मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 4

तुक्याची नॅनो----४

४) "न", "ना", "नाही" ची नॅनो :
वर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९,१२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी "दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात "न" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.
तुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर "न" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा "न" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ।; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ।; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥
न ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, "न करणे" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. . "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.). ........( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा