ई-तुका: १०
तुकारामाच्या ग़जला
ही एक बहादुरशहा ज़फरची ग़जल पहा:
रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में "ज़फर" जिनके वास्ते
वो जानते नहीं कि "ज़फर" किसका नाम है
इथे ज़फर काही प्रश्न विचारात आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते ? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते कोणाचे नाव आहे? आम्हाला कोणाच्या कला कुसरीची माहीती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब कशाचे नाव आहे?. ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही की ज़फर कोणाचे नाव आहे ?
आता तुकारामाचा हा अभंग बघा :
हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त
ग़जलेच्या मुख्य लक्षणात एक लक्षण आहे की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपल्या आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. ग़जलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय ग़जलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्या ओळीत त्याचा परमोच्च आहे, हाच माझा नित्यनेमही आहे ! असेच धोरण सर्व अभंगात आहे.
परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिले चरण सहा अक्षरांचे ( ह्या चरणा शेवटी यमक नसते ) , दुसरे चरण सहा अक्षरांचे, तिसरे चरण सहा अक्षरांचे ( दुसर्या व तिसर्या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथे चरण चार अक्षरांचे ( शेवटी यमक नसते. ) . ( सोयीसाठी चार चरण दोन ओळीत मांडले आहे कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता ग़जल मध्ये दुसर्या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती "नाम तुझे" हे यमक योजतात हे लक्षणीय आहे आणि ग़जलाच्या वळणाचे आहे. ग़जलच्या पाच किंवा सहा शेरापैकी पहिला शेर ( ह्याला मतला म्हणतात ) मध्ये दोन्ही ओळीशेवटी यमक ( क़ाफिया व रदीफ ) असते पण तुकारामांना अभंगातली दुसर्या तिसर्या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी "तुका म्हणे दुझे " हे "नाम तुझे" ला जुळणार यमक शेवटच्या शेरात जोडले आहे तसे त्यांना सुरुवातीला "हेचि दान माझे" असे जराशा फरकाने सहज जमते.ते केले तर ग़जलेची तांत्रिक बाजूही सांभाळल्या गेली असती. ग़जलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते ( जसे "ज़फर") .ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच ( जसे: "तुका म्हणे").
आणि मोठ्ठा योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे "किसका नाम है" आणि तुकारामांनी म्हणावे "नाम तुझे" हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक ग़जलच आहे.
अरुण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा