बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८


ई-तुका:३
तुकाराम महाराज आणि शेक्स्पीयर
     
      सर्व मोठी माणसे एकसारखाच विचार करीत असावेत. भाषा, काळ, वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का ? असा विचार शेक्स्पीयर आणि तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचून करण्याचे ठरविले, तर खूपच सारखेपणा आढळतो. वानगीदाखल शेक्स्पीयरचे एक प्रसिद्ध वाक्य घेऊ: "नावात काय आहे ? " मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलियट मध्ये ज्युलियटच्या तोंडी असे येते:"नावात काय आहे ? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसर्‍या कुठल्याही नावाने तेवढेच गोड, सुवासिक लागेल . ( व्हाट इज इन ए नेम? दॅट विच वि कॉल ए रोज, बाय एनी अदर नेम, वुड स्मेल ऍज स्वीट ! )." ह्याला समविचारी मराठी वाक्प्रचार लोक देतात: नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा ! म्हणजेच नावात काय आहे ? हाच मतितार्थ. हेच तुकाराम महाराज  असे म्हणतात : "तुका म्हणे राजहंस ढोरा नावें । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥ ( अभंग २००६,जोग प्रत ) ." म्हणजे एखाद्या बैलाचे "राजहंस" असे नाव ठेवले  तर ह्या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग ? असाच मतितार्थ असणारा अजून एक अभंग आहे : "सावित्रीची विटंबना । रांडपणा करीतसे ॥ काय जाळावे ते नाव । अवघे वाव असे तें ॥ कुबेर नाव मोळी पाहे । कैसी वाहे फजीती ॥ ( १४७७,जोग प्रत ). " नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजीती. नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या . अशी नावे काय जाळायची ? शेक्स्पीयरच्या अवतीभवतीच्या सुबत्तेमुळे गुलाबासारखे गोड उदाहरण तो घेऊ शकला असेल व जीवनाच्या खडतर धबडग्यामुळे तुकाराम महाराज रोखठोक, पण जमीनीवरचे ( भले ते गोड, आशावादी नसेल ) उदाहरण घेत असतील. पण मुळातला विचार दोघांचाही सारखाच ! नावात काय आहे हा !
            असेच एक प्रसिद्ध सुभाषित आहे, शेक्स्पीयरचे, "चमकते ते सर्व सोनेच नसते"(ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड). मर्चंट ऑफ व्हेनिस (ऍक्ट २ सीन ७) ह्या नाटकातल्या ह्या वाक्याचा संदर्भ मजेशीर आहे. पोर्टियाचे स्वयंवर असते. तिच्या बापाच्या मृत्युपत्राबरहुकूम. तीन परडया असतात. एक सोन्याची,एक चांदीची, नि एक शिसाची. परडीत पोर्टियाचे चित्र निघाले तर तो राजपुत्र तिला वरणार. मोरोक्कोच्या राजपुत्राला वाटते हिचे चित्र सोन्याच्या परडीतच असणार. तो सोन्याची परडी उचलतो. पण त्यात पोर्टिया ऐवजी मरणाचे चित्र असते व ओळी असतात : "ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड;ऑफन हॅव यू हर्ड दॅट टोल्ड; मेनी ए मॅन हिज लाइफ हॅथ सोल्ड; बट माय आउटसाइड टु बिहोल्ड; गिल्डेड टूम्ब्‍स डू वर्म्स एनफोल्ड ". राजपुत्र तिथून पळ काढतो व पोर्टिया म्हणते : ए जेंटल रिडन्स ! ( कटकट गेली!). सुभाषिताचा रूढ मतितार्थ आहे की सोन्यासारखे चमकणारे दिसत असले तरी सगळेच सोने नसते. म्हणजे, खर्‍या खोटयाचा निवाडा नीट समजून उमजून करावा. ह्याच थेट अर्थाचे तुकाराम महाराजांचे वचन आहे : "तांबियाचे नाणे न चले खर्‍या मोलें । जरी हिंडवले देशोदेशी ॥". अजून एका अभंगात असेच आहे: "सोने दावी वरी तांबे तया पोटी । खरियाचे साठी विकू पाहे ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवीचे । निवड दोहींचे वेगळाले ॥ क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ तुका म्हणे थिता आपणचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥ ( ५४५ जोग प्रत )." थोडासा फरक करीत अशाच अर्थाचे अजून एक वचन आहे : " सोनियाचा कळस । माजी भरिला सुरा रस ॥ काय करावे प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांठ ॥ तुका म्हणे हित । ते मज सांगावे त्वरित ॥ ( ६७३ जोग प्रत )." इतक्या थेट, सारख्या विचाराचे असणे पाहून आसमंतातच असे सारखे विचार असतात की काय असा संशय यावा. कारण त्या काळात दळणवळण अगदी नगण्य आणि तरीही विचार पहा थेट ताजे आणि शेक्स्पीयरीयन ! भारतात आज जगाच्या एकूण सोन्याच्या उत्पादनातले जवळ जवळ ६० टक्के सोने वापरले जाते. आणि हे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यामुळे शेक्स्पीयरपेक्षा तुकाराम महाराजांना सोन्यासंबंधी ज्यास्त जाण असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे सोन्यासारखे चकाकणारे पितळ व खरे सोने ह्यासंबंधी तुकाराम महाराज सांगतात : "काळकूट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्ष देती ॥". म्हणजे पितळ हे जरी पिवळे आहे तरी कलंकाने काळेकुट्ट होते; आणि सोने हे पिवळे असून निरंतर शुद्ध राहते. एकूण काय शेक्सपीयर असो का तुकाराम दोघेही म्हणतात, चमकते ते सर्व सोनेच असत नाही !
            शिर्डीच्या साईबाबांचे प्रसिद्ध वचन आहे :"सबूरी का फल मीठा ". ह्याच सबूरीबद्दल रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलेय की "वि आर टू पुअर टु वेट ( आपण सबूरी राखू शकत नाही इतके गरीब आहोत )." ऑथेल्लो ह्या शेक्स्पीयरच्या नाटकात असेच एक प्रसिद्ध सुभाषित येते : "हाऊ पुअर आर दे दॅट हॅव्ह नॉट पेशन्स" . ऑथेल्लो नाटकात इऍगो हे पात्र डेस्डेमोनाला ऑथेल्लो पासून खलनायक रॉड्रीगोला मिळवून देण्याचा कट रचतो. पण उतावीळ होऊन रॉड्रीगो लवकरच व्हेनिसला परततो व त्याला डेस्डेमोना मिळत नाही, असा ह्या वचनाचा संदर्भ आहे. अधीर असणे ह्या दोषामुळे शेक्स्पीयरच्या बर्‍याच पात्रांना अपयश येते असे दाखवण्यात येते. धीराचे महत्व सांगणार्‍या ह्या वचना पुष्ट्यर्थ शेक्स्पीयर म्हणतो की, "असा कोणता घाव आहे जो थोडा थोडा न भरता एकदम मिळून येतो ?". अर्थातच शेक्स्पीयरच्या काळातली युद्धसदृष्य परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळी नसावी म्हणून धीराचे महत्व ते वेगळ्या उदाहरणांनी सांगतात. "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥". इथे हिरा कसा तयार होतो हे जाणावे लागते. पृथ्वीच्या आत खोल थरात असा प्रचंड दाब यावा लागतो की कार्बन असलेल्या वस्तू "हिरा" होतात. जुन्या चित्रपटात खाणींची दृश्ये आठवून पहा. ह्या हिरा होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड काळ वाट पाहणे व दाब सोसणे ह्या सद्‍गुणांचा निर्देश तुकाराम महाराज असा करतात, ( फळाची वाट पाहण्यासाठी धीर धरावाच लागतो असे ते एका अभंगात असे म्हणतात) :"फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजी काये ॥ धीर नाही ते वाउगे धीर झाले । फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥". केळीच्या झाडास केळी व फूल अगदी शेवटी येणार. त्या अगोदर उतावीळपणा करून सर्वत्र उपटले तर सर्व व्यर्थच जाणार. हेच प्रमेय ते एके ठिकाणी असे देतात : "धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥". धीर धरणार्‍या सृष्टीतली काही मनोज्ञ उदाहरणे तुकाराम महाराज अशी देतात : "धीर तो कारण एकविध भाव । पतिव्रते नाहो सर्वभावे ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी । वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥ सूर्यविकसिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची ॥ धेनू येऊ नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ तुका म्हणे नेम प्राणां संवसाटी । तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या ॥ ( १३२१, जोग प्रत ) ." असं म्हणतात की, चातक हा पक्षी प्रत्यक्ष पडणार्‍या पावसाचेच थेंब पितो, इतर पाण्य़ाकडे बघत नाही. त्याचे हे वाट पाहणे अगदी धीराचे आदर्श उदाहरण आहे. जी कमळे सकाळी उमलतात ती रात्रीचे चांदणे सोडून सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहतात. गाय इतर वासरांना दूध न देता आपले वासरू लुचायला येण्याची वाट पाहते. धीराचा मूलमंत्र अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज असा देतात : " चरफडे चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशी ॥" किंवा "धीर शुद्धबीजें गोमटा तो । ". धीराचा महिमा हा कसा वैश्विक आहे हेच जणुं इथे तुकाराम व शेक्स्पीयर मिळून सांगत आहेत. धीराचे महत्व असे दोघा वेगवेगळ्या ठिकाणच्या विचारवंतांना एकसारखेच कळणे हे तसे साहजिकच म्हणावे लागेल.
            तुकाराम महाराजांच्या लौकिक आयुष्य़ात अनेक आपत्ती आल्या. त्यात धीर न सोडता हरी-भक्ति ज्यास्तच करता आली व तो फायदाच झाला, असे तुकाराम महाराज म्हणतात. उदाहरणार्थ : "बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥ विठो तुझे माझे राज्य । नाही दुसर्‍याचे काज ॥ पोर मेले बरे जालें । देवें मायाविरहित केलें ॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥ ( ७७२, देहू प्रत)." भावनेच्या जगात इतके कठोर म्हणणे भलतेच वाटते. स्त्रीयां मुलांवर अन्यायाचे वाटते. पण इथेच तुकाराम महाराजांच्या समर्थनार्थ शेक्स्पीयर महाराज येतात. ते म्हणतात, "आपत्तींचा उपयोग मोठा गोड असतो."( इंग्रजी वचन : स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी ) . ऍज यु लाइक इट ह्या नाटकातले डयूकच्या तोंडचे हे वचन आहे. तो पदच्युत झाल्यावर त्याला ह्या आपत्तीचे फायदे ( युजेस) जाणवतात. त्याला तो उपमा देतो, बेडकाच्या माथी असलेल्या औषधी मण्याची आणि आता लोकात "डयूक" हे पद न राहिल्याने खाजगी स्वातंत्र्याचा लाभच आहे असे तो म्हणतो. जसे निसर्ग पुस्तकांपेक्षा, भाषणांपेक्षा, शीलालेखांपेक्षा ज्यास्त बोलका असतो. जणुं काही शेक्स्पीयरच्या "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी" चे मराठीत थेट भाषांतर करावे तसे एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात : "भोगावी विपत्ती गर्भवास (१०६७,देहू प्रत)." मग ह्या विपत्तीतूनही "बरे झाले" असे काय काय फायदे झालेत त्याची यादीच ते देतात. "बरे जाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥ अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन सवंसार ॥ बरे जाले जगीं पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥ बरे जाले नाही धरिली लोकलाज । बरा जालो तुज शरण देवा ॥ बरे जाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥ तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥." विपत्तीतून माणूस तावून सुलाखून निघतो असे लोक म्हणतात. दुष्काळामुळे दोन तीन वर्षांनी जमीनीचा कस वाढतो, महापुराच्या गाळाने शेते ज्यास्त उत्पादक होतात, असे शेती-तज्ज्ञ म्हणतात.  मोठ्ठा भूकंप किंवा युद्ध यामुळे अर्थव्यवस्था सुधारते असे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. आजारी पडलात की, रोग प्रतिकारक शक्ती वाढते असे डॉक्टर म्हणतात. तर असे आपत्तीतून काही फायदे होतात असे जवळ जवळ वैश्विक ( युनिव्हर्सल ) मत आढळून येते. मग तुकाराम महाराज स्वत: दुष्काळात होरपळताना ( त्यांची पत्नी अन्न अन्न करून दुष्काळात मरते ) जेव्हा म्हणतात : "दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान", तेव्हा त्यांच्या अध्यात्मिक दृष्टीला दाद द्यावीशी वाटते. आपत्ती, संकटे विपन्नावस्था भोगावी लागावी व त्यावर दोघाही महापुरुषांची समान प्रतिक्रिया यावी ह्याची इथे गंमत वाटते.
            सध्या "थ्री इडियट्‍स" मधले गाणे "आल इज वेल" बरेच प्रसिद्ध झाले आहे. हे बहुदा शेक्स्पीयरच्या प्रसिद्ध नाटक "ऑल इज वेल दॅट एन्ड्‍स वेल !" बेतले असावे. नाटकातल्या हेलेनाच्या तोंडी अशा ओळी आहेत : "ऑल इज वेल दॅट एन्ड्‍स वेल स्टिल, द फाइन इज द क्राउन ; व्हाटेव्हर द कोर्स, द एन्ड इज द रिनाऊन" ह्यात शेक्स्पीयर म्हणत आहे की, "द एन्ड" किंवा शेवट हेच महत्वाचे असते. आणि हेच तर तुकाराम महाराज म्हणत आले आहेत की, " याजसाटी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥." दोघांची ही सुभाषिते इतकी चपखल आहेत की, त्यावर काही भाष्य तर लागत नाहीच शिवाय सर्व ठिकाणी सर्व वेळी लागू पडणारी, वैश्विक अशी, ही सुभाषिते आहेत हे सहजी  पटते. "देशकाल परिस्थिती" ह्या सर्वांच्या पल्याड असलेल्या विचारांचे वैश्विक असणे व ते त्याच दृष्टिकोणातून शेक्सपीयर व तुकारामाला एकसारखे दिसणे हे अगदी मोहवून टाकणारे आहे. 
   तुकाराम महाराजांच्या लौकिक आयुष्यात अनेक आपत्ती आल्या. त्यात धीर न सोडता हरी-भक्ती ज्यास्तच करता आली  व तो फायदाच झाला, असे तुकाराम महाराज म्हणतात. उदा: "बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥ विठो तुझे माझे राज्य । नाही दुसर्‍याचे काज ॥ पोर मेले बरे जाले । देवें मायाविरहित केले ॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥" ( ७७२, देहू प्रत ). भावनेच्या जगात इतके कठोर म्हणणे हे भलतेच वाटावे. स्त्री, मुलांवर अन्यायाचे वाटते. पण इथेच तुकाराम महाराजांच्या समर्थनार्थ शेक्सपीयर महाराज येतात. ते म्हणतात : "आपत्तींचा उपयोग मोठा गोड असतो ". इंग्रजीतले हे वचन असे: "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी !" ( "ऍज यू लाइक इट" ह्या नाटकातले डयूकच्या तोंडचे हे वचन आहे. तो पदच्युत झाल्यावर त्याला ह्या आपत्तींचे ( युजेस ) फायदे जाणवतात . त्याला तो उपमा देतो, बेडकाच्या माथी असलेल्या औषधी मण्यांची आणि आता लोकात "डयूक" हे पद न राहिल्याने ह्या खाजगी स्वातंत्र्याचा लाभच आहे असे तो म्हणतो. जसे निसर्ग पुस्तकांपेक्षा, भाषणापेक्षा, शीलालेखांपेक्षा ज्यास्त बोलका असतो . जणू काही शेक्सपीयरच्या "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी" चे मराठीत भाषांतरच करावे तसे एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात : "भोगावी विपत्ती गर्भवास ।"( १०६७, देहू प्रत ).मग ह्या विपत्तीतूनही "बरे जाले" असे काय काय फायदे झालेत त्याची यादीच ते देतात. जसे: "बरे जाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥ अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ बरे जाले जगीं पावलो अपमान । बरे गेलें धन ढोरे गुरे ॥ बरे जाले नाही धरीली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥ बरे जाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥ तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥ ". विपत्तीतून माणूस तावून सुलाखून निघतो असे लोक म्हणतात. दुष्काळामुळे दोन तीन वर्षांनी जमीनीचा कस वाढतो, महापुराच्या गाळाने शेते ज्यास्त उत्पादक होतात, असे शेतीतज्ज्ञ म्हणतात.  मोठ्ठा भूकंप किंवा युद्ध यामुळे अर्थव्यवस्था सुधारते असे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. आजारी पडलात की रोग-प्रतिकारक शक्ती वाढते असे डॉक्टर म्हणतात. तर असे आपत्तीतून काही फायदे होतात असे जवळ जवळ वैश्विक मत आढळून येते. मग तुकाराम महाराज स्वत: दुष्काळात होरपळताना ( त्यांची पत्नी अन्न अन्न करून दुष्काळात मरते ) जेव्हा म्हणतात "दुष्काळे आटिलें, द्रव्य नेला मान" तेव्हा त्यांच्या व शेक्सपीयरच्या अध्यात्मक, व नीतीकल्पनेला दाद द्यावीशी वाटते.
      "मर्चंट ऑफ व्हेनिस" ह्या शेक्सपीयरच्या नाटकात ऍंटोनिओ मर्चंटबरोबर एक करार करतो. त्या अन्वये तो जर त्याने पाळला नाही तर त्या बदल्यात मर्चंट त्याच्याकडून एक पौंड मासाचा लचका ( पाऊंड ऑफ फ्लेश ) घेऊ शकतो. ऍंटोनिओची वकीली करीत पोर्टिया मर्चंटला म्हणते की तू स्वत: होऊन त्याला क्षमा कर. तुला कायदेशीर शिक्षा द्यायचा अधिकार असला तरी क्षमेची गुणवत्ता तू ताणू नकोस, स्वेच्छेने क्षमा कर. "द क्वालिटी ऑफ मर्सी इज नॉट स्ट्रे‍न्‌ड;इट ड्रॉपेथ ऍज द जेंटल रेन फ्रॉम हेवन; अपॉन द प्लेस बिनीथ. इट इज ट्वाइस ब्लेस्ट; इट ब्लेसेथ हिम दॅट गिव्हज ऍंड हिम दॅट टेक्‌स. " पाऊस जसा नैसर्गिक रित्या पडतो तशी आपण होऊन क्षमा करावी, जीत दुहेरी आशिर्वाद आहेत. एक क्षमा करणार्‍याचे व दुसरे ज्याच्यावर क्षमा केली त्याचे. हा तसा वैश्विकच विचार असावा. कारण तुकाराम महाराजांचे असेच एक वचन आहे : "दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥" इथे शेक्सपीयरसारखे कार्यकारण भाव ( क्षमा् करणार्‍याला व घेणार्‍याला देवाचे आशिर्वाद मिळतात म्हणून, असा ) न दाखवता तुकाराम महाराजांना वाटते की प्रत्यक्ष परमेश्वरच तिथे वसतीला असतो व म्हणून प्रमेयासारखा विश्वास ते देववतात. क्षमा व करुणेची महती सांगणारा तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग असा आहे : "जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यांसी आपंगिता नाही । त्यांसी धरी जो ह्रदयीं ॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंतांच्या मूर्ती ॥". इथे ज्यास कोणाचा आधार नाही ( आपंगिता ) त्यांस ह्रदयी लावा हे कारुण्याचे उच्च परिमाण तुकाराम महाराज सांगत आहेत. तसेच लोण्यासारखे आत बाहेर मृदू असे सज्जन असावे असे आवाहन करीत आहेत. दया, क्षमा, शांतीचे परम महत्व सांगणारे हे तुकाराम आणि शेक्सपीयर अगदी सख्खे देवदूत आहेत असेच इथे वाटते !
      शेक्सपीयरच्या ऑथेल्लो नाटकातल्या इयागो ह्या पात्राच्या कबूलीनाम्यावरून "वेअरिंग वन्‌स हार्ट ऑन द स्लीव्ह" असा एक वाक्‌प्रचार इंग्रजीत रूढ झाला आहे. त्यात तो रॉड्रिगोला फसवण्याच्या इराद्याने म्हणतो की माझे ह्र्दय शर्टाच्या बाहीवर वागवीन व मग ते सर्वांना खरेच वाटेल. त्यानंतर इंग्रजीत हा वाक्‌प्रचार चांगलाच रुळला. अगदी अंतर्मनातले भाव बाहेर बाळगणे, दाखवणे अशा अर्थाचा हा वापर आहे. अगदी ह्याच चपखलतेने तुकाराम महाराजांनीही असाच एक वाक्‌प्रचार मराठीत रूढ केलेला आढळतो. तो म्हणजे "अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी !". इथे ते नुसताच वाक्‌प्रचार देत नाहीत तर त्यामागचा कार्यकारण भावही देतात, त्याची साहजिकता दाखवून देतात ती अशी : "न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतीमेळ हाकारूनी ॥ अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ॥ सूर्य नाही जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हून ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥ ". तुकाराम महाराज ह्या अंतरमनाचे महत्व ओळखून मग एके ठिकाणी चक्क धावा करतात की, "तुका म्हणे देवा । माझे अंतर वसवा ॥". माणसांच्या भावभावनांचे खेळ कसे चालतात हे नेमकेपणे कळालेले तुकाराम आणि शेक्सपीयर हे दोघे अगदी मुरब्बी दिग्दर्शक आहेत हे मात्र इथे प्रकर्षाने जाणवावे !
      राजाचे सार्वभौमत्व कसे सर्वदूर असते ह्या अर्थाचे शेक्सपीयरचे "रिचर्ड द थर्ड" नाटकातले एक वचन आहे : "किंग्ज नेम इज अ टॉवर ऑफ स्ट्रेंग्थ". आजकाल आपण लोकशाही व्यवस्थेला चटावलेलो असल्याने राजाचा एवढा मोठा मान असू शकतो हे समजायला कदाचित अवघड जाईल. पण दहा वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त बॅंकॉकला असताना ह्या राजाच्या प्रेमाची चुणूक पाहायला मला मिळाली होती. त्यावेळी तिथे लोकशाही होती तरी थायलॅंडचा राजा त्यावेळी फार प्रसिद्ध होता. त्याला प्रजा खूप मान देत असे. तेथे चलनी नोटांवर राजाचे चित्र असे. त्यामुळे बाजारात पैशांचा व्यवहार करताना नोटा हाताळताना त्या दोन्ही हातांनी अगदी मान लववून द्याव्या/घ्याव्या लागत. हा त्या राजाचा मान असे. इतका मान म्हणजेच शेक्सपीयरचे "टॉवर ऑफ स्ट्रेंग्थ" ! आता तुकाराम महाराजांच्या काळातही राजा व त्याचा दंडक हा सार्वभौम असाच प्रकार होता. त्यासाठी ते म्हणतात : "राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ वाइले ते सुने खांदी । चाले पदीं बैसविले ॥ तुका म्हणे विश्वंभरे । करुणाकरे रक्षिले ॥"( २५७८, देहू प्रत ). राजे लोक त्यांच्या आज्ञेने नाणी पाडत व ह्या "सिक्क्यावरून" त्याचे मोल ठरे. काही राजांनी धातूच्या दुर्भिक्षतेपायी चामड्यावर अक्षरे उमटवून ( जाळून, डाग देऊन ) नाणी केली होती असेही इतिहासात सापडते. त्याचाच उल्लेख करून तुकाराम महाराज म्हणतात, "ते ही चाम चालती !". ह्या मागच तत्व सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, "राजा चाले तेथे वैभव सांगाते । हे काय लागते सांगावे त्या ॥"( ८१८, देहू प्रत ). कदाचित ह्या मागची सामान्य माणसाची मनोवृत्ती सेवकाचीच असते असेही तुकाराम महाराज ह्या निमित्ताने सांगतात ते असे : "सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥". राजाच्या दंडकाची सार्वभौमता अशी दोघाही कवींना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळी, पण सारख्याच तत्वाने, पटावी हे मोठे मजेशीर आहे.
      तुकाराम व शेक्सपीयर ह्यांच्यात आढळणारा अजून एक समान धागा आहे : चित्त व चित्ताची आवडी हा. ह्याविषयीचे तुकाराम महाराजांना खूप अप्रूप आहे. म्हणून ते निरनिराळ्या ठिकाणी ह्याविषयीचे निष्कर्ष असे काढतात : "नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥ प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥"( १२८८, जोग प्रत); "तुका म्हणे एथे आवडी कारण । पिकला नायायण जया तैसा ॥"(१३२०, जोग प्रत); "प्रेम नये सांगता बोलता दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ "( २७०४, जोग प्रत) ; "तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥"( ४१६, जोग प्रत); "चित्ताचा चाळक । त्याचे उभय सूत्र एक ॥ "( २३३५, जोग प्रत). चित्त व चित्ताची आवडी हे अगदी आदिम सत्य असावे. कारण हेच असेच शेक्सपीयरच्या दृष्टीपथात आले आहे. "अ मिडसमर नाईट्‌स ड्रीम" ह्या नाटकात हेलेनाच्या तोंडी त्याचे वचन आहे : "प्रीती डोळ्यांनी नव्हे तर चित्ताने पाहते." ( "लव्ह लुक्स्‌ नॉट विथ द आईज बट विथ द माईंड"). तुकाराम महाराज व शेक्सपीयर यांना एकच विचार स्थळकाळ परत्वे स्फुरावा यावरून ह्या विचाराचे वैश्विक असणे हे जसे पटते तसेच एकमेकांशी दूरान्वयानेही संबंध न येता विचारांचे हे साधर्म्य असे लख्खपणे दिसावे हे मोहवून टाकणारे आहे.
      ह्या जगात कितीतरी प्रत्यक्ष जड पदार्थ असे आहेत की ते सर्वत्र सारखेच आढळून येतात. जसे : गहू, तांदूळ, डाळी  हे अन्नपदार्थ, कपडेलत्ते व त्यातल्या चालीरीती वगैरे. पण विचारही सारखेच आढळावे हे वेगळेच वैश्विकतेचे परिमाण दाखवते. माणसाच्या वागण्याच्या पद्धती, निरनिराळ्या संस्था, शाळा एकसारख्या विचाराचे असणे कधी कधी दिसते. ते एकवेळ विचारांच्या उत्क्रांत होण्याच्या पद्धतीमुळे रास्त वाटते, पटते. पण साहित्यात, कविता हा प्रकार तर केवळ दैवयोगाने कवीला सुचणारा प्रकार समजतात. त्या फार क्वचितच एकाच विषयावर आढळतात. त्यातही आपण कित्येकवेळा अनेक कवींनी आईवर, देशभक्तीपर, गुरुजनांवर, सारख्याच आशयाच्या व वळणाच्या कविता केलेल्या पाहतो. त्या जेव्हा भाषा, प्रांत, काळ ह्यांची बंधने झुगारून एकासारख्या एक दिसल्या तर साहजिकच त्या सार्वत्रिक अशा वैश्विक जाणिवेच्या आहेत असे आपण म्हणू. असेच विषयाचे वैश्विकपण दाखवणार्‍या शेक्सपीयर व तुकारामाच्या काही कविता आपण पाहू व विचारांचे हे साधर्म्य व सार्वत्रिकपण पाहू: शेक्सपीयरची एक प्रसिद्ध कविता आहे, "ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज" ह्या नावाची. माणसाच्या जीवनात कशी स्थित्यंतरे येतात व हे जीवन जणु जगाच्या रंगमंचावर घडणारे नाटकच आहे अशा भावार्थाची ही कविता आहे. "ऍज यू लाइक इट"ह्या नाटकातली. ह्या कवितेला "सेव्हन एजेस ऑफ मॅन" असेही संबोधतात. मुळात ही कविता अशी ( देवनागरीत लिहिलेली ) :
      "ऑल द वर्ल्ड इज ए स्टेज,
      ऍंड आल द मेन ऍंड विमेन मिअरली प्लेयर्स ;
      दे हॅव्ह देअर एक्झिट्‌स ऍंड देअर एन्ट्रन्सेस;
      ऍंड वन मॅन इन हिज टाइम प्लेज मेनी पार्ट्‌स,
      हिज ऍक्टस्‌ बींईंग सेव्हन एजेस. ऍट फर्स्ट द इनफंट,
      म्यूलिंग ऍंड प्यूकींग इन द नर्सेस आर्मस्‌ ;
      ऍंड देन द व्हाइनिंग स्कूल बॉय, विथ हिज सॅचेल
      ऍंड शायनिंग मॉर्निंग फेस, क्रीपींग लाइक स्नेल
      अनविलिंगली टू स्कूल. ऍंड देन द लव्हर,
      साईंग लाइक फरनेस, विथ ए वूफुल बॅले
      मेड टू हिज मिस्ट्रेसेस आइब्रो. देन ए सोल्जर,
      फुल ऑफ स्ट्रेंज ओथस्‌, ऍंड बिअर्डेड लाइक द पार्ड,
      जेलस इन ऑनर, सडन ऍंड क्विक इन क्वारल,
      सीकींग द बबल रेप्युटेशन
      ईव्हन इन कॅनन्स माउथ. ऍंड देन द जस्टिस,
      इन फेअर राउंड बेली विथ गुड कॅपॉन लाइन्ड,
      विथ आईज सीव्हीयर ऍंड बिअर्ड ऑफ फॉर्मल कट,
      फुल ऑफ वाइज सॉज ऍंड मॉडर्न इन्स्टन्सेस ;
      ऍंड सो हि प्लेज हिज पार्ट . द सिक्स्थ एज शिफ्टस्‌
      इन्टू द लीन ऍंड स्लिपर्ड पॅंटॅलून,
      विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज ऍंड पाउच ऑन साईड,
      हिज युथफुल होज, वेल सेव्हड्‍ ए वर्ल्ड टू वाईड
      फॉर हिज श्रंक श्रॅंक; ऍंड हिज बिग मॅनली व्हॉइस,
      टर्निंग अगेन टुवर्ड चाइल्डिश ट्रेबल्‌, पाइप्स,
      ऍंड व्हिसल्स्‌ इन हिज साऊंड, लास्ट सीन ऑफ ऑल,
      दॅट एन्डस्‌ धिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्टरी,
      इज सेकंड चाइल्डिशनेस ऍंड मिअर ऑब्लिव्हिअन;
      सॅन्स टीथ, सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरिथिंग "
( साधारण अर्थ असा: सर्व जग एक मंच आहे, सर्व नर नारी त्यावरची फक्त पात्रे आहेत, त्यांना त्यांचे निश्चित प्रवेश व निघून जाणे आहे, एक माणूस त्याच्या हयातीत अनेक भूमीका वठवतो, त्याचा एक अंक सात स्थितींचा/कालांचा असतो, प्रथम बाल्यावस्था, मातेच्या/दायीच्या हातातले चोखणे, हुंदके वगैरे, नंतर खोडकर शाळकरी अवस्था, सकाळचा तरतरीत चेहरा घेऊन पण गोगल गायीसारखा, मनाविरुद्ध हळूहळू शाळेला जाणारा, मग तिसरी अवस्था प्रेमिकाची, भट्‍टीचे सुस्कारे सोडणारा, प्रेमिकेची मनरिझवणी करणारे बॅले नृत्य करणारा, मग चौथी अवस्था शिपायाची/ योद्ध्याची , जीत अगम्य आणाभाका, पटकन हमरीतुमरीवर येणे, तोफेच्या तोंडीही मानाचे वलय शोधणारा, मग पाचवी अवस्था न्यायाधीशाची, दोंद सांभाळत वस्त्रे मिरवीत तीक्ष्ण नजर, दाढी लेवून, हुशारीने उदाहरणे दाखवीत न्याय करणारा, मग सहावी अवस्था त्याला दुबळ्या शरीरात नेते, डोळ्यावर चाळशी, कमरेला बाक, दोंद सुटलेले, तारुण्याचा उत्साह मागे पडलेला, जग खूपच्‌ मोठे वाटणारे, आवाजात गुणगुणणे आलेले, मग सगळ्यात शेवटची सातवी अवस्था जी हा सगळा घडामोडींचा इतिहास मोडीत काढते, दुसरे बाल्य/शैशवच जणु, दांताविना, दृष्टीविना, रुचिविना, सर्वांविना ! ( विनाश ! )
   आता ह्याच चेहर्‍यामोहर्‍याची तुकाराम महाराजांची कविता शोधायची हे मोठे बिकट काम ह्यासाठी आहे की शेक्सपीयरचे साहित्य हे लिखित होते तर तुकाराम महाराजांचे मौखिक परंपरेत टिकलेले होते. त्यामुळे तुकारामाची कविता सलग एकेठिकाणी व एकत्र सापडत नाही. शिवाय तुकाराम महाराज मुख्यत्वे अभंग ह्या चारपाच खंडाच्या छोट्या वृत्तातच कविता करीत. त्यामुळे ती एकसंध व विस्तृत अशी एकत्र सापडत नाही. तुकाराम महाराजांची सबंध गाथाच जिथे विषयवार विखुरलेली आहे तिथे ही अडचण अगदीच साहजिक म्हटली पाहिजे व ती शोधून जोडणे हे सहजी केलेल्या कवितेसमानच मानले पाहिजे. शिवाय तुकाराम महाराजांच्या काळात नाटक हा प्रकार, शेक्सपीयरची नाटके असत त्या प्रकारची तर नसणारच. पण कीर्तनानंतर, कथा किंवा काला किंवा "लळित" नावाचा जो हलका-फुलका प्रकार असे तो नाटक-वजाच असे. त्याचे वर्णन तुकाराम असे करतात : "गळित झाली काया । हे चि लळित पंडरीराया ॥" (४०२४, जोग प्रत). इथे शेक्सपीयरने जी सातवी अवस्था, वृद्धावस्था, वर्णिली आहे त्याचेच रेखाटन करीत जीवन हे एक नाटक आहे असे म्हणताना तुकाराम महाराज गलित-गात्र झाल्याचे व हे एक लळित असल्याचे शेक्सपीयरसारखेच सांगत आहेत. नाटकाला "खेळ"ही म्हटले जायचे. त्यावर ते म्हणतात : "म्हणउनि खेळ मांडियेला ऐसा । नाही कोणी दिशा वर्जियेली ॥"( २१३, जोग प्रत). शेक्सपीयरने जे म्हटले की जग हा एक मंच आहे व आपण सर्व पात्रे आहोत तेच सांगणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा : "नटनाट्य अवघे संपादिले सोंग । भेद दाऊ रंग न पालटे ॥ मांडियेला खेळ कौतुके बहुरूप । आपुले स्वरूप जाणतसो ॥"( २५९, जोग प्रत). अजून एका ठिकाणी असेच : "नटनाट्य तुम्ही केले याचसाठी । कवतुके दृष्टी निववावी ॥"( ८२२, जोग प्रत). नाटकांपूर्वी कळसूत्री बाहुल्यांचा नाटकवजा खेळ असायचा त्याचा दाखला देत तुकाराम म्हणतात : "लाघवी सूत्रधारी । दोरी नाचवी कुसरी ॥"( १५४१,जोग प्रत). किंवा "चित्ताचा चाळक । त्याचे उभय सूत्र एक ॥ नाचवितो नाचे छंदे । सुखे आपुल्या विनोदे ॥"( २३५, जोग प्रत).  जीवन हे एक रंगमंच आहे असेच वेगळ्या प्रकाराने तुकाराम असेही म्हणतात की "खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ॥ "( ३७३३, जोग प्रत). तुकाराम महाराजांचा "जग हा एक रंगमंच आहे" हा दृष्टांत असा सजलेला दिसेल.
      आईच्या/दायीच्या हातात, कुशीत निर्धास्त असलेले बाल्य जसे शेक्सपीयरने चितारले आहे तसेच तुकाराम महाराजही बाल्यावस्थेची चित्रे अशी रेखतात : "धाकुट्याच्या मुखीं घास घाली माता । वरी करी सत्ता शहाणिया ॥ "( १११, जोग प्रत) ; "काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माऊली ॥" (४३१, जोग प्रत) : "लेकरां आइते पित्याचे जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥"( ४३७, जोग प्रत)" . पुढे जे शाळकरी मुलाचे शेक्सपीयरने वर्णन केले आहे त्या अवस्थेचे तुकाराम असे वर्णन करतात : "ओनाम्याच्या काळें । खडे मांडविले बाळे ॥"( ३५९, जोग प्रत). इथे हा खडे ठेवून शिकवण्याचा प्रकाराचा संदर्भ हा खास तुकाराम कालीन असल्याने शेक्सपीयरला अज्ञात असावा. तसेच "अर्भकाचे साटी । पंते हाती धरीली पाटी ॥" ह्यात शिक्षणावस्थेचे चित्रण छानच दिसते. ह्या अवस्थेचे जे व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे "खेळ" ह्याचेही तुकाराम महाराज सविस्तर वर्णन असे करतात : "बाळपणे ऐसी । वरुषे गेली बारा । खेळता या पोरा । नानामते ॥ विटू-दांडू चेंडू । लगोर्‍या वाघोडी । चंपे पेंड खडी । एकीबेकी ॥ हुमामा हुंबरी । पकव्याच्या बारे । खेळे जंगी भोवरे । चुंबाचुंबी ॥ सेलडेरा आणि निसरभोवडी । उचली बाले धोंडी । अंगबळे ॥ तुका म्हणे ऐसे बालपण गेले । मग तारुण्य आले गर्वमूळ ॥"( इथे वर्णिलेले हे त्याकाळातले खेळ आहेत ). तारुण्याच्या येण्याचा उल्लेखही तुकाराम महाराज "वर्वमूळ" असा करतात ते मोठे मार्मिक आहे. ह्याच तारुण्यावस्थेचा पुढे तुकाराम असा देखावा दाखवतात : "तारुण्याच्या मदे । न मनी कोणासी ॥ सदा मुसमुसी । घुळी ( अर्थ:बैल) जैसा ॥ अठोनी वेठोनी । बांधला मुंडासा ॥ फिरतसे म्हैसा । जनामधी ॥ हाती दीड पान । वरतीच मान । नाही तो सन्मान । भलियासी ॥ श्वानाचिया परी । हिंडे दारोदारी । पाहे नरनारी । पापदृष्टी ॥ तुका म्हणे ऐसा । थोर हा गयाळी । करिता टवाळी । जन्म गेला ॥" ह्याच अवस्थेतला कामातुर कसा असतो त्याचेही वर्णन तुकाराम असे करतात : "कामातुर चवी सांडी । बरळ तोंडी बरळे ॥ रंगले ते अंगी दावी । विष देववी आसडे ॥ ". ज्या वीर योद्ध्याचे शेक्सपीयरने बहारदार वर्णन केले आहे त्याचेच जणु तुकाराम असे सांगतात : "आम्ही वीर झुंजार । करू जमदाडे मार । थापटिले भार । मोड झाला दोषांचा ॥ जाला हाहाकार । आले अंकित झुंजार । शंखचक्राचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ॥ रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकति निशाण । गरुडटके पताका ॥ तुका म्हणे काळ । झालो जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हा आमचा ॥"( ९४०, जोग प्रत).
      शेक्सपीयरच्या ज्या प्रसिद्ध ओळींनी ( सॅन्स टीथ ( सॅन्स म्हणजे विथाउट), सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरिथिंग ) वृद्धावस्थेचे वर्णन हे खासे नेटके होते तसेच नेटकेपणे तुकारामही असे करतो : "म्हातारपणी थेटे पडसे खोकला । हात कपाळाला । लावुनि बसे ॥ खोबरियाची वाटी । जाले असे मुख । गळतसे नाक । श्लेष्मपुरी ॥ बोलो जाता शब्द । न ये चि हा नीट । गडगडी कंठ । कफ भारी ॥ सेजारी म्हणती । मरेना का मेला । आणिला कांटाळा । येणे आम्हा ॥ तुका म्हणे आता । सांडूनि सर्व काम । स्मरा राम राम । क्षणा क्षणा ॥ चालिले सोबती । काय मानिली निश्चिंती । काय करीसी एकला । काळ सन्निध पातला ॥ काही सावध तो बरवा । करी आपुला काढावा ॥ चालिले अगळे । हळूच कान केश डोळे ॥ वोसरले दात । दाढा गडबडल्या आत ॥ एकली तळमळ । जिव्हा भलते ढायी लोळे ॥ तुका म्हणे यांणी । तुझी मांडली घालणी ॥"
      वेगळे पणाचे आजकाल आपल्याला खूपच कौतुक असते. त्यामुळे वेगळेपण आपण मिरवतोही . वेगळाल्या वाटेमुळे वेगवेगळे कवी हे खरे तर ह्या मरातबाचे अप्रूप आहेत . तसेच दोन कवींना एकाच विषयाविषयी सारखेच वाटावे हे साधर्म्यही सुखावणारे असते. इतके हे वाटणे साहजिक असते की प्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते व मनस्वी कवी विंदा करंदीकरांना तर तुकाराम व शेक्सपीयर हे जिवाभावाचे मैतरच वाटतात व ते एका कवितेत त्यांची भेटही नाट्यमयतेने रंगवतात. ती अशी :
            तुकोबाच्या भेटी । शेक्सपीयर आला ;
            तो जाहला सोहळा । दुकानात. ॥.
            जाहली दोघांची । उराउरी भेट ;
            उरातले थेट । उरांमध्ये .
            तुका म्हणे "विल्या, । तुझे कर्म थोर ,
            अवघाचि संसार । उभा केला" ,
            शेक्सपीयर म्हणे, "एक ते राहिले ,
            तुवा जे पाहिले । विटेवरी ."
            तुका म्हणे, "बाबा, त्वा बरे केले;
            त्याने तडे गेले । संसाराला .
            विठठल अइले । त्याची रीत न्यारी ;
            माझी पाटी कोरी । लिहोनिया ,"
            शेक्सपीयर म्हणे । "तुझ्या शब्दामुळे
            मातीत खेळले । शब्दातीत ."
            तुका म्हणे, "गड्या, वृथा शब्दपीट ;
            प्रत्येकाची वाट । वेगळाली .
            वेगळीये वाटे । वेगळाले वाटे ,
            काट्यासंगे भेटे । तेही तेच .
            ...ऐक, ऐक वाजे । घंटा ही मंदिरी !
            कजागीण घरी । वाट पाहे ."
            दोघे निघोनिया । गेले दोन दिशा ;
            कवतिक आकाशा । आवरेना .

      आकाशा एवढ्या दोन मोठ्या कवींनी, आपापले वेगळेपण जपत, एकसारखेच वैश्विक विचार कवीतेतून द्यावेत ह्याचे कौतुक मात्र रसिकांना कायमच भारून टाकील !

--------------------------------------------------------------------------------
                                    ( शब्दसंख्या : ४२६०)        चित्र : तुकारामाचे व शेक्सपीयरचे


अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई : ४०० ०७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा