे कवित्व पाडणे हे काही सोपे काम नसून ती एक साधना आहे असा तुकारामाचा विचार आहे :
 नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥
 लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥
 तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥
लोकां सांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण, ह्या प्रकारचे लोकांना केवळ सांगण्याचे कवित्व हे काम नसून ते आचरण करण्याचेही काम आहे असे तुकाराम सांगतात :
ब्रह्मज्ञान  भरोवरी । सांगे आपण न करी॥1॥
 थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥
 कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥2॥
 तुका ह्मणे कवित्व करी । मान लोभ हे अंतरी  ॥3॥
कवित्व करणे हे काही सहज साध्या होणारे फळ नसून ती एक साधना असून जिव्हाळ्याची ओल त्यासाठी आवश्यक आहे असे तुकाराम इथे असे सांगतात:


लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची  ॥1॥
 नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥
 लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥2॥
 तुका ह्मणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥3॥
कवित्व करणे हाच काही शेवट असू शकत नाही तर भक्ती हे अंतिम ध्येय असून कवित्व केवळ एक माध्यम आहे असे तुकाराम सांगतात :
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥1॥
करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥
तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥2॥
तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥3॥




गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

तुकयाचे आरोग्य



तुकयाचे आरोग्य
-------------------
( डांकेचे अभंग )
-----------------------
चौक भरियेला आसनी । पाचारिली कुळस्वामीनी । वैकुंठवासिनी । ये धांवोनी झडकरी ॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरे तें मी केधवा देखेन ॥
रजतम धूपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आईती । ये धांवती झडकरी ॥
मन मारोनिया मेंढा मुठी । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥
डांका अनुहात गजरे । येऊनि आंगासी संचरे । आपुला घेऊनि पुरस्कार । आरोग्य करी तुकयाते ॥
( चित्ताच्या आसनावर चौक भरून आपल्या कुळस्वामीनीस हांक मारिली ती अशी, की अगे वैकुंठात राहणारे तू लवकर धावून ये. हे विठाबाई, सांवळे डोळसे, तू माझ्या अंत:करणाच्या रंगात ये. तुझे श्रीमुख शोभायमान आहे, ते मी केव्हा पाहीन ! रज तम गुणांची धूपारती व पंचप्राणांची आरती अशी सामग्री तयार करून वाट पाहतो, म्हणून तू लवकर धावून ये. मनरूपी बकरा एका बुक्कीने मारून त्यातील आशा, मनशा, तृष्णा ह्या काढून भक्तीभावाने ताटात नैवेद्य भरून मी तुला हाका मारत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनुहात ध्वनीच्या ( हरिनामाच्या ) डांकाची गर्जना ऐकून देवीने माझ्या अंगात संचार केला आणि आपला पूजोपचार घेऊन मला भवरोगापासून वेगळे केले )
( तुम्हाला वाटेल की काय माझा अभ्यास आहे. मी लगेच वरचा अभंग उदधृत केला. तर त्याची गंमत अशी की माझ्याकडे संगणकावरची गाथा आहे. त्यात Find नावाची दुर्बिणीच्या चित्राची एक कळ आहे. ती दाबून त्यात "आरोग्य" लिहिले की झटक्यात वरचा अभंग आला. संगणकाच्या सहाय्याने तुकारामाच्या अभ्यासावर माझा एक ब्लॉग आहे ई-तुका नावाचा. अवश्य पहा :

----------------------------------------

शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

संताने सुखवस्तू असू नये?

----------------------------------------
संताने सुखवस्तू असू नये ?
-------------------------------
परवा माझ्या एका मित्राने खास आळंदीला जाऊन एक तुकाराम महाराजांचा छोटेखानी शाडूचा पुतळा मला भेट म्हणून दिला. आम्ही मित्र भेटलो होतो शिर्डीला, पण त्याने तिथे खास पुण्याहून हा पुतळा काळजीपूर्वक सांभाळून आणलेला होता. भेट देण्यामागे त्याने हेरलेले माझे तुकाराम महाराजांवर नेमाने लिहिणे अभ्यासणे होते असे त्याने बोलूनही दाखविले. मूर्ती तशी छानच होती व त्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून मूर्तीभोवती चहूंबाजूने एक काचेची पेटी बनवलेली होती.
आमची मोलकरीण रोजचे झाडणे करताना एक हात ह्या मूर्तीवरून फिरवत होती. ही मोलकरीण तशी अशिक्षितच व तशात कोकणच्या बाजूची. महाबळेश्वरला जाताना लागते त्या माणगावची. तिने अंदाजे आम्हाला विचारले की हे कोण बाबा आहेत. तुम्ही गेला होतात शिर्डीला, पण हे काही साईबाबा दिसत नाहीत. आता आपण म्हणतो की तुकाराम महाराज हे खेडोपाडी प्रसिद्ध आहेत. वारीला जाणार्‍यांना तुकारामाचे अभंगही पाठ असतात व ह्या मोलकरणीला तुकाराम माहीत नव्हता हे आश्चर्याचेच होते. म्हणून तिला विचारण्याआधी मी मूर्तीकडे जरा परत एकदा निरखून पाहिले. मूर्ती तशी सुबकच होती. फक्त तुकारामाचे गाल जरा गुबगुबीत रेखलेले होते व मिशा जरा जादा झुबकेदार झालेल्या होत्या. त्यामुळे हा तुकाराम आजकालच्या बोवा लोकांप्रमाणे, पाहताच गुबगुबीत व सुखवस्तू दिसत होता.
ह्या सुखवस्तू दिसण्यानेच त्याचे संतपण हरवले होते व तो व्यवसायाने "बोवा" असल्यासारखा दिसत होता. संताने असे सुखवस्तू असून कसे चालेल ? तो दिसायलाही दीनदुबळाच हवा !
----------------------------------------






गुरुवार, ६ जून, २०१३

हंगामा

------------------------------------------
जब के तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है ?
---------------------------------------
    माझे असे एक पाहणे आहे की साधारणपणे ज्या काळात एका मोठ्या माणसाला जे वाटत असते अगदी तसेच दुसर्‍या कोणाला तरी तसेच वाटत असते व तोही तसेच म्हणत असतो. फरक असतो तो भाषेचा, प्रदेशाचा किंवा श्रेणीचा ( डिग्रीचा )  !
    आता वरील गालिबचा शेर आपण सरळ अर्थाने काय म्हणतोय हे पाहिले तर कळेल की
"जर तुजविण नाही कोणी हजर दुसरे
तर गोंगाट/गडबड/बोभाटा हा देवा, काय रे ?"
    आता असेच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे काय, ह्याचा शोध घेता हा अभंग सापडतो :
पावलें पावलें तुझें आह्मां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥
जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥
    "तुज बिन नही कोई मौजूद" च्या ऐवजी तुकाराम महाराज म्हणत आहेत : "तुका म्हणे अणु तुजविण नाही" . इथे गालिबच्या "कोई"ची वरची डिग्री "अणु"ने दाखविली आहे. तसेच तू सर्व व्यापून आहेस हे सांगताना वरची श्रेणी दाखविलीय ती अणू असूनही "नभाहूनि पाही वाढ आहे" असे म्हटले आहे.
    तसेच "हंगामा"चे हुबेहुब वर्णन "भेदाभेदमते भ्रमाचे संवाद" ह्या भाषांतराने साधले आहे. "तुजबिन नही कोई मौजूद" ह्याचाच अर्थ असा होतो की "सगळीकडे तूच व्यापून आहेस". आणि ह्या अर्थासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "जेथे तेथे तुझीच पाउले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ॥"
    गालिबने जो गझल मध्ये प्रश्न विचारला आहे ( फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है ? )  त्याचे जणु उत्तरच तुकाराम महाराज देत आहेत ते असे : "पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ॥"
    असे पाहिले तर ही तुकारामाची गझलच झाली की, अगदी गालिबच्या हंगामाच्या तोडीची !
-------------------------------------------

सोमवार, १८ मार्च, २०१३

यमकातून अनुप्रास

यमकातून अनुप्रास
-------------------------
यमक जसे शेवटच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराच्या आवर्तनाने तयार होते व ते जसे उच्चाराच्या साधर्म्यामुळे लक्ष वेधून घेते  तसाच अनुप्रास हा अलंकार एका अक्षराच्या बर्‍याच वेळा म्हणण्याने तयार होतो हे आपणास माहीत आहेच. लहान मुले हा अलंकार "चंदू के चाचाने , चंदू की चाची को,  चांदनी रातमे, चांदी के चमचसे, चटणी चटायी." असे मोठ्याने म्हणून दाखवतात.  हा अलंकारही उच्चाराच्या चमत्कृती मुळेच तयार होतो. ह्यामुळे काव्य लक्षात राहण्याजोगे होते. अभंग ही रचनाच अनुप्रास साधण्यास फार सोयीस्कर आहे. कारण यमकामुळे चार चरणांपैकी दोन चरणात आधीच अक्षराची द्विरुक्ती झालेली असते. आता फक्त पहिल्या व चौथ्या चरणात यमकाचेच अक्षर असलेला शब्द योजला की झाला अनुप्रास अलंकार. जसे : "उजवला काळ । कुळा लाविला विटाळ ।( २०६ जोग प्रत )"; "मानामान मोह माया मिथ्या ( १९९ जोग प्रत )" ; "दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥ ( २९३ जोग प्रत )"; "हिरा हिरकणी । कांढी आंतुनि अहिरणीं ॥ ( ३६४, जोग प्रत )"; "फळले ते लवे भारे । पिक खरे आले तईं ॥ ( ५०४ जोग प्रत )"; "अनुभवे अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरावला मनुं ठायीं ॥ ( ७८३, जोग प्रत )"; "जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भुषणू नारायण ॥ सुखाचा सांगात । अंतकासी अंत । निजाचा निवांत । नारायण ॥ गोडाचेहि गोड । हर्षाचेही कोड । प्रीतीचाही लाड । नारायण ॥ भावाचा निजभाव नावाचाही नाव । अवघा पंढरी राव । अवतरलासे ॥ तुका म्हणे जें हे साराचेही सार । माझा अंगीकार तेणें केला ॥ ( १०९०, जोग प्रत )"; "अनंता अरूपा अलक्षा अच्युता ( १२५६ जोग प्रत )"; "भला भला पुंडलिका । मानलासि जनलोकां । ( १४०९, जोग प्रत )"; "जीव जीती जीवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥ ( १६१९,जोग प्रत )"; "वेधीं वेधें जीव वेधियेला । ( १६८४,जोग प्रत )"; "गांठ पडली ठका ठका । ( २२२५ जोग प्रत ) "; "आशय शयन भजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥ ( २३५५ जोग प्रत )"; "रंगी रंगे नारायण ( ३२०१ जोग प्रत )"; "लय लये लखोटा ( ३७२० जोग प्रत )"; "तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥ तुकी तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥".
    अक्षराच्या पुनरावृत्तीने जसा अनुप्रास सजतो तसाच तो एखाद्या संपूर्ण शब्दाच्या परत परत आवृत्त होण्यानेही होतो. पण त्यात उच्चाराच्या साधर्म्यापेक्षा त्या शब्दाला ठसविण्याची प्रक्रिया ज्यास्त होते. भक्तिमार्गात नाम संकीर्तनाची परंपरा आहेच. त्यामुळे विठ्ठल किंवा पांडुरंग शब्द प्रत्येक चरणात योजला तर त्यामुळे तो ठसविला तर जातोच पण त्याला नामसंकीर्तनाचे ही रूप येते. जसे : "विठठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान । विठठल सिद्धीचे साधन । विठठल ध्यान विसावा ॥ विठठल कुळींचे दैवत । विठठल वित्त गोत चित्त । विठठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठठला ॥ विठठल विस्तारला जनी । सप्तही पाताळे भरूनी । विठठल व्यापक त्रिभुवनी । विठठल मुनिमानसी ॥ विठठल जीवाचा जिव्हाळा । विठठल कृपेचा कोंवळा । विठठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठल ॥ विठठल बाप माय चुलता । विठठल भगीनी भ्राता । विठठलेंविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥ ( ४०६४, जोग प्रत ). " विठठल ह्या शब्दाच्या सारख्या येण्याने सर्व जोर "विठठला"वर येतो व वातावरण "विठठल"मय होते. अशाच होणार्‍या परिणामामुळे सध्या कौशल इनामदार जे समूहगीत "मराठी अभिमान गीत" म्हणून गाववून घेत आहेत त्या सुरेश भटांच्या गजलेत "मर्‍हाटी" शब्द इतका सातत्याने येतो की सगळे महत्व "मराठी"वर येते व मग ते खरेच "मराठी अभिमान गीत" वाटू लागते. अशा रचना करण्यात तुकाराम महाराजांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते रचतात : " विठ्ठल गीती गावा विठठल चित्ती घ्यावा । विठठल उभा पहावा विटेवरी ॥ ( ५४२ जोग प्रत ) ." ; "विठठल गीती विठठल चित्ती । विठठल विश्रांती भोग जया ॥( ६४८जोग प्रत )" ; "विठठल टाळ विठठल दिंडी । विठठल तोंडी उच्चारा ॥ ( १०२८ जोग प्रत)"; "विठठल भीमातीर वासी । विठठल पंढरी निवासी । विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादाना विसीं उदार ॥ ( ४११६ जोग प्रत )"; "विठठल विठठल येणे छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥ ( २२१६ जोग प्रत )" ; "विठठल सोयरा सज्जन सांगाती । विठठल हा चित्ती  बैसलासे ॥ ( ४६२ जोग प्रत)"; "विठठाला रे तू उदारांचा राव । विठठला तू जीव या जगाचा ॥ ( २९७ जोग प्रत )" .....वगैरे. कृष्णाच्या नामसंकीर्तनाचा एक अभंग आहे. यातही "कृष्ण" अनुप्रासाने सर्वत्र वावरतो : "कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा ॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरील पैल पारू भवनदीची ॥ कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥". मग अशाच प्रकारचे रचनाकौशल्य तुकाराम महाराज अध्यात्मातल्या काही संदिग्ध कल्पनांना ठसविण्यासाठी करतात. जसे खरे खोटे पडताळण्यात "लटिके" काय काय आहे ते ठसविण्यासाठी ते म्हणतात : "लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरिकीर्तन प्रिय नाही ॥ ( २००० जोग प्रत)" ; "लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यांपे ॥ लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥ लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्यांपे ॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥ लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥ ( २०९६ जोग प्रत ) .". अशाच एका "फटकाळ" ह्या शब्दाला ठसविण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥ तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणें । अनुभवी ये खूणे जाणतील ॥ ( २५२४ जोग प्रत ) ".