सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

गायनँक तुका

झाला तुका गायनॅक :१
पायाळू:
----------------------------------------------
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥1॥
सिद्ध महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥
पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥2॥
तुका ह्मणे तेथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥3॥
-----------------------------------------------------------------------------------------------
खूप जणांनी लुटूनही न संपणारी अशी जुनाट खाण पंढरीत सापडली आहे. सिद्ध पुरुषांनी व महामुनींनी ही जतन केलेली होती. पण सामान्यांना ती सापडत नव्हती. जो माणूस जन्मताना डोक्याकडून न जन्मता पायाकडून जन्मतो त्याला पायाळ किंवा पायाळू म्हणतात. अशा पायाळू माणसांना खास दैवी शक्ती असते. त्यांना भूमिगत धन सहजी दिसते. तसेच जमीनीखाली पाणी कुठे लागेल ह्याचा अंदाज पायाळू माणसाला अगदी बिनचूक लागतो. अजूनही खेड्यापाड्यात विहिर कुठे खणावी त्याचा अंदाज घेण्यासाठी पायाळू माणसालाच बोलावतात. पुंडलीक हा असाच पायाळू असल्याने त्याने ही भूमिगत धनाची जागा, पांडुरंग, जगाला दाखविला. तिथे मी दुबळा होतो पण तरीही माझ्या वाटेला हे पांडुरंगाचे प्रेम थोडेबहुत आले आहे.
वरील अभंगात पांडुरंग ही एक प्रकारची भूमिगत खाण कशी आहे ह्याचे कौतुक असले तरी जो पायाळू माणसाचा दृष्टांत दिला आहे तो त्या काळीही तुकारामाला गायनॅकॉलॉजीची किती सविस्तर माहीती होती हे दाखविणारा आहे.आपण आजकाल जाणतोच की मुले जन्मताना प्रथम डोक्याकडून बाहेर येतात. पण बर्‍याच वेळा ती पायाकडून वा ढुंगणाकडूनही जन्मतात. अशा पायाकडून जन्मणार्‍यांना आपल्याकडे पायाळू म्हणतात. नेममीप्रमाणे डोक्याकडून जन्मणार्‍या मुलांना मायाळू म्हणतात. पायाळू मुले बर्‍याच वेळा अशक्त राहतात व त्यांना पाण्याचे भय असते असे पूर्वी समजत. आजकालच्या प्रसूती-शास्त्रात पायाळू मुलांना ब्रीच बेबी किंवा त्यांच्या जन्माला ब्रीच जन्म म्हणतात. ( ब्रीच बेबीची जन्माच्यावेळेसची अवस्था फोटोत दाखवली आहे ).
आपल्याकडे मुलांच्या जन्माला मोठा समर्पक शब्द आहे: "बाळंतपण" ! नैसर्गिक प्रक्रीयेने मूल किंवा बाळ जन्मते खरे, पण त्या दरम्यान हजार धोके संभवतात व जाणकार डॉक्टरांची म्हणूनच आवश्यकता असते. नीट व्यवस्थित जन्मले तर बाळ, नाही तर अंत, असाही कोणी बाळंतपणाचा अर्थ काढतात. तो अगदी वस्तुस्थिती दाखवणारा आहे. जर नैसर्गिक प्रथेने, काहीही डॉक्टरी खबरदारी घेतली नाही, तर बाळांच्या मृत्यूचे प्रमाण दर लाखामागे १५०० बाळांचा मृत्यू, इतके ज्यास्त असते. अर्थात आजकाल आधुनिक सोयी व वैद्यकीय साधनांमुळे हे मृत्यूचे प्रमाण सुधारलेल्या देशांत अवघे, दर लाखामागे १० मृत्यू, इतके कमी झाले आहे. आजकाल अशा अवघड बाळंतपणात सीझेरियन शस्त्रक्रिया करून बाळांचा जन्म बिनधोक करतात हे सर्वश्रुतच आहे.
-------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव