------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ३१
----------------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
बातमी ( ३१ ) ---- बायकोला “नीट स्वयपाक कर” म्हणणे हा काही तिचा छळ नाही ---हायकोर्टाचे म्हणणे !
----------------
सुगरणीबाई थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥1॥
क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितेंचि वोंगळ नास केला ॥ध्रु.॥
हिऱ्याचिया पेटे आणियेल्या गारा | खांदी शिरी भारा व्यर्थ वाहे ||
दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥2॥
कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥3॥
रत्नाचा जोहरी रत्नचि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥4॥
तुका ह्मणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥5॥
-------------
सगळ्या नवऱ्यांना अंमळ दिलासा देणारा हा हायकोर्टाचा निर्णय आहे, की बायकोला “नीट स्वयपाक कर” म्हणणे हा काही तिचा छळ नव्हे ! हा निर्णय देताना न्यायाधीश हे तुकाराम महाराजांच्या प्रभावाखाली आले की काय असे वाटावे असा हा तुकारामाचा अभंग आहे :
अगे बाई, सिद्ध असलेल्या स्वयपाकाच्या भाजीमध्ये पुरणपोळीचा गुळ वगैरे घालून नाश केलास, अशी तू फार शहाणी आहेस. खिरीमध्ये हिंग व दुधामध्ये बोळ घालून चांगल्या पदार्थाचा नाश केलास. हिऱ्याच्या पेटीमध्ये बाजारात जर गारा भरून ती खांद्यावर व डोक्यावर वागविली तर ते वागवणे व्यर्थ जाते. दळणाच्या वेळी भरड मोठे दळून जाते भरले पण चांगल्याचा वाईटपणाने नाश केलास. जर एखाद्यापाशी कापूर असून त्याचे शेजारी लसूण बाळगिली तर ते उलटे त्रासदायक होते. जो कोणी रत्नपारखी आहे त्यासच रत्नाची पारख असते व इतर लोक ते पाहू म्हणून नुसते हातात घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, जर चांगला योग घडला तर ठीक आहे, नाही तर ओंगळ लोकांच्या तोंडावर थुंकावे हे बरे ! ---जोग प्रत
-----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा