ई-तुका: ९
तुकाराम आणि शेक्स्पीयर:(३)
शिर्डीच्या साईबाबांचे प्रसिद्ध वचन आहे :"सबूरी का फल मीठा ". ह्याच सबूरीबद्दल रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलेय की "वि आर टू पुअर टु वेट ( आपण सबूरी राखू शकत नाही इतके गरीब आहोत )." ऑथेल्लो ह्या शेक्स्पीयरच्या नाटकात असेच एक प्रसिद्ध सुभाषित येते : "हाऊ पुअर आर दे दॅट हॅव्ह नॉट पेशन्स" ऑथेल्लो नाटकात इऍगो हे पात्र डेस्डेमोनाला ऑथेल्लो पासून खलनायक रॉड्रीगोला मिळवून देण्याचा कट रचतो. पण उतावीळ होऊन रॉड्रीगो लवकरच व्हेनिसला परततो व त्याला डेस्डेमोना मिळत नाही, असा ह्या वचनाचा संदर्भ आहे. अधीर असणे ह्या दोषामुळे शेक्स्पीयरच्या बर्याच पात्रांना अपयश येते असे दाखवण्यात येते. धीराचे महत्व सांगणार्या ह्या वचना पुष्ट्यर्थ शेक्स्पीयर म्हणतो की, "असा कोणता घाव आहे जो थोडा थोडा न भरता एकदम मिळून येतो ?". अर्थातच शेक्स्पीयरच्या काळातली युद्धसदृष्य परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळी नसावी म्हणून धीराचे महत्व ते वेगळ्या उदाहरणांनी सांगतात. "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥". इथे हिरा कसा तयार होतो हे जाणावे लागते. पृथ्वीच्या आत खोल थरात असा प्रचंड दाब यावा लागतो की कार्बन असलेल्या वस्तू "हिरा" होतात. जुन्या चित्रपटात खाणींची दृश्ये आठवून पहा. ह्या हिरा होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड काळ वाट पाहणे व दाब सोसणे ह्या सद्गुणांचा निर्देश तुकाराम महाराज असा करतात, ( फळाची वाट पाहण्यासाठी धीर धरावाच लागतो असे ते एका अभंगात असे म्हणतात) :"फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजी काये ॥ धीर नाही ते वाउगे धीर झाले । फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥". केळीच्या झाडास केळी व फूल अगदी शेवटी येणार. त्या अगोदर उतावीळपणा करून सर्वत्र उपटले तर सर्व व्यर्थच जाणार. हेच प्रमेय ते एके ठिकाणी असे देतात : "धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥". धीर धरणार्या सृष्टीतली काही मनोज्ञ उदाहरणे तुकाराम महाराज अशी देतात : "धीर तो कारण एकविध भाव । पतिव्रते नाहो सर्वभावे ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी । वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥ सूर्यविकसिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची ॥ धेनू येऊ नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ तुका म्हणे नेम प्राणां संवसाटी । तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या ॥ ( १३२१, जोग प्रत ) ." असं म्हणतात की, चातक हा पक्षी प्रत्यक्ष पडणार्या पावसाचेच थेंब पितो, इतर पाण्य़ाकडे बघत नाही. त्याचे हे वाट पाहणे अगदी धीराचे आदर्श उदाहरण आहे. जी कमळे सकाळी उमलतात ती रात्रीचे चांदणे सोडून सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहतात. गाय इतर वासरांना दूध न देता आपले वासरू लुचायला येण्याची वाट पाहते. धीराचा मूलमंत्र अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज असा देतात : " चरफडे चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशी ॥" किंवा "धीर शुद्धबीजें गोमटा तो । ". धीराचा महिमा हा कसा वैश्विक आहे हेच जणुं इथे तुकाराम व शेक्स्पीयर मिळून सांगत आहेत.
---अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२
Sunder...Aprateem lekh zalay ha...very informative...Thank u Tukaramanchi parat ashi sahaj olakh karun dilyabaddal....
उत्तर द्याहटवाTumache Tukaram aani shakespear he wachun Vinda karandikaranche kavita aathwali...tyat tyanni Willya aala tuka bheti ase lihile aahe....yaat willya mhanaje william shakespear...
उत्तर द्याहटवाTumache tukaramanche lekh chhanach rangale aahet...
प्रिय मुक्ताफळे,
उत्तर द्याहटवाविंदा करंदीकरांची कवितेनेच ह्या लेखाचा शेवट केला आहे. आपल्या कौतुका बद्दल आभार.
अरूण अनंत भालेराव