बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८


तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे गमक : यमक
-------------------------------------------------
      तुकाराम महाराजांचे एकूण अभंग साधारण ४५०० च्या आसपास आहेत. प्रत्येक अभंगात सरासरीने ५.६ खंड किंवा चौक आहेत. म्हणजे पूर्ण गाथेत २५ हजारावर खंड किंवा चौक आहेत. प्रत्येक खंडात किंवा चौकात दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणाअखेर यमक असते. हा नियम जवळ जवळ काटेकोरपणे पाळलेला आहे. त्यामुळे २५ हजारावर यमक जोड्या तुकाराम महाराजांच्या गाथेत आढळतात. एवढ्या प्रचंड प्रमाणात यमके जुळवणे हे प्रचंड कवित्वाचे, प्रतिभेचे गमक आहे.
      यमक म्हणजे कवितेत ठराविक ठिकाणी त्याच अक्षरांची योजना, पण वेगळ्या अर्थाने, ही यमकाची व्याख्या आहे. ( व्याकरणाच्या पुस्तकात मात्र, व्याख्या अशी : एक शब्दालंकार. कवितेच्या एका चरणात जी अक्षरे ज्या क्रमाने संनिध असतील त्याच क्रमाने दुसर्‍या चरणात त्याची आवृत्ती होणे. ). उदाहरण म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिलेच मंगलाचरण पहा : "सुंदर ते ध्यान । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥ तुळसीहार गळां । कासे पीतांबर । आवडे निरंतर । ते चि ध्यान ॥ध्रु॥ मकरकुंडले । तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि । विराजीत ॥ तुका म्हणे माझे । हे चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख । आवडीने ॥" इथे यमक-जोड्या आहेत : विटेवरी-कटावरी ; पीतांबर-निरंतर ; श्रवणीं-कौस्तुभमणि ; सुख-श्रीमुख.
      इंग्रजीत एखाद्या घटनेला काही कारण-मीमांसा नसेल तर "विदाउट र्‍हाइम ऑर रीझन" असं म्हणण्याचा प्रघात आहे. म्हणजे घटनेला ( शब्दाला ) एक तर कारण/तर्क असावे किंवा तसाच उच्चार होणारे यमक ( र्‍हाइम ) असावे. अर्थातच "र"ला "र" किंवा "ट"ला "ट" असं कवितेत जोडलेलं असतं तर आपण त्याची बालिश म्हणून "टर" उडवतो. कां योजतात कवि हे "यमक" नावाचे शब्दालंकार ? एक तर ह्याने भाषेची शोभा वाढते. म्हणून तर त्याला अलंकार म्हणतात. दुसरे, सारख्या उच्चारामुळे दोन्ही ठिकाणी एक सारखेपणा ( सामिप्य ) येतो. आणि दोन्ही ठिकाणी जे म्हणणे आहे ते अगदी "समीप" आल्यासारखे होते. वरील उदाहरणातल्या मंगलाचरणात, "आवडीने श्रीमुख पाहीन, हेच माझे सर्वसुख आहे", हे सांगणे "सुख-श्रीमुख", ह्या यमकाने नेमके सांगितल्या जाते. शिवाय सारख्या उच्चारामुळे कवितेत एक कर्णमाधुर्य येते. दोन चरणात सामिप्य आल्याने आघातप्रधान रचनात ( जसे अभंग, ओवी ) स्तब्धता येऊन नंतरचे आघात उठून येतात.
      सर्वच भाषात यमक हे शब्दातल्या शेवटच्या ( अंत्य ) अक्षराची पुनरावृत्ती करून होते. ह्या योगायोगाचे/योजनेचे एक खास वैशिष्टय आहे. प्रत्येक शब्दात ( सिलॅबल ) दोन तीन किंवा अधिक अक्षरे ( फोनेम्स ) असतात. पैकी शब्दाचा मूळ गाभा ( न्यूक्लियस) असतो त्याचा उच्चार प्रामुख्याने होतो, व आद्याक्षर ( ऑनसेट ) व अंत्याक्षर ( कोडा ) ह्यांचा उच्चार कमी होतो असे उच्चारशास्त्र ( फोनॉलॉजी ) सांगते. परंतु भाषा बोलण्याची जी ढब असते त्यात वाक्याच्या शेवटच्या अक्षरावर जोर येतो व हा जोर पूर्ण विरामाचे काम करतो. बोलताना आपल्याला जेव्हा एखाद्या कल्पनेवर विशेष लक्ष वेधून घ्यायचे असते तेव्हा बहुतेक करून आपण पहिल्या शब्दाच्या पहिल्या अवयवावर ( अक्षरावर ) जोर देत असतो. जसे: "म्हणून" ने सुरुवात होणार्‍या वाक्यात आपण "म्ह"हे ठासून म्हणतो. ह्या दृष्टीने कवींनी लक्ष्य वेधून घेण्यासाठी खरे तर आद्याक्षरावर जोर देत आद्याक्षरावरून सुरू होणारी यमके साधायला हवीत. "मन करा रे प्रसन्न" ह्या प्रसिद्ध अभंगात असे साधले आहे : जसे : "मनें प्रतिमा स्थापिली । मनें पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥"; किंवा "अवघ्या भूतांचे । जाले संतर्पण । अवघीच दान । दिली भूमी ॥ अवघाचि काळ । दिनरात्र शुद्धि । साधियला विधी । पर्वकाळ ॥ अवघीच तीर्थे । व्रते केले त्याग । अवघेचि सांग । झालें कर्म ॥ अवघेचि फळ । आले आम्हा हाता । अवघेचि अनंता । समर्पिले ॥ तुका म्हणे आता । बोलो अबोलणे । कायावाचा मने । उरलो नाही ॥". पण परंपरेने सर्वच कवितात शेवटच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराच्या सारखे असण्याने यमक साधल्या जाते. कारण कवितेत चरणाचा विश्राम, शेवट, दाखविणारा शेवटचा शब्द असतो व त्यातले शेवटचे अक्षर हे आघात करते. परंपरेने अभंग, ओवी गाताना पहिल्या तीन चरणातल्या उपांत्य अक्षरावर जोर देतात तर चौथ्या चरणात आद्याक्षरावर जोर देतात. उदाहरणार्थ जोर दिलेले अक्षर ठळक केलेला हा अभंग पहा : "हे विश्वचि माझे र । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना राचर । पण जाहला ॥". ही आघाताची परंपरा पाहिली तर ज्या ठिकाणी जोर देतात त्या ठिकाणच्या अक्षरांची पुनरावृत्ती करीत यमक जुळविले तर ते ज्यास्त प्रभावी ठरावे. पण यमक हे परंपरेने शेवटच्या शब्दानेच पुनरावृत्ती करीत जुळवतात. त्याने व्यक्त केलेल्या विचारांचे आंदोलन-तत्व व यमकामुळे स्तब्धता असा परिणाम साधला जातो.
      फक्त शेवटचे एकच अक्षर जुळवलेल्या यमकाला इंग्रजीत पुल्लिंगी यमक म्हणतात व दोन व ज्यास्त अक्षरे जुळवलेल्या यमकाला स्त्रीलिंगी यमक म्हणतात, असे मार्जोरी बोल्टन ही तिच्या "द ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री", ह्या पुस्तकात दाखवते खरी, पण प्रत्यक्षात बहुतेक यमके एकच अक्षर जुळवलेली असतात. ( पुरुष, स्त्री यमके असा भेद करण्यामागे लिंग-सादृष्यता असावी ! ) . बर्‍याच वेळा आपला समज होतो की यमके ही यांत्रिकतेने, शेवटचे अक्षर तेच ठेवायचे व अगोदरचे क,,,...असे क्रमाने बदलत करतात व हे "काम" बरेच सोपे असावे. पण लक्षात घ्या, इंग्रजीत "ऑरेंज" ( Orange ) ह्या शब्दाला अजूनही यमक साधणारा शब्द मिळालेला नाही. आणि ही नुकताच दहा लाखावा शब्द डिक्शनरीत नमूद करणार्‍या भाषेची परिस्थिती, तर केवळ ६०/६५ हजार शब्द असणार्‍या मराठीत यमकांची हालत कठीणच ! उदाहरण म्हणून व आपलीच परीक्षा घेण्यासाठी एक शब्द घेऊ : "आर्त". ज्ञानेश्वरांनी "विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले" ह्या अभंगातून म्हटलेला हा शब्द : आर्त. शिवाय आपण म्हणतो की तुकाराम महाराजांनी आपल्या सबंध काव्यात भक्तीची जी "आर्तता" दाखविली आहे ते वर्णन करणारा हा शब्द : आर्त. आता शेवटचा "र्त" कायम ठेवीत अगोदरचा "आ" क्रमाक्रमाने क,,,,....असा बदलत बघा काय शब्द मिळतात ते ! मला बर्‍याच प्रयत्नांती मिळाले : कीर्त ; तूर्त ; अमूर्त ; यथार्त ; शर्त ; ....बस्स. आता तुकाराम महाराजांनी ह्या "आर्त"शी कोणती यमके जुळविलीत ती पहा : पदार्थ ; समर्थ ; सर्वत्र ; मात्र ; आर्त ; आर्तभूत ; पात्र ; गीत ; त्वरित ; मात. एक दोन अभंग पहा ज्यात हे शब्द आर्तशी यमक म्हणून जुळवलेले आहेत . जसे : "पुरवी मनोरथ । अंतरीचे आर्त । धायेवरि गीत । गाईं तुझे ॥" ( ३८८८, देहू प्रत ) . "तुका म्हणे ऐसे । अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित । नारायणा ॥" ( ३८९६, देहू प्रत ) . आर्त हा शब्द यमक जुळवायला असा कठिण जातोय हे पाहून मग एखाद्या हुशार संपादकासारखे तुकाराम महाराज आर्त अशा ठिकाणी दुसर्‍या शब्दाने जोडुन घेतात की तिथे मग तिथे दुसर्‍या जोडलेल्या शब्दाला यमक जुळवावे लागते, आर्तला नाही. जसे: "नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटीं ॥ "( १६५३ देहू प्रत ); किंवा "आर्तभूत माझा । जीव जयांसाठी । त्यांच्या जाल्या भेटी । पायांसवे ॥"( १९५८, देहू प्रत ). तर यमक जुळवणे हे काही तसे यांत्रिक काम नाही. प्रतिभेची परिक्षा घेणारेच ते असते !
      तुकाराम महाराजांना त्यांच्या हयातीत व त्या नंतर आजतागायतही बर्‍याच समीक्षकांनी त्यांना यमकावरून हिणवले आहे. काही द्वेष्टे म्हणत की तुकाराम महाराजांनी भिंतीवर यमक-जोड्या लिहिलेल्या असत व त्यावरून ते कवने करीत . ( तुकाराम चरित्र--ले: पु,मं.लाड ) . भिंतीवर यमके लिहून मग ती अभंगात आणायची हे यांत्रिक काम किती अवघड आहे हे आपण अजून एका नवीन पद्धतीने तपासून बघू. भिंतीवर लिहिण्यापेक्षाही सोपी युक्ती करून यमके जुळवण्याची एक यमक-पटटी तयार करू. ही यमक पटटी अशी दिसेल . ( चित्र )
      ह्या यमक पटटीची ठेवण अशी असेल. समजा आपल्याला "हरी" ह्या शब्दाशी यमके जुळवायची आहेत. तर शेवटच्या खिडकीत "ई" आणू. ( अ,,,ई...ही पटटी वर सरकवीत ) त्याच्या डावीकडच्या खिडकीत "र" आणू. ( ह्या खिडकीतली पटटी सरकवीत ). ह्या च्या डावीकडच्या खिडकीत "-"आणू. ह्याच्या डावीकडच्या खिडकीत "ह" आणू. आता खिडकीतला शब्द झाला "ह-र-ई"किंवा हरी. आता यांत्रिकपणे आपल्याला हरी शी जुळणारी यमके बनवायची आहेत. उजवीकडच्या शेवटच्या दोन खिडक्यातली र व ई आपण हलवणार नाही. उजवीकडून चौथी खिडकी आपण "ह"चीच ठेवली व त्याच्या पुढच्या ( उजवीकडून तिसरी ) खिडकीत अनुक्रमे अ, , , , ,...अ: पर्थंत असे आणले तर शब्द बनतील : हरी, हारी, हिरी, हीरी, हुरी, हूरी, हेरी, हैरी, होरी, हौरी, हंरी, ह:री" ह्यापैकी  प्रत्यक्षात शब्द ( अर्थ असलेले) असतील : हारी, हिरी, होरी. व बाकीचे निरर्थक म्हणून सोडून द्यावे लागतील. आता हरी तला ह बदलून "क"पासून सुरुवात केली तर "करी, कारी, किरी, कीरी, कुरी, कूरी, केरी, कैरी, कोरी, कौरी, कंरी, क:री" अशी अजून नवी यमके बनतील, ज्यातील फक्त : कारी, किरी, कैरी, कोरी हे शब्द ( अर्थ असलेले) म्हणून वापरता येतील. आता पुढे "ख", मग ग....पाच मिनिटात ही यमक-पटटी फेकून द्याल. शिवाय शब्द काय मिळाले ? आता तुकाराम गाथेतून तुकाराम महाराजांनी "हरी"ला जुळवलेली ही यमके पहा : विटेवरी ; साजिरी ; कटावरी ; शेजारी ; घरी ; दुरी ; गिरी ; क्षणभरी ; वरी ; नरनारी ; उच्चारी ; न्यारी ; चोरी ; येरी ; नारी ; कुमरी ; कुसरी ; वारी ; सामोरी ; बाहेरी ; खरी ; निलाजरी ; थोरी ; संसारी ; परी ; आजिवरी ; आहारी ; एथवरी ; ह्रदयमंदिरी ; उरी ; दोरी ; चारी ; झडकरी ; वेव्हारी ; लहरी ; वरि ; अंतरी ; बहुवरी ; भवसागरी ; नरहरी ; नारी ; गिरी ; चारी ; मुरारी ; उत्तरी ; जोहरी ; कुसरी ; विवराभितरी ; पुरी ; दुसरी ; यावरी ; म्हणविल्यावरी ; तुजवरी ; सरी ; सूत्रदोरी ; दारी ; शिरी ; धरी ; सत्ताधारी ; सारासारी ; चराचरी ; घातलियावरी ; लवकरी ; तैशापरी ; सोयरी ; संसारी ; खंडावरी ; परी न करी ; आभारी ; निमाल्यावरी ; इतक्यावरी ; कैवारी ; वैरी ; पाठीवरी ; मारी ; भक्तावरी ; द्वारी ; लौकरी ; तुटलियावरी ; लवकरी ; डोळेभरी ; कस्तुरी ; दैन्यवरी ; वारकरी ; भारी ; जरी ; सरोवरी ; नानापरी ; गरुडपारी ; सिदोरी ; खांद्यावरी ; भाकरी ; निवारी ; निर्धारी ; सामोरी.....अबब ! केवढी ही हरी ला जुळणारी यमके ! मी ही यमके संगणकावर शोधली तरी ही ११४ यमके शोधता शोधता मी व संगणक दमलोच !. तुम्ही तर नुसते वाचूनच दमला असाल. नुसती यमक-पटटीच काय कोणी संगणकावर प्रोग्रॅम करून दिला असता तरी एवढी यमके जुळवणे असंभवच होते. अशी अचाट शक्यता फक्त तुकाराम महाराजांची प्रतिभाच करू जाणे. कुणी नास्तिक हरी ची नुसती ही यमके वाचेल तरी तो सहजी कबूल करेल की हरी सर्वत्र भरून आहे री ! हरी !
      वर आपण पाहिले की काही शब्द ( जसे : आर्त , ब्रह्म वगैरे ) हे यमक जुळवण्यास कठिण असल्याने ते असल्या ठिकाणी अभंगात घ्यावे लागतात की जिथे यमक जुळवणे अगत्याचे नाही. जसे : पहिले चरण किंवा चौथे चरण. चौथा चरण चारच अक्षरांचा असल्याने, म्हणजे अल्पाक्षरी असल्याने त्यावर फक्त आसूडासारखा फटका मारणारा निष्कर्षाचा शब्द घ्यावा लागतो. त्यामुळे यमकासाठी ( न जुळवण्यासाठी ) पहिलाच चरण राहतो. ह्या अडचणीचा एक फायदा असा की अवघड अशा कल्पना, अवघड शब्दानिशी, पहिल्याच चरणात घेतल्याने मूळ गाभ्यालाच हात घातल्यासारखा हा पहिला चरण होतो. व आशय दृष्टीने अभंगाची सुरुवातच भारदस्त अशी वैचारिक होते. गाथेत अशी उदाहरणे खूप ठिकाणी पहायला मिळतात. उदाहरणार्थ : "अद्वयचि द्वय । झालेचि कारण । धरिले नायायणे । भक्तिसुख ॥"(२८७९, जोग प्रत ); "अधमाचे चित्त । अहंकारी मन । उपदेश शीण । तया केला ॥ ( ३२३६, जोग प्रत )"; "अज्ञानाची भक्ती । इच्छिती संपत्ती । तयाचिये चित्ती । बोध केचा ॥ ( ३१५०, जोग प्रत )"; "आयुष्य मोजावया । बैसला मापारी । तूं का रे वेव्हारी । संसाराच्या ॥ ( २१०८, जोग प्रत )"; "क्षोभ आणि कृपा । मातेची समान । विभाग जतन । करूनि ठेवी ॥ ( २७५२,जोग प्रत )"; "संतांची उच्छिष्टें । बोलतो उत्तर । काय म्या गव्हारे । जाणावे हे ॥ ( ५१८, जोग प्रत )"; "मॄत्युलोकी आम्हा । आवडति परी । नाही एका हरिनामाविण ॥ ( २२४, जोग प्रत, इथे तिसरा चरण "हरि"नंतर तोडला आहे. ) "; "माझिया मी पणावरी । पडो पाषाण । जळो हे भूषण । नाम माझे ॥ ( २०६२, जोग प्रत )"; "भेटीलागी जीवा । लागलीसे आस । पाहे रात्रंदिस । वाट तुझी ॥ ( २०४८, जोग प्रत ) ". ह्या उदाहरणात आपण पाहू शकतो की अभंगाच्या मूळ विषयास पहिल्याच चरणात ठाव घेण्यात येतो व त्याने परिणामकारकता ज्यास्तच वाढते. शिवाय दोन चरणात यमक, पहिल्या चरणातल्या यमकविना योजनेनंतर आल्याने आंदोलन तत्व ज्यास्तच खुलून दिसते.
      मार्जोरी बोल्टन ने यमकांचा अजून एक प्रकार सांगितलाय. अपूर्ण यमक किंवा विभक्त यमक. तुकाराम महाराजांच्या बर्‍याच अभंगात हे यमक दिसून येते. इथे अगदी कमी कमी अक्षरांचे चरण असणे ही अभंगाची रचना अथवा घाट अशा अपूर्ण यमकांसाठी जबाबदार असावी हे सहजी लक्षात येते. विशेषत: शेवटच्या चरणात चारच अक्षरे योजावयाची असल्याने तिसर्‍या चरणाचे शेवटचे दोन अक्षरी यमक व चौथ्या चरणाची चार अक्षरे असे मिळून एक सहा अक्षरी शब्द दिला तर सर्वच साधल्या जाते. तिसर्‍या चरणाचे यमक व चौथ्या चरणाचे चार शब्द. फक्त म्हणताना यमकानंतर थोडेसे थांबले की झाले. उदाहरणार्थ : "मृत्युलोकी आम्हा । आवडती परि । नाही एका हरिनामाविण ॥ ( २२४ जोग प्रत, हरि हे परि चे यमक आहे हे हरि-नामाविण असे फोडले तर लक्षात येते.)" ; "व्यभिचार माझा । पडिला ठाऊका । न सर ती लोकांमाजी आले ॥ ( १० देहू प्रत. इथे ठाऊका ला यमक जुळते लोकां, पण पूर्ण शब्द लोकांमाजी असा असल्याने तो यमकासाठी तोडलेला आहे. )." ; "तुका म्हणे येणे । जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायीं ॥ ( १४, देहू प्रत, इथेही अनंताचिये पैकी अनंता वर यमक जुळवलेले आहे. )" ; "याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥ ( १६ देहू प्रत, इथे सहा अक्षरांचा चरण केला तर सांडि व येले तोडावे लागते व परपुरुषाशी मधल्या पर शी भरतार शी यमक होते, ) "; "तुका म्हणे जालो । उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥ ( १९ देहू प्रत, इथेही गोवळ्यासवे तोडून मोकळ्या शी यमक जुळते.) " ; "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ( २७३ देहू प्रत, इथे धीराविण तोडून धीरा व हिरा ही यमक जोडी चांगली जमते.)" ; "खासेमध्ये धन पोटासी बंधन। नेणे ऐसा दानधर्म काही ॥ ( ४५३ देहू प्रत, इथे दानधर्म तोडून दान यमक बनते बंधन शी .)"; "तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ती ॥ ( ७९१, देहू प्रत, इथे विष्णु व शिवा वेगळे केल्यावर वाचुनि हे विष्णु ला यमक जुळते तर विष्णुशिवा ला देवा हे यमक जुळते. )" ; "जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥ ( ३६९३, देहू प्रत, इथे लोकांसारिखा तोडून तुका ला लोकां चे यमक बनते." ; "आता परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥ ( ४१२०, देहू प्रत, इथे लोकांवेगळा तोडावे लागते.) ". उस्फूर्त प्रतिभेशी जी रोमांचकारी नाळ जोडलेली असते तिला जरा ही धक्का न लावता इथे अपूर्ण अथवा अर्ध-यमकाची ही कलाकुसर तुकाराम महाराजांच्या कवित्वाची रोख पावतीच आपल्याला देते. शिवाय तुकाराम महाराज लिखित कविता करीत असत हा कयासही इथे संभवनीय़ ठरतो.
      ध्वनीच्या सारखेपणामुळे जसा यमक हा शब्दालंकार घडतो व तो तुकाराम महाराज आपल्या पद्यरचनेत यथेच्छ वापरतात, तसाच ध्वनीच्या सारख्या व पुनरावृत्तीत होणार्‍या उच्चारामुळे निर्माण होणारा एक खासा "लोकोच्चार" तुकाराम महाराज मुबलक प्रमाणात वापरतात. ही एक खाशी लकब असून विशिष्ट प्रांतीयपण हिला असते. जसे: पंजाबी लोक द्विरुक्ती करीत एखादा शब्द वापरतात. जसे: शादी-वादी ; खाना-पीना ; दारू-शारू ; रोना-धोना ; वगैरे.  मूळ क्रियेच्या शब्दाला यमक देत अशा जोड्या बनवण्यात पंजाबी लोक माहिर-फाहिर असतात. नेहमीच्या बोलण्यातल्या ह्या ढबीला एक प्रकारचे लोककलेचे रूपच मिळते. द्विरुक्ती मुळे मुद्दा ठसतो, उच्चार साधर्म्यामुळे लक्ष वेधल्या जाते, नाद-माधुर्य येते, तर नेहमीच्या वापरातल्या ह्या लकबीमुळे काव्याला संवादमयता लाभते. त्याचबरोबर हे शब्द मूळ आवाजाचेच वर्णन करणारे वाटतात. ना.गो.कालेलकर "ध्वनिविचार" ह्या पुस्तकात अशा शब्दांना ध्वन्यनुकारी शब्द म्हणतात ( इंग्रजीत ओनोमाटोपिया ) . शब्दांनी व्यक्त करण्याच्या कल्पनेला साह्यभूत असे ध्वनी अशा शब्दात वापरलेले असतात. उदाहरणार्थ : पंख; फडत्कार, मासा, कोकिळ ( इंग्रजीतला कक्कू ), कावळा, चिमणी, कावकाव , चिवचिव वगैरे. तसेच नुसते आनंद म्हटल्याने जो बोध होतो तो आनंदी-आनंद या द्विरुक्तीने अधिक परिणामकारक बनतो. अशी उदाहरणे तुकाराम महाराजांच्या गाथेत मुबलक प्रमाणात दिसतात व ते आपल्या वेगळेपणाने आपले लक्ष वेधून घेतात. जसे : "तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥" ; "सोंवळ्या-ओवळ्या  राहिलो निराळा । पासूनि सकळां अवघ्या दुरीं ॥" ; "तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदु:ख जीव भोग पावे ॥" ; "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ "; "मनाच्या तळमळे । चंदने ही अंग पोळे ॥"; "होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥"; "लये लये लखोटा । मूळबंदी कासोटा ॥"; "बहु केली वणवण । पायपीटी जाला सीण ॥ "; "तुका म्हणे येर दगडाची पेवें । खळखळ अवघे मूळ तेथे ॥"; "जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥"; "नानामृत कल्लोळ । वृंदे कोंदली सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥"; "जनकाची नंदीनी दु:खे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥"; "मनीं धृढ धरि विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणिवेस रे ॥ "; "जे का रंजले-गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । "; "बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अंगी कांटीवरी मारविले ॥"; "पावलो पावलो । देवा पावलो रे ॥"; "भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट । चाले झडझडा उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥": ...वगैरे. ( विस्तारभयापोटी चरण न उद्‌धृत करता नुसते असे लोकोच्चारी शब्द वानगीदाखल आता देत आहे. ते असे : येणे-जाणे ; परता-परता ; सासू-सून ; काज-काम ; धांवति-धांवति ; बहुती बहू : बोभाटा; बाप-माय ; जाणीव-नागवण ; जाणीव-नेणीव; मोलाची महिमा ; फजीती फुका ; प्रवृत्ती-निवृत्ती; धांगडा-धिंगा ; बोध-बिरडे ; पाहे-बाहे ; ठायी ठायी ; जन धन तन ; ऋद्धि-सिद्धि ; शुभाशुभ ; हर्षामर्ष ; जीव-शीव ; कर्म-अकर्म ; पाटी-पोटीं ; थोडें-फार ; अंत-पार ; नव्हे नव्हे ; बहु थोडे ; ठकावला ठायी ; लाभ हानी ; देखीचा दिमाख ; जीवाचे जीवन ; वेळ-अवेळ ; भीड-भार ; दान-धर्म-शीळ ; शिणले-भागले ; तान-भूक : घात-पात ; रानी-वनी ; घडी घडी ; पडपडताळा ; क्षराक्षरावेगळा ; ठावा ठाव ; दुमदुमले ; खेळीमेळी ; नटनाट्य ; कर्मधर्म ; जैसा तैसा ; लीनदीन ; जें जें तें तें ; जप तप अनुष्ठान ; बोलोंचालों ; तुकी तुकला ; काढाकाढी ; पाठी-पोट ; कोंडा-कणी ; वटवट ; जन वन ; सडा संमार्जन ; देणे घेणे ; कर कर ; बाळ बडिवार ; आशा पाश ; भेदा भेद ; टाळ घोळ ; उभा उभी ; रात्रंदिस ; दिवस रजनी ; हाड हाडी ; ताळा वाळा ; चाळवा चाळवी ; तोंवरी तोंवरी ; रूप नाव ; आकार विकार ; निर्गुण सगुण ; चरफडे चरफड ; धिंदा धिंद ; गाठ पडली ठका ठका ; टाळाटाळी ; साटो वाटी ; यावा गांवा ; खण खणां ; भेदा भेद ताळा ; तडा तोडी ; गदारोळ ; फाडा फाडी ; बुर बुर ; घस घस ; घडघडाट ; थू थू ; डग मगी ; झाडा पाडा ; ठेला ठेली ; वादा वादी ; बळ जोडा ; कौडी कौडी साठी ; सोईरे-धाईरे ; ठेवा ठेवी ; बुट बुट ; भव भय ; आहाचेच आहाच ; भड उभंड ; आम्ही तुम्ही ; हीनवर बिजवर ; ...वगैरे. आवाजाचे उच्चाराचे कौतुक असणारे हे शब्द बोली भाषेत प्रामुख्याने वापरले जातात. ते काव्यात आणल्याने काव्याला साक्षात बोलीचे, संवादाचे  स्तर आपोआप विणल्या जातात व लौकिक अर्थाने काव्य वाचणार्‍याला ते "आपले" वाटू लागते.
      यमक जसे शेवटच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराच्या आवर्तनाने तयार होते व ते जसे उच्चाराच्या साधर्म्यामुळे लक्ष वेधून घेते  तसाच अनुप्रास हा अलंकार एका अक्षराच्या बर्‍याच वेळा म्हणण्याने तयार होतो हे आपणास माहीत आहेच. लहान मुले हा अलंकार "चंदू के चाचाने , चंदू की चाची को,  चांदनी रातमे, चांदी के चमचसे, चटणी चटायी." असे मोठ्याने म्हणून दाखवतात.  हा अलंकारही उच्चाराच्या चमत्कृती मुळेच तयार होतो. ह्यामुळे काव्य लक्षात राहण्याजोगे होते. अभंग ही रचनाच अनुप्रास साधण्यास फार सोयीस्कर आहे. कारण यमकामुळे चार चरणांपैकी दोन चरणात आधीच अक्षराची द्विरुक्ती झालेली असते. आता फक्त पहिल्या व चौथ्या चरणात यमकाचेच अक्षर असलेला शब्द योजला की झाला अनुप्रास अलंकार. जसे : "उजवला काळ । कुळा लाविला विटाळ ।( २०६ जोग प्रत )"; "मानामान मोह माया मिथ्या ( १९९ जोग प्रत )" ; "दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥ ( २९३ जोग प्रत )"; "हिरा हिरकणी । कांढी आंतुनि अहिरणीं ॥ ( ३६४, जोग प्रत )"; "फळले ते लवे भारे । पिक खरे आले तईं ॥ ( ५०४ जोग प्रत )"; "अनुभवे अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरावला मनुं ठायीं ॥ ( ७८३, जोग प्रत )"; "जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भुषणू नारायण ॥ सुखाचा सांगात । अंतकासी अंत । निजाचा निवांत । नारायण ॥ गोडाचेहि गोड । हर्षाचेही कोड । प्रीतीचाही लाड । नारायण ॥ भावाचा निजभाव नावाचाही नाव । अवघा पंढरी राव । अवतरलासे ॥ तुका म्हणे जें हे साराचेही सार । माझा अंगीकार तेणें केला ॥ ( १०९०, जोग प्रत )"; "अनंता अरूपा अलक्षा अच्युता ( १२५६ जोग प्रत )"; "भला भला पुंडलिका । मानलासि जनलोकां । ( १४०९, जोग प्रत )"; "जीव जीती जीवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥ ( १६१९,जोग प्रत )"; "वेधीं वेधें जीव वेधियेला । ( १६८४,जोग प्रत )"; "गांठ पडली ठका ठका । ( २२२५ जोग प्रत ) "; "आशय शयन भजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥ ( २३५५ जोग प्रत )"; "रंगी रंगे नारायण ( ३२०१ जोग प्रत )"; "लय लये लखोटा ( ३७२० जोग प्रत )"; "तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥ तुकी तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥".
      अक्षराच्या पुनरावृत्तीने जसा अनुप्रास सजतो तसाच तो एखाद्या संपूर्ण शब्दाच्या परत परत आवृत्त होण्यानेही होतो. पण त्यात उच्चाराच्या साधर्म्यापेक्षा त्या शब्दाला ठसविण्याची प्रक्रिया ज्यास्त होते. भक्तिमार्गात नाम संकीर्तनाची परंपरा आहेच. त्यामुळे विठ्ठल किंवा पांडुरंग शब्द प्रत्येक चरणात योजला तर त्यामुळे तो ठसविला तर जातोच पण त्याला नामसंकीर्तनाचे ही रूप येते. जसे : "विठठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान । विठठल सिद्धीचे साधन । विठठल ध्यान विसावा ॥ विठठल कुळींचे दैवत । विठठल वित्त गोत चित्त । विठठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठठला ॥ विठठल विस्तारला जनी । सप्तही पाताळे भरूनी । विठठल व्यापक त्रिभुवनी । विठठल मुनिमानसी ॥ विठठल जीवाचा जिव्हाळा । विठठल कृपेचा कोंवळा । विठठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठल ॥ विठठल बाप माय चुलता । विठठल भगीनी भ्राता । विठठलेंविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥ ( ४०६४, जोग प्रत ). " विठठल ह्या शब्दाच्या सारख्या येण्याने सर्व जोर "विठठला"वर येतो व वातावरण "विठठल"मय होते. अशाच होणार्‍या परिणामामुळे सध्या कौशल इनामदार जे समूहगीत "मराठी अभिमान गीत" म्हणून गाववून घेत आहेत त्या सुरेश भटांच्या गजलेत "मर्‍हाटी" शब्द इतका सातत्याने येतो की सगळे महत्व "मराठी"वर येते व मग ते खरेच "मराठी अभिमान गीत" वाटू लागते. अशा रचना करण्यात तुकाराम महाराजांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते रचतात : " विठ्ठल गीती गावा विठठल चित्ती घ्यावा । विठठल उभा पहावा विटेवरी ॥ ( ५४२ जोग प्रत ) ." ; "विठठल गीती विठठल चित्ती । विठठल विश्रांती भोग जया ॥( ६४८जोग प्रत )" ; "विठठल टाळ विठठल दिंडी । विठठल तोंडी उच्चारा ॥ ( १०२८ जोग प्रत)"; "विठठल भीमातीर वासी । विठठल पंढरी निवासी । विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादाना विसीं उदार ॥ ( ४११६ जोग प्रत )"; "विठठल विठठल येणे छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥ ( २२१६ जोग प्रत )" ; "विठठल सोयरा सज्जन सांगाती । विठठल हा चित्ती  बैसलासे ॥ ( ४६२ जोग प्रत)"; "विठठाला रे तू उदारांचा राव । विठठला तू जीव या जगाचा ॥ ( २९७ जोग प्रत )" .....वगैरे. कृष्णाच्या नामसंकीर्तनाचा एक अभंग आहे. यातही "कृष्ण" अनुप्रासाने सर्वत्र वावरतो : "कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा ॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरील पैल पारू भवनदीची ॥ कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥". मग अशाच प्रकारचे रचनाकौशल्य तुकाराम महाराज अध्यात्मातल्या काही संदिग्ध कल्पनांना ठसविण्यासाठी करतात. जसे खरे खोटे पडताळण्यात "लटिके" काय काय आहे ते ठसविण्यासाठी ते म्हणतात : "लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरिकीर्तन प्रिय नाही ॥ ( २००० जोग प्रत)" ; "लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यांपे ॥ लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥ लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्यांपे ॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥ लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥ ( २०९६ जोग प्रत ) .". अशाच एका "फटकाळ" ह्या शब्दाला ठसविण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥ तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणें । अनुभवी ये खूणे जाणतील ॥ ( २५२४ जोग प्रत ) ".
      शब्दाच्या ठसविण्याच्या ह्या अनुप्रासी प्रकाराला काही काही गजलकारांनी अवलंबिले आहे हे काही अप्रतीम गजलांच्या अवलोकनावरून दिसून येइल. पैकी "लाभले अम्हास भाग्य, बोलतो मराठी" ह्या मराठी अभिमान गीताची दखल आपण वरच घेतली आहे. बहादुरशहा जफरच्या एका गजलच्या अंदाज वळणाने ( ही गजल अशी : कही मैं गुंचा हुं , वाशुदसे अपने खुद परीशां हूं । कही गौहर हूं, अपनी मौज मे मैं आप गलता हूं ॥ ) तुकाराम महाराज "कैं" ह्या शब्दाचा शब्दोत्सव एका ठिकाणी असा करतात : "कैं वहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥ कैं भोज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥ कैं बसावे वाहनी । कैं पायी अनवाणी ॥ कैं सज्जनासी संग । कैं दुर्जनाशी योग ॥ तुका म्हणे जाण । सुख दु:ख ते समान ॥ ( २०४६ जोग प्रत) ". अशाच "बहु" ह्या शब्दाची व कल्पनेची मजा तुकाराम महाराज अशी देववतात: "बहु नावे ठेविली स्तुतीचे आवडी । बहुत या  गोडी आली रसा ॥ बहु सोसें सेवन केले बहुवस । बहु जाला दिस गोमट्याचा ॥ बहुता पुरला बहुता उरला । बहुतांचा केला बहु नट ॥ बहु तुका झाला बहु निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनिया ॥ ( १६४७ जोग प्रत ) . " असेच "अवघा" ह्या शब्दाचे अवघेपण एका अभंगात असे दाखविले आहे : "अवघ्या भूतांचे केले संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥ अवघाचि काळ दिनरात्र शुद्धी । साधियला विधी पर्वकाळ ॥ अवघाचि तीर्थे मतें केले याग । अवघेंचि सांग जाले कर्म ॥ अवघेचि फळ आले आम्हा हाता । अवघेचि अनंता समर्पिले ॥ तुका म्हणे आता बोलो अबोलणे । काया वाचा मने उरलों नाही ॥".
      जादू, जादूटोणा, किंवा तत्सम करणी करताना जे बोल वापरतात ( जसे: आल्या मंतर कोल्ह्या मंतर छू: ! ; कोल्ह्याची आई कांदे खाई छू: ! ; किंवा इंग्रजीत: आब्रा का डब्रा ! ) त्यांना अर्थ नसला तरी चालतो. पण उच्चाराने शब्द पुनरुच्चारी आणि खूपच प्रभावी असावे लागतात. ऐकताना एक प्रकारचे भारलेपण यावे लागते. जुन्या काळी जी मंत्रविद्या असायची त्यातले काही मंत्र म्हणून बघा. शब्दांचे उच्चार भारदस्त आणि मनावर भूल टाकणारे असतात. काही ज्योतिषी कोणाला शनीची बाधा आहे म्हणून शनीचा मंत्र म्हणायला सांगतात. ( ओम रिम र्‍हिम छिम...). गायत्री मंत्र सुद्धा पहा कसा भारदस्त आहे: ( ओम भुर्व भुवस्य...) . तर अशा अक्षरांचे आवर्तन एक प्रकारे मंत्र किंवा जादूटोणा करण्यासारखे असते. ( अनुप्रासाचा हा प्रभाव चकित करणारा आहे.). काही काही खेळातही विशिष्ट आवाज करण्याने एक वेगळाच परिणाम साधल्या जातो. जसे: हुतूतू ; खो खो; किंवा हिंदीतले कबड्डी . तुकाराम महाराजांच्या काळात अशाच चमत्कारी आवाजांचे खेळ असत : हमामा , हुंबरी , फुगडी फू , वगैरे. असे पुनरावृत्त शब्द काव्यात वापरणे हे एक प्रकारचे जादूई परिणाम साधतात. उदाहरणार्थ : "झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचे गमावी तो पाठी साहे टोला ॥; कोडे रे कोडे ऐका हे कोडे । उगवूनि फार राहे गुंतोनिया थोडे ॥ ; फुगडी फू फुगडी घालिता उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥ ; लये लये लखोटा । मूळबंदी कासोटा ॥ ; तुशी कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठराचारी सहस्त्र मुखावरी हरी । शेष शिणविले ॥ ; हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालिता ठकले पोर । करी येरझार चौर्‍यांशीची ॥ ; काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकले ॥ दादकरा दादकरा । फजीत खोरा लाज नाही ॥ ". हे जादूई शब्द वापरताना तुकाराम महाराजांनी त्याला प्रतिमा रूपके देत अध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. त्या परिणामासाठी शब्दांचे हे आवर्तन व जादूईकरण मंत्रमुग्ध करणारे आहे.
      अभंग रचनेत यमकामुळे आंदोलन तत्व शीतल केल्या जाते हे आपण पाहिले. पण अभंग वा ओवी रचना ही काही फार काटेकोर नियमांनी बाधित नव्हती हेही आपण पाहिले. मग यमक न योजलेल्या रचना गाथेत सापडणे साहजिक आहे. त्यामुळे यमक जुळवण्याचे निरनिराळे प्रयोगही दिसून येतील. यमक जुळवताना उच्चाराप्रमाणे ते जुळवणे रास्तच ठरते. त्यामुळे "क"ला "ख"चे यमक योजणे अगदी सर्रास दिसून येते. उदाहरणार्थ : "घेऊनिया सुखे । नाचेल तुका कवतुके ॥ "; किंवा "तुका म्हणे मज लागलीसे भूक । धावूनि श्रीमुख दावी देवा ॥ "; किंवा "तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥ "; वगैरे. असेच उच्चारानुसारी यमके जुळवताना "त"ला "थ"; "ट"ला "ढ"; "त"ला "न" ; अशी पर्यायी जुळवणी ही तुकाराम महाराज करतात. जसे : "म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आता योनी गर्भवास ॥ ( इथे कदाचित "काकुलती"शी "आता" हे यमक बनू शकते.); "देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुखे एथे नाम आहे ॥ ( इथे "निश्चित"मधल्या "त"ला "एथे" मधला "थ" जुळवला आहे जे उच्चाराने "त"च्या बरेच जवळ आहे.)." ; "दिन दिन शंका वाटे । आयुष्य नेणवता गाढे ॥ ( इथे "ट"ला "ढ" जुळविले आहे)"; "स्मशानी आम्हा न्याहालीचे सुख । या नावे कौतुक तुमची कृपा ॥"; "तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥"; "तुका गातो नामी । तेथे नाही आम्ही तुम्ही ॥( इथे "नामी"शी "आम्ही तुम्ही"चे यमक जुळते ते उच्चार सादृश्यामुळे.); "तुका उभे दारी पात्र । पुरवी आर्त विठोबा ॥ ( इथे खरे तर "आर्त"च्या उच्चाराप्रमाणे "पार्त"ज्यास्त जुळते त्याला अपूर्णत्व देत "पात्र" यमक म्हणून योजले आहे.); "तुका म्हणे तुज काय मागो आम्ही । फुकाचे का ना भी म्हणसी ना ॥ ( इथे "आम्ही"च्या उच्चाराशी "भी" हा जवळचा उच्चार घेऊन यमक साधले आहे)"; "तुका म्हणे मज उभयरूपी एक । सारोनि संकल्प शरण आलो ॥ ( इथे "संकल्प" उच्चारताना "क"हे न्युक्लियस असल्याने त्यात "क"चा उच्चार प्रामुख्याने होतो, म्हणून "एक"शी "संकल्प" हे यमक उच्चारानुसारी संभवनीय होते.)" ; "तुका म्हणे वोहळे । सागराच्या ऐसे व्हावे ॥ ( इथे "ळ"व "व"हे द्रव्य प्रकारचे उच्चार असल्याने ते उच्चारानुसारी यमकात मोडू शकतात )."; "तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥ ( इथे "काय"चा उच्चार ग्रामीण ढबीने "काह्य"असा केला तर "राह्य"हा राहेचा उच्चार-यमक म्हणून चालू शकतो.)" ; "काय करील ते नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाही ॥ ( इथे वरवर विश्वंभर व दारिद्र हे यमक वाटत नाहीत पण म्हणताना दारिदर्‌ किंवा विश्वंभर्‌ असे म्हटले तर ते यमकात बसू शकते.)" ; "तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥ ( इथे इच्छा ला इरसा असे घाईत म्हटल्या गेले तर ते सरिसाशी यमक म्हणून जुळते.) " ; "वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥ ( इथे अनुभवो म्हटले तर ते वाहो शी यमक म्हणून जुळते)" ; "सदैव तुम्हा अवघे आहे हातपाय चालाया ॥ ( आहे ला ग्रामीण ढबीने हाय असे उच्चारले तर ते हातपाय ला यमक म्हणून जुळते )"; "तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो नये ॥ ( इथे आकाश शी तैसे हे कसे काय यमक होते असे गुढार सकृदर्शनी पडते खरे, पण श आणि स चा उच्चाराचा सारखेपणा पाह्यला तर हे यमक म्हणून मान्य होते.) " ; "तुका म्हणे येर द्गगडाची पेवे । खळखळ आवघे मूळ तेथे ॥ ( इथे पेवे व आवघे हे यमक न जुळणारे आहे . कदाचित डिसलेक्सिया वाले जे आवघे ला आघवे म्हणतात त्याने ते यमक वाटते ) "; "तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाही कवणाची ॥ ( इथे यमक नाही )"; "ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥ ( इथेही विना-यमक रचना आहे.)"; "दुर्बळ हे अवघे जननारायणी विमुख ॥ ( इथे जन मधल्या न शी नारायणी चे कच्चे यमक जुळविले आहे.)".
      काही काही ठिकाणी सकृदर्शनी दुसर्‍या तिसर्‍या चरणात यमक नाहीय असे वाटते पण शब्दाची योग्य फोड केली तर यमक दिसून येते. जसे: "तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माऊलीचा ॥ " ( इथे "कान्हा"नंतर यतिभंग केला तर पान्हा व कान्हा हे यमक स्पष्ट होते) ;  "जाणे वर्तमान । परि ते न वारे त्याच्याने ॥" ( इथे "न"नंतर थांबलो तर वर्तमान व न हे यमक दिसते.); "तुका म्हणे मज अवघे तुझे नाम । धूप दीप रामकृष्ण हरि ॥", ( इथे "राम"नंतर थांबलो तर नाम व राम हे यमक स्पष्ट होते.); "तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाही ॥", ( इथे कमाई व विण वेगळे केले तर उपाय व कमाई हे यमक स्पष्ट होते.).
      काही ठिकाणी अनुप्रास साधल्याने यमकाचे नसणे जाणवत नाही. उदाहरणार्थ: "अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥", ( इथे हिरा, गारा, सारिखातल्या र च्या अनुप्रासाने हिरा चे यमक नसल्याचे जाणवत नाही.); "तुका म्हणे माप जाण । दाण्यासवें घेणे देणे ॥", ( इथे तसेच आहे.).
      अंताक्षरी किंवा भेंडया ह्या खेळात शेवटच्या अक्षरापासून आपण वेगळे गाणे म्हणतो. हा एक प्रकारचा यमकाचाच खेळ आहे. एकाखडी किंवा बाळक्रीडेचे अभंग ह्यात शेवटी जे अक्षर येते त्याच अक्षरापासून पुढचा अभंग सुरू करतात, तुकाराम महाराज. वानगीदाखल पहा : "कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥"( ४४९४ देहू प्रत ). आणि ह्या पुढचा अभंग ( ४४९५, देहू प्रत) असा सुरू होतो: "जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥ ". असल्या रचनेत क्रीडेचा भास होतो.
      मौखिक परंपरेत अभंग म्हणणे व तो चांगल्या प्रकारे ऐकू येणे ह्या गोष्टीला अतीव महत्व असते. त्यामुळे तुकाराम महाराजांनी अभंगात गेयता आणण्यासाठी, यमक, अनुप्रास, असल्या शब्दालंकारांचा फार खुबीने व सढळ हाताने वापर केला आहे हे आपल्याला गाथेतल्या रचनांवरून लक्षात येते. तसेच शब्दांचे तोडणे, योग्य ठिकाणी यतिभंग करणे, असल्या सर्जक क्रीडेमुळे अभंगांना अपार गेयता मिळते. बर्‍याचशा शास्त्रीय संगीतातल्या घराण्यात म्हणूनच रागदारीबरोबरच अभंग गायन वा इतर भक्तिसंगीत गाण्याची प्रथा आहे. तसेच शब्दांच्या श्रवण करण्याच्या श्रुतिवैभवात तुकाराम महाराजांनी फार मोलाची भर घातली आहे. ह्या विषयावर "तुकाराम महाराजांचे श्रुतिवैभव" हा स्वतंत्र लेख मी लिहिलेला आहे. त्याची थोडक्यात माहीती अशी की तुकाराम महाराजांच्या गाथेत ज्या यमक जोडया योजलेल्या आहेत ते सर्व शब्द प्रामुख्याने ( ८० टक्के) न, , , अशा अनुनासिकांनी शेवट होणारे शब्द-यमक आहेत. मराठीत आपण शेवटच्या अक्षरावर जोर देत असतो. त्यामुळे हे अनुनासिकांनी शेवट होणारे शब्द जोरात म्हटल्या जातात. शिवाय अनुनासिकात हवा नाकातून बाहेत येत असल्याने फोनॉलॉजी शास्त्रात सोनोरिटी स्केल ( हायरार्की) असे सांगते की इतर व्यंजनांच्या तुलनेत अनुनासिके मोठ्याने ऐकू येतात. मौखिक परंपरेत लोकांना नीट ऐकू येणे हे खूपच महत्वाचे असल्याने तुकाराम महाराजांनी अशा अनुनासिकांनी शेवट होणार्‍या यमक-जोडया योजणे हे खूपच वैज्ञानिक व श्रेयस्कर आहे. अशीच परंपरा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, ह्यांच्या अभंगातही आढळून येते. ह्या उलट सध्याच्या कवींची कवने शोधली तर त्यात हा कल दिसून आला नाही. त्यावरून अनुनासिकांनी शेवट होणारी यमके वापरणे हे तुकाराम महाराजांच्या काव्याचे फार मोठे श्रुतिवैभव आहे, तसेच यमके, अनुप्रास, यतिभंग, गेयता, असल्या कलावैभवांनी तुकाराम महाराजांनी त्यांचे कवित्व अत्युच्च कोटीवर नेऊन ठेवले आहे, ह्याची कोणाही अभ्यासकाला सहज जाण येते.
      भाषाशास्त्रात असे म्हणतात की आपण जे शब्द तयार करतो त्याने आपण केवळ भेद दाखवत असतो. म्हणजे जेव्हा आपण "गोड" हा शब्द योजतो तेव्हा तो "तिखट" ह्या शब्दापासून कसा वेगळा आहे हेच आपण दाखवत असतो. असे भेद दाखवणारे व विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपण एकत्र केले तर असे दिसते की विरुद्ध अर्थाचे शब्द हे नेहमी ( ७० टक्के ) त्या अर्थाच्या एका शब्दाला यमक योजून केलेले असते. उदाहरणार्थ आपण काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोडया प्रथम पाहू. त्या अशा आढळतील : १) अधोगती-प्रगती २) अनाथ-सनाथ ३) अपेक्षित-अनपेक्षित ४) अब्रू-बेअब्रू ५) आघाडी-पिछाडी ६) आदर-अनादर ७) आवक-जावक ८) आशा-निराशा ९) आस्तिक-नास्तिक १०) इमान-बेइमान ११) इलाज-नाइलाज १२) इष्ट-अनिष्ट १३) इहलोक-परलोक १४) उत्तीर्ण-अनुत्तीर्ण १५) उन्नती-अवनती १६) उचित-अनुचित १७) उच्चा-नीच १८) उत्कर्ष-अपकर्ष १९) एकमत-दुमत २०) कडू-गोड २१) कृतज्ञ-कृतघ्न २२) कृपा-अवकृपा २३) खंडन-मंडन २४) चल-अचल २५) जहाल-मवाळ २६) तारक-मारक २७) दुष्ट-सुष्ट २८) नि:शस्त्र-सशस्त्र २९) प्रसरण-आकुंचन ३०) प्राचीन-अर्वाचीन ३१) पुरोगामी-प्रतिगामी ३२) भरती-ओहोटी ३३) माजी-आजी ३४) माहेर-सासर ३५) राजमार्ग-आडमार्ग ३६) वंद्य-निंद्य ३७) विधायक-विध्वंसक ३८) विसंवाद-सुसंवाद ३९) वैयक्तिक-सामूहिक ४०) शुद्धपक्ष-वद्यपक्ष ४१) सगुण-निर्गुण ४२) सजातीय-विजातीय ४३) समता-विषमता ४४) सावध-बेसावध ४५) स्वकीय-परकीय ४६) स्वार्थ-परमार्थ ४७) साधार-निराधार ४८) साक्षर-निरक्षर ४९) सुकाळ-दुष्काळ ५०) सुचिन्ह-दु:श्चिन्ह ५१) सुपीक-नापीक ५२) सुरस-नीरस ५३) सुलक्षणी-दुर्लक्षणी ५४) सुसंगत-विसंगत ५५) सुर-असुर ५६) सुज्ञ-अज्ञ ५७) सोय-गैरसोय ५८) स्वतंत्र-परतंत्र ५९) स्वदेशी-विदेशी ६०) स्वस्ताई-महागाई ६१) स्वस्थ-अस्वस्थ ६२) होकार-नकार ६३) ज्ञानी-अज्ञानी ६४) ज्ञात-अज्ञात ....वगैरे.आपण नेहमी जे विरुद्ध अर्थाचे शब्द करतो त्यांची तुम्ही जंत्री केलीत तर तुम्हाला हमखास आढळेल की बहुतेक जोड्या ह्या यमकानेच होतात. "ऍन ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या मार्जोरी बोल्टन ह्यांच्या ग्रंथात आपण पाहिलेच आहे की यमकाने दोन अक्षरांच्या साम्यामुळे एक प्रकारचा समीपपणा येतो. तसेच इथे आपण पहात आहोत की यमकामुळे विरुद्ध अर्थाची दोन टोके वाटतील असे शब्द तयार होतात. आता कवीकल्पनेत व अध्यात्मात अनेक वेळा दोन टोकांच्या कल्पना सांगाव्या लागतात. त्यामुले यमके वापरून शब्द केले तर ते किती सहजतेने जमते हे आपल्या संतांना माहीत होते असे दिसते. कारण तुकाराम महाराजांनी अशा दोन विरुद्ध टोकाच्या कल्पना सांगण्यासाठी यमके वापरली आहेत हे सोदाहरण दिसते. पहा : १) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ ( सुख व दु:ख ह्या विरोधी कल्पना व जवापाडे-पर्वताएवढे हे यमक) २) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ ३) मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥  ४) ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥  ५) तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥  ६) विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥.
      २५ हजारापेक्षा ज्यास्त असणार्‍या यमक-जोड्या तुकाराम गाथेत एरव्ही वाचत शोधणे हे फारच जिकीरीचे काम . पण संगणकाची मदत घेऊन पाहिजे त्या शब्दांच्या यमकांना सहजासहजी शोधता येते. "हरी"ला जुळणारी यमके आपण वर पाहिलीच. भक्तीमार्गातले इतर काही कळीचे शब्द पाहिले तर असे आढळले की, "नारायण"ला जुळणारी १५० यमके आहेत ज्यापैकी वानगीदाखल ही पहा वैशिष्टयपूर्ण असणारी अशी आहेत : अभिमान, मेदिनी, जनार्दन, धणी, खाणी, वेदवाणी, समचरणी, पाळण, स्वगुण, वदन, वगैरे. "वाणी" ह्या शब्दाला जुळणारी ७५ यमके आढळली ज्यातली ही वानगीदाखल पहा : घाणी, कारणी, गणी, व्यभिचारिणी, शिरोमणी, आणी, प्राणी, छळणी, कडसणी,अंत:करणी वगैरे. "पांडुरंग" ह्या दैवताला जुळणारी यमके आढळली ७५, ज्यातली ही उदाहरणार्थ पहा : अंग, रंग, संग, चांग, पटंगा, तरंग, लिंग, मृदंग, पांग, भंगा वगैरे. "कीर्तन" ह्या शब्दाला जुळणारी यमके आढळली ६०, "ध्यान"ला जुळणारी ४०, व सर्वात ज्यास्त ( ५०० ) यमके आढळली "मन"ला जुळणारी. संत रामदासांनी "मनाचे श्लोक" करून "मनाचा" जो मरातब वाढवला व कदाचित भक्तिमार्गात त्याच "मन" ची महानता ओळखून तुकाराम महाराजांनी "मन"ला जुळणारी इतकी प्रचंड यमके जुळविली असावीत. पैकी खास वाटणारी अशी : घाणा, राणा, जना, ध्यान, सपनी, इंधन, आंचवण, दर्शन, खंडण, जन, दहन, मौन्य, दुकान वगैरे.
      इतकी प्रचंड प्रमाणात यमके पाहिल्यावर कोणालाही सजज जाणवावे की तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे, प्रतिभेचे, खरे गमक आहे यमक ! यमकांच्या बाबतीत सहस्त्रावधी यमके अवतरवून यमकाचे जणु "बापपण"च तुकाराम महाराजांनी स्वत:कडे घेतले आहे. पटवर्धनांच्या "छंदोरचना" ह्या पुस्तकात एक मोठी यथार्थ नोंद आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की यमकाला गुजरातीत व हिंदी छंदरचनेत चक्क "तुकान्त" असा शब्द आहे !
--------------------------------------------------------------------



     
     

     

 "



-------------------------------------
विरुद्ध अर्थांच्या शब्दजोड्या घेतल्या तर त्यात ७० टक्के जोड्या यमकाने झालेल्या दिसतील. तर एकाच अर्थाची दोन टोके दाखवणारे जे अर्थ असतात ते असे दोन यमकाद्वारे वर्णन केलेले दिसतात.जसे : शोधा

सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥1॥

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥1॥
मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥6॥
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥1॥
तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥3॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥3॥



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा