गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

बी-माहात्म्य

२) बी-महात्म्य
--------------------------------------------------------------
(३५४६)
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥1 ॥
मधील ते वाव अवघी उपाधि । तुह्मां आह्मांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥
घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥2 ॥
तुका ह्मणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥3॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
खरे तर हा प्रसिद्ध अभंग ब्रह्मतत्वाच्या अद्वैताचे निरूपण करणारा आहे, पण आपण त्यातून बी-बियाणाचे महात्म्य कसे दाखवलेले आहे त्याचा बोध घेऊ शकतो. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, ती वाफ ढग होऊन वर जाते, ती कालांतराने थंड होऊन, वाहून पाऊस पडतो, पावसाने नद्या वाहू लागतात, नद्या मग समुद्राला येऊन मिळतात असे जे चक्र आहे त्याचा दृष्टांत ज्ञानेश्वरापासून सर्व संतमंडळी ब्रह्मतत्वाचे अद्वैत सांगण्यासाठी करतात. आकाशाचेच गुण असलेल्या घट , माठ, ह्यांना आपण वेगवेगळी नावे देतो पण ते आकाश-तत्वाचेच दर्शन असते. त्या दृष्टांतात पुढे जाऊन तुकाराम महाराज दुसरा एक दाखला देतात की एका बी-पासून दुसरी बी तयार होते, आणि त्या दरम्यान जी पाने, फुले ही झाडाची अवस्था होते, ती एक प्रकारे महत्वाची नसून वाया जाणारीच आहे. बी च तेवढे खरी.
बीज-तत्वाचे सर्व जगात फार महत्व आहे. एखादा शास्त्रज्ञ आयुष्यभर अभ्यास करून काही शोधून काढतो व ते ज्ञान शेवटी बीज-स्वरूपात एखाद्या सूत्राने बद्ध करून दाखवतो. जसे आइनस्टाइनचे सर्व प्रयत्न एका सूत्रात ( E= m c २ ) दाखविले की त्याच्या सर्व शोधाचे सार एखाद्या बी सारखे हे सूत्र दाखवते जे पिढ्यान पिढ्या जपले जाते. गव्हाचे ताट काही महिनेच टिकेल पण गव्हाचे बी म्हणून कित्येक शतके टिकू शकते. इजिप्तच्या हजारो वर्षांपूर्वीच्या ममीज भोवती जे धान्य बी म्हणून आढळते ते परत पेरले असता ते धान्य उगवते. एखाद्याला भाराभर सांगतांना ते टिकवायचे असेल तर ते बीजरूपाने सांगितले तर त्याचा टिकाव व प्रसार ज्यास्त व्यवस्थित होतो असे दिसते. ह्याच बी-महात्म्याचा दाखला देत एक गृहस्थ मुंबई-पुणे प्रवासात निरनिराळ्या झाडांच्या बियांची छोटी छोटी पुडकी करतात व रेल्वे-डब्याच्या दारातून जिथे जंगल लागते तिथे गाडीतून फेकतात. ते हे पावसाळ्यात करतात त्यामुळे बिया लवकर अंकुरतात व जंगले जोपासली जातात. हे बीचेच महात्म्य आहे.
ह्याच बी चे महात्म्य शेतकरी ओळखतात व जे पेरायचे त्याचे बियाणे अगदी चांगल्या अवस्थेचे, गुणाचे असे जोखून घेतात. कारण ज्या प्रतीचे बी असेल तसेच पीक येणार हा त्याचा विश्वास असतो व निसर्गाचा नियम असतो. ह्याच साठी जे पीक बियाणे म्हणून घ्यायचे असते ( सीड प्लॉट ), त्याची सर्व दृष्टीने चांगली निगराणी ठेवावी लागते. कारण चांगल्या बी पासूनच चांगले बियाणे मिळते. शुद्ध बीजा पोटीं फळे रसाळ गोमटी !

---------------------------------------------------------------------