गुरुवार, १७ मार्च, २०११

तुकाराम बीज

तुकाराम-बीज :
आज, २१ मार्च २०११. आज तुकाराम बीज आहे. आज २ ते ३ लाख वारकरी भाविक देहूला जमा होतील. इ.स.१६५० मध्ये ह्याच दिवशी तुकाराम महाराज, शेवटचे कीर्तन करताना सदेह वैकुंठाला गेले . त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ( दर वर्षी फाल्गुन मासातल्या कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला ) तुकाराम -बीज म्हणून साजरा करतात. ही प्रथा, गेल्या शंभरावर वर्षापासून, देहू येथे पाळल्या जाते. गोपाळपुर्‍यातील नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तन करताना तुकाराम महाराज अदृश्य झाले, त्याचे स्मरण म्हणून तुकाराम-बीजेच्या सोहळ्यात, भल्या पहाटे मुख्य देवळात विश्वस्तांच्या हस्ते पूजा होते ; तुकारामांच्या पादुका पालखीने वैकुंठगमनस्थानाकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, पुष्पवृष्टीत प्रस्थान करतात ; गोपाळपुरातल्या मंडपात गाथाचे सामुदायिक पठण होते, वैकुंठगमनाचे कीर्तन होते व नांदुरकीच्या झाडाची पाने सळसळू लागली की "तुकाराम-तुकाराम" असा जयघोष होतो ; फुले उधळल्या जातात व वारकर्‍यांचा "जय जय रामकृष्ण हरी" चा घोष दुमदुमू लागतो. हाच तो क्षण तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठी जाण्याचा ! हीच तुकाराम-बीज !
आषाढ महिन्यातल्या एकादशीला १० ते १२ लाख वारकरी , पायी पंढरपुरची वारी करतात. ह्यात डोक्यावर तुळसीवृंदावन घेतलेल्या स्त्रिया, वीणाधारी, टाळकरी, मृदुंगवाले वगैरे वारकरी असतात. वारकरी संप्रदायात भेदभाव मानत नाहीत, भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात, गुरू कडून तुळसीची माळ घालतात, दारू, अभक्ष्य भक्षण करीत नाहीत, एकादशीचा उपास करतात व नित्यनेमाने "हरिपाठ" व भजन करतात. वारी ज्या दिवसात असते त्यावेळी शेतीची कामे असतात. आजकाल आपण पाहतो की कुठल्याही सामाजिक कार्याला माणसांचा उत्साह व संख्या कमी पडते. अशात, आजही एवढया प्रचंड संख्येने वारकरी पायी चालत जातात व चालताना तुकारामाचे अभंग म्हणत जातात, हे पाहिले की ह्यांच्या भक्तिमार्गावरच्या विश्वासाचे व उत्साहाचे अपार कौतुक वाटते.
अशीच पावती आपल्याला ह्या भाविकांच्या तुकाराम-बीज साजरी करण्याला द्यावी लागेल. विज्ञानाच्या आधारे आपण पुष्पक विमान तुकाराम महाराजांना न्यायला आले होते, असे अजून तरी सिद्ध करू शकत नाही. एरव्ही पुण्यतिथीला तसबीरीसमोर किंवा समाधीच्या फरशीसमोर सरावाने माथा टेकवणार्‍या भाविकाला तुकाराम महाराजांचे असे अदृश्य होणे अदभुत व भांबावणारे खरेच. पण इथे विनोबा भावे एक दिशा दाखवतात. ते म्हणतात, भक्तियोगात चित्त ईश्वराने भरून जाते असा अनुभव येतो. तुकाराम महाराज भक्तिमार्गाचे कळसावर ह्यासाठी आहेत की त्यांचे नुसते चित्तच नाही तर त्यांची "कायाही हरिमय होते", अशा प्रकारची मुक्ती त्यांना साधलेली आहे. "गोविंद गोविंद मना लागलिया छंद । मग गोविंद ते काया ॥". अशी मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज ह्यावर म्हणून गेले आहेत की असे झाल्यावर "घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं, मुक्तां आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ॥". आयुष्यभर खस्ता खाताना ज्या विठठलभक्तीने तुकाराम महाराजांची काया कीर्तनात ब्रह्मरूप झाली, तिचाच पुन:प्रत्यय भाविकांना तुकाराम वैकुंठी जाताना येत असावा. ज्या ज्ञानदेवाने भक्तिमार्गाचा पाया रचला त्याच्या कळसावरून, मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज, वैकुंठाला जाताना वारकरी भाविकांना निरोप देत आहेत: "आम्ही जातों आमुच्या गावां । आमुचा रामराम घ्यावा ॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनिया जन्मतुटी ॥ आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पायां ॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥"

---------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

( १८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व) , मुंबई : ४०००७७ ( भ्र: ९३२४६८२७९२ ) )

--------------------------------------