गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 6

तुकयाची नॅनो---६
६) "न, ना" ची श्रवणसुलभता :
म्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.
एरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.
ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्‍या वर्णांचा जसे : न, म,
म्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्‍या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s ! ). ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 5

तुक्याची नॅनो---५
"न, ना" द्वारे सुजाण पालकत्व :
तुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.
संसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात "जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी ॥ ". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की "नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥".
इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 4

तुक्याची नॅनो----४

४) "न", "ना", "नाही" ची नॅनो :
वर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९,१२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी "दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात "न" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.
तुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर "न" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा "न" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ।; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ।; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥
न ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, "न करणे" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. . "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.). ........( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 3

तुकारामाची नॅनो---३

३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :
अगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं । ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )
दोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:
हे चि माझे तप । हे चि माझे दान । हे चि अनुष्ठान । नाम तुझे ॥
हे चि माझे तीर्थ । हे चि माझे व्रत । सत्य सुकृत । नाम तुझे ॥
हा चि माझा धर्म । हे चि माझे कर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा चि माझा योग। हा चि माझा यज्ञ । हे चि जपध्यान । नाम तुझे ॥
हे चि माझे ज्ञान । श्रवण मनन । हे चि निध्यासन । नाम तुझे ॥
हा चि कुळाचार । हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा माझा आचार । हा माझा विचार । हा माझा निर्धार । नाम तुझे ॥
तुका म्हणे दुजे । सांगायासि नाही । नामेविण काही । धनवित्त ॥
ह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी । शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती । सर्प तया ॥; गोड तुझे रूप । गोड तुझे नाम । देई मज प्रेम । सर्व काळ ॥; तुका म्हणे काही । न मागे आणिक । तुझे पायी सुख । सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे । तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर । ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती । मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना । म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता । बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.
अल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्‍याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्‍याला ? चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला ? ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या । तुझे कर्म थोर । अवघाचि संसार । उभा केला ॥...तुका म्हणे बाबा। त्वा बरे केले । त्याने तडे गेले । संसाराला ॥;
तुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते, जसे कोणाला "अगं गंगू" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, "अगं गंगाभागिरथे" पेक्षा ! (क्रमश:)
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

तुकयाची नँनो 1

तुकारामाची नॅनो !

रचनेतली नॅनो रचना:
नाव जरी "मोठा अभंग" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.
आता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी "ब्र", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील "ब्रा" ! ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्‍यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे "फाइंड" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व "फाइंड नेक्स्ट" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत "फाइंड नेक्स्ट" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.
वरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते "न" हा शब्द वापरतात ; १७०९ वेळा, "ना" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व "नाही" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना ! ( क्रमश: )

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

मोठे अभंगकार

तुकाराम महाराज हे मोठे अभंगकार !
अभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
मोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥
लहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)
आता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता ? जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे ? तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के.
तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

ढेकणाचे संगे अमेरिकन डायमंड भंगले

ढेंकणाचे संगे, अमेरिकन डायमंड, भंगले !
तुकाराम महाराज म्हणाले होते, ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला !
कोणी ह्याची शहानिशा करायला धजत नाही. कारण न जाणो, खरेच जर हिरा ढेंकणाजवळ ठेवल्याने भंगला तर त्याचे पैसे भरावे लागतील. पण खर्‍या हिर्‍यापेक्षा, अमेरिकन डायमंड बरेच स्वस्त असतात. आता त्यावर पडताळा करून पहायला हरकत नव्हती. पण, इतके दिवस हे पडताळणे अवघड होते. कारण अमेरिकेत, अमेरिकन डायमंड आहेत, पण ढेंकूण नसायचे. पण आता अमेरिकेत, न्यू यॉर्कला, नुकत्याच आलेल्या बातमीवरून भरपूर ढेंकूण झाले आहेत.
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥
ह्या मूळ अभंगाचे अमेरिकेला आता चांगलेच प्रत्यय येत आहेत. भारतीय, कोरियन, चिनी, मेक्सिकन वगैरे लोक प्रचंड प्रमाणात गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित होत आहेत. इतके की आता तिथे मॉल्स मध्ये मूळचे गोरे लोक फारच कमी दिसतात व काळे, मेक्सिकन, भारतीय, चिनी हेच लोक ज्यास्त दिसतात. आता राहणीमानाच्या दृष्टीने तुलना केली तर आपला त्यांना "कुसंग"च वाटणे साहजिक आहे. पचापच थुंकणे काय, नाकात बोटे घालणे काय, शरीराला दुर्गंधी येणे काय, दात खराब असणे काय, शिवाय एक ना अनेक व्याधी. तरी बरे पूर्वीचे खरूज, नायटे, सर्दीपडसे, खोकला वगैरे आजकाल नाहीयत. आता ह्या कुसंगाचा त्यांना प्रत्यक्ष फटका दिसतोय तो ढेंकणाच्या अमेरिकेत येण्याने.
आताच्या अमेरिकेला जाणार्‍यांना कल्पना नाही, पण पूर्वी ( ३० वर्षांपूर्वी ), अमेरिकेला जायच्या आधी एक पी फॉर्म भरून द्यावा लागायचा. त्यात सरकारी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे लागे की तुम्हाला कॉलरा, पीतज्वर, टी.बी. वगैरे रोग नाहीत. आता कस्टम्सना नवीन यंत्रे बसवावी लागतील, सामानात, अंगावर, ढेकूण आहेत की नाही ते बघायला. हाच तो कुसंगाचा फेरा असावा !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 12

तुक्याची ग्वाही-१२
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्‍याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 11

तुक्याची ग्वाही-११
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 10

तुक्याची ग्वाही-१०
"अनुभवावाचून । सोंग संपादणे । नव्हे हे करणे । स्वहिताचे ॥" ( २५०१,जोग प्रत)
पूर्वी बहुरूपी नावाचे सोंग घेऊन मनोरंजन करणारे, खेळ करणारे लोक असत. अशा एखाद्या बहुरूप्याने देवाचे सोंग आणले पण तसा भाव, अनुभव घेतला नाही, तर त्याचे ते देवपण वाया जाणारे असते. दगडाच्या देवाला मनोभावे भजणारे भक्त तरून जातील, पण दगडाला मात्र दगड म्हणूनच रहावे लागते. धोत्र्याच्या झाडाला ( कनक ) आपण जरी सोन्याचे ( कनक ) झाड म्हणून मानले तरी ते काही सोन्याचे मोल पावणार नाही. संत तुकाराम महाराजांचे मोठेपण असे आहे की त्यांचे उपदेश व विचार सार्वत्रिक व वैश्विक असे ठरतात. कारण असाच उपदेश एके ठिकाणी शेक्सपीयरनेही दिलेला आहे. तो म्हणतो की जे चमकते ते सर्वच काही सोने नसते. व्यवहारात तर हा उपदेश फारच महत्वाचा आहे. आपण जर शेजार्‍याशी तुलना करीत त्याच्याच सारखे श्रीमंतीचे सोंग आणले, पण तसा खरा अनुभव नसेल तर आपली किती तारांबळ उडते ते प्रत्येकालाच माहीत आहे. असेच राजकारण्यांचे होते. ते आव भले आणतात, जनसेवेचा पण त्यांची अमाप संपत्ती पाहिली की लोकांना खरा अनुभव येतो. सर्व काळी खरे ठरणारे वचन हे असे असते.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 9

तुक्याची ग्वाही--९
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्‍या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 8

तुक्याची ग्वाही-८
"जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥" ( ८०१,जोग प्रत)
तुकाराम महाराजांच्या काळातही कारंजी होती हे ह्या उपमेवरून कळल्यावर मोठी गंमत वाटते. त्यातही कारंज्याचे रहस्य त्यांनी सांगून स्वहिताचा उपदेश द्यावा ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. कारंज्यात धारा एकापेक्षा एक उंच उडाव्यात अशी योजना करायची असेल तर पाण्याला दाब असावा लागतो. ह्या तांत्रिक बाबीचा दृष्टांत तुकाराम महाराज असा देतात की कारंजाची शोभा वाढवायची असेल तर जसा पाण्यावर दाब असावा लागतो तसेच स्वहिताचे कारंजे थुइथुई उडायचे असेल तर त्यावर "जिव्हाळा" ह्या गोष्टीचा दाब, रेटा असणे आवश्यक आहे. स्वहित साधण्यास अंत:करणात प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. ह्या अभंगात पुढे तुकाराम महाराज अशी हमी देतात की भूतमात्रांना शांती साठी प्रेमाचा जिव्हाळा हवा हे मी खुद्द मोजलेले आहे. हीच "तुक्याची ग्वाही" समजायला हरकत नाही !

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 7

तुक्याची ग्वाही-७
"तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥" ( १४४६,जोत प्रत)
तुकाराम महाराज हिताचा, स्वहिताचा विचार करा असा उपदेश देतात तेव्हा हित कशात पहावे त्याचाही फार मोलाचा विचार देतात. ते म्हणतात, ज्या विचारात नीतीचा विचार होतो त्यातच हित असते. नीती म्हणजे अगदी सोप्या शब्दात, चांगले काय व वाईट काय ह्याची जाण. आणि हे कसे ठरवायचे तर, आपल्या चित्ताला साक्षी ठेवून. ह्यासाठी ते अगदी रोचच्या व्यवहारातली उदाहरणे देतात. जसे, दळण दळण्या आधी आपण खडे निवडतो, नाही तर भाकरीत कचकच लागेल. इथे आळस करून काही उपयोग नाही. शेत कामात पीक चांगले यायचे असेल तर आजूबाजूचे तण उपटून काढावे लागतात. इथे आपण जसा हिताचा विचार करून, आळस न धरता, काय चांगले त्या नीतीचा विचार करतो व त्याप्रमाणे वागतो, त्यातच माणूस मात्रांचे हित आहे. जीवनाचे सूत्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येणे हे तुकाराम महाराजांचे खासे देखणे वैशिष्टय आहे.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 6

तुक्याची ग्वाही-६
"तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥" ( ७६,जोत प्रत)
तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी होते म्हणून त्यांनी व्यापाराचे उदाहरण द्यावे, हे खूपच साहजिक आहे. व्यापारात कसा माणूस नुकसान होत असेल, तर साहजिकच थोडया वेळाने तो धंदाच बदलतो, बंद करतो. तसेच इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत की जिथे आपले हित होत नसेल ते प्रयत्न , ते काम, माणसाने सोडून द्यावेत. उगाच नुकसान करणार्‍या व्यापात माणसाने आपले आयुष्य खर्ची घालू नये. चित्त शुद्ध करावे, देवाचे चिंतन करावे, व असे आपले स्वहित पहावे.व्यापार करण्याच्या ह्या उपदेशात थोडे उदारीकरण करून असे जर पाहिले की असा धंदा करावा की ज्यात सगळ्यांचेच हित होईल, तर तो एक अप्रतीम असा सल्ला होईल.लोकांना चार घास मिळावेत म्हणून शेतकर्‍यांनी शेती करावी, तोच भाव मनी ठेवून वाणी लोकांनी त्याचा व्यापार करावा,खाणार्‍याचे आरोग्य चांगले राहील ह्या हिताच्या दृष्टीने खाण्याचे पदार्थ करणार्‍यांनी काळजी घ्यावी, असा सर्वंकश हिताचा विचार केल्यानेच "हिताचा व्यापार" होईल.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 5

तुक्याची ग्वाही-५
"आपुलाले हित आपण पाही । संकोच तो न धरी काही ॥ "(३१,जोग प्रत)
सामान्य माणसाला व्यवहारात कसे वागावे ही शिकवण तुकाराम महाराज फार छान देतात. एक माणूस तेल-घाणी चालविणार्‍या तेलणीशी रुसला व तिच्याकडून तेल कसे आणायचे ह्या संकोचापायी कोरडेच खाऊ लागला. आता तिच्याशी भांडण झालेय म्हणून बिना तेल कोरडेच खाणे ह्यात आपले काहीच हित नाही. तसेच एक बाई दुसर्‍याला अपशकून करण्यासाठी स्वत:चे डोके भादरून घेते ह्या रागात तिचे काय हित आहे बरे? एका माणसाने घरात पिसवा खूप झाल्या म्हणून घरालाच आग लावून दिली. ह्यात त्याचे घर जळाले, दुसरे काही हित झाले काय ? एका स्त्रीने लुगड्यात खूप उवा झाल्या म्हणून लुगडेच फेडले तर त्यात तिचीच फजीती आहे. ह्या सर्व व्यवहारातल्या प्रसंगी राग व भावनेच्या आहारी जावून व कसलाही संकोच बाळगून माणसाचे हित होत नाही अशी शिकवण इथे तुकाराम महाराज फार खुबीने देत आहेत.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

तुकारामाचे हाँट डाँग

तुकारामाचा हॉट डॉग !
मला वाटायचे की काही चित्रांमध्ये अंगभूत गुण असणार व त्यामुळे देश काल बदलला तरी त्याची जाणीव फार बदलू नये. पण नुकताच मला ह्याच्या विरुद्ध अनुभव आला.
माझ्या नातवंडांना मी अभिमानाने सांगत होतो की मी मराठीत तुकारामावर ब्लॉग लिहितो व तुमच्या सोयीसाठी आजकाल मी त्याचे इंग्रजी भाषांतरही देतो. झाले दहा वर्षाच्या नातवाने लगेच ब्लॉग उघडला व तुकारामाचे चित्र पाहून तो मला विचारायला लागला की "हा गाय हॉट डॉग विकतो आहे काय ?". तुकारामाच्या हातातल्या चिपळ्या त्याला हॉट डॉग सारख्या दिसत होत्या. मला लगेच प्रायश्चित्त म्हणून स्नान करावे की काय असे वाटले. तुकाराम महाराज बिचारे भारतातच बरे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 4

तुक्याची ग्वाही-४
"आपुल्या हिता जो होय जागता । धन्य मातापिता तयाचिया ॥" ( ९,जोग प्रत)
पहिल्यांदा आपल्याला वाटते की तुकाराम महाराज असे कसे एखाद्या स्वार्थी मुलाबद्दल इतके चांगले लिहीत आहेत. पण तुकाराम महाराज हे फार रोकडे उपदेश देणारे संत आहेत. आता पहा की एखादा मुलगा आपले हित जपत नोकरीतून बचत करीत, कर्ज काढून फ्लॅट घेतो, तेव्हा प्रथम आपल्याला वाटते की हा स्वार्थी आहे. पण नंतर त्या घरात थकलेल्या आईबापांचीच सोय होते हे कळते. निदान त्याचा तो स्वत: फ्लॅट घेतोय, आई-बापांवर ओझे बनत नाही आहे हेही हिताचेच आहे हे कळते. आणि असे मातापिता धन्यच होणार. मुले चांगले निघणे, कर्तबगार निघणे, त्यांनी स्वता:ची प्रगती करणे ह्या बाबी आईबापांना अतिशय सुख देणार्‍या म्हणूनच वाटतात. आज आपण पाहतोच की आपल्याकडे जवळ जवळ घरटी एक तरी मुलगा अमेरिकेस वा परदेशी नोकरीस असतो. अशा वेळी नुसत्या त्याच्याच आईबापांना नव्हे तर संपूर्ण देशालाच अभिमान वाटू लागतो. फक्त तुकाराम महाराजांच्या उपदेशा प्रमाणे आपण आपले हित जपायला हवे व त्यासाठी आपले चित्तच ग्वाही असते.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

रविवार, ४ जुलै, २०१०

तुकयाची व्वाही 3

तुक्याची ग्वाही-३
"कोणी निंदा कोणी वंदा । आम्हा स्वहिताचा धंदा ॥" (क्षेपक-२३,जोग प्रत)
एक प्रसिद्ध गोष्ट आहे. एक मुलगा व त्याचा बाप घोडा घेऊन जात असतात. मुलाला वाटते वडील म्हातारे आहेत, त्यांनी घोडयावर बसावे. मुलगा पायी जातो. लोक म्हणायला लागतात, बघा या बापाला काही आहे का ? स्वत: घोडयावर बसलाय व मुलगा पायी. मग बाप उतरतो व मुलाला घोडयावर बसवतो. आता लोक म्हणायला लागतात, पहा म्हातार्‍याला पायी चालवतोय व स्वत: घोडयावर बसलाय. शेवटी दोघेही कंटाळून पायीच चालतात. तरी लोक म्हणतात पहा मूर्ख बाप-लेक, घोडा रिकामा चालवताहेत व स्वत: पायी चाललेत. तर लोकांच्या अशा बोलण्याकडे लक्ष देण्यात अर्थ नसतो. ज्यांना आपले स्वहित साधायचे असते त्यांनी लोकांच्या बोलण्याला महत्व द्यायचे नसते. स्वहित साधणे हाच धंदा समजून नेटाने , नियमित प्रयत्न चालू ठेवायचे असतात. कोणी निंदा केली तरी त्याने खिन्न व्हायचे नसते व कोणी मान दिला तरी त्याने हरखून जायचे नसते.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

तुकयाची ग्वाही 2

तुक्याची ग्वाही-२
"स्वहिताची चाड । ते ऐका हे बोल । अवघेचि मोल । धीरा अंगी ॥
सिंपिले ते रोप वरीवरी बरे । वाळलिया पुरें कोंभ नये ॥
तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसे ॥" ( जोग प्रत:२१०२)
सर्व प्रयत्नांचे, कामाचे, प्रोजेक्टचे, प्रबंधाचे रहस्य व मोल "धीर" व नेटाने प्रयत्न करणे हे आहे. आणि आपल्याला आपल्या हिताची काळजी असेल तर हे "धीर" जपणे अगत्याचे आहे. ह्यालाच आधुनिक व्यवसाय मार्गदर्शक "फोकस" असे म्हणतात. सर्वसाधारण व्यवहारातले उदाहरण देत तुकाराम महाराज म्हणतात, जसे काही हेळसांड होऊन रोप वाळले तर मग त्याला पुन्हा कोंभ उगवणार नाही. म्हणून रोपाला नियमीत, वरचेवर, पाणी द्यावे लागते. एखादा मूर्तिकार दगडाला छिन्नी लावून, त्याला तासून, नेटाने मूर्तीचा आकार प्रकट होईपर्यंत टाकीचे घाव देत राहतो तेव्हाच त्यातून देवपण ( देवाची मूर्ती ) प्रकट होते. ते काम मध्येच अर्धवट सोडून दिले तर तो एक कुचकामाचा दगड समजून लोक त्याला शी पुसतील.( पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अशी रीत होती.). तेव्हा स्वहिताचा विचार करायचा तर नेटाने, धीराने, फोकस ठेवून प्रयत्न चालू ठेवावे लागतात तेव्हाच देवपण येते.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

तुकयाची ग्वाही 1

तुक्याची ग्वाही-१
"चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काई ।
स्वहित ते ठायी आपणापें ॥" ( जोग प्रत: ५५०)
ग्वाही म्हणजे साक्ष देणे, हमी देणे, ग्यारंटी देणे. आपण आजूबाजूला नेहमी पाहतो की सर्वांसमक्ष मारामारी, लूट, खून झालेला असतो, पण कोणी साक्ष द्यायला पुढे येत नाही. कारण असते, नसत्या लचांडाचे. उपदेश देण्यातही असेच असते.बघा बुवा, करून पहा, गुण येईल असे सांगणारे, मोघम सांगतात व त्यामुळे ऐकायला बरे वाटले तरी फारसे आपण त्या वाटेला जात नाही.पण संतांचे तसे नसते. त्यातही तुकाराम महाराज हे स्वत: साधक राहून, सामान्य माणसाचे हाल सोसून, संतपदी पोहोचलेले. त्यांच्या सर्व शिकवणुकीत अगदी कळवळा असतो तो माणसाला "स्वहित" कसे साधता येईल,त्याचा. अध्यात्म सांगते परोपकाराच्या गोष्टी पण इथे तुकाराम महाराज सांगत आहेत, त्या स्वहिताच्या गोष्टी.अगदी स्वार्थ म्हटले तरी हरकत नाही. आणि ते म्हणत आहेत की तुमचे स्वहित कशात आहे ते तुमच्या मनाशिवाय, चित्ताशिवाय दुसरे कोण अधिक जाणेल बरे ? लोक काय म्हणतील किंवा लौकिकाची चाड धरण्याचे काही कारण नाही. आपल्या स्वहितासाठी आपले चित्तच साक्षी ठेवावे व त्याप्रमाणे वागावे. बरे हे सांगणे अगदी आधुनिकतेचे आहे. कारण आजकाल मोठमोठ्या कंपन्यातल्या अधिकार्‍यांना त्यांचे मालक विचारतात "तुमचे गट फीलींग काय आहे". हीच आहे "चित्ताची ग्वाही !"

बुधवार, २६ मे, २०१०

तु म टग्या विनोद

ई-तुका: १४
तुकाराम महाराजांचा टग्या विनोद

एखाद्याचे पाईल्सचे ऑपरेशन झालेले असेल तर बिचार्‍याला बसताना खूपच यातना होतात. मग काही काळ डॉक्टर म्हणतात, बसताना स्कूटरची टयूब फुलवून त्यावर बसा. मग असे लोक बरोबर पिशवीत टयूब घेऊनच हिंडतात. आणि त्यांच्या चेहर्‍यावर भाव असतो, पंक्चर झाल्यासारखा. अशांवर टगे लोक विनोद करतात कि काय आजकाल पाईल-फौंडेशनवर का ? त्याचे व्यंगचित्रही काढतात. हा जरा दुष्ट विनोद खरा पण विनोदाचा एक प्रकार म्हणून प्रचलित आहे.

तुकाराम महाराजांच्या काळातही हे होत असावे. कारण एके ठिकाणी ते म्हणतात :
तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचे दु:ख गांड फाडी ॥

पाईल्सचे दु:ख किती अपार ते ज्याचे त्यालाच माहीत असते. मग अशा वेळी देखीचा दिमाख ढासळून पडतो. असे वर्णन तुकाराम महाराज इथे करीत आहेत.

अरुण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २४ मे, २०१०

तुका झालास अमर, बघा सेंस आँफ ह्यूमर

ई-तुका: १३

तुका झालासे अमर ।
बघा सेन्सॉफ ह्यूमर ॥

मिस्कीलपणा, उपरोध, टिंगल टवाळी करणे, रेवडी उडवणे, शिव्या घालणे, वाकडे बोलणे हे जे सांप्रत मराठी माणसांचे खासे गुण आहेत, ते आपल्याला थेट तुकाराम महाराजांकडून अनुवंशिकपणे मिळालेत की काय असे वाटावे असे सेन्स ऑफ ह्यूमर चे दर्शन तुकाराम महाराजांच्या अभंगात मुबलकपणे होते. काही नमुने पहा:

नाही पाइतन भूपतीशी दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥
( अर्थ : ज्याला पायात घालावयास जोडा ( पायतण ) मिळत नाही, त्याने राजाबरोबर वैर करणे व्यर्थ आहे व अशा प्रकारच्या त्याच्या करण्याला आग लागो ! )
इथे मराठी माणसाचे वैगुण्य दाखवत, त्याची ( पायी पायतण नसल्याची ) खिल्ली उडवत, तुकाराम महाराज एक राजकारणीय उपदेश करत आहेत की आधी आपण आपले वैभव वाढवावे व मगच राजाशी दावा, वाद घालावा. हा सेन्स ऑफ ह्यूमर इतका ताजा आहे की जणु काही ते आजच्या मराठी माणसाला सांगत आहेत की आधी एखादा उद्योग कर व मगच टाटा बिर्लांना धंदा कसा करायचा ते शिकव ! कदाचित अशाच सेन्स ऑफ ह्यूमर ने तुका झाला असेल अमर !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
९३२४६८२७९२

शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

धावता अभंग

ई-तुका : १२
धावता अभंग , धाव
बॅंकॉकला असताना तिथल्या लुंपीनी गार्डन मध्ये एकदा एक अनोखा संगीत प्रकार ऐकायला मिळाला होता. तिथे दर रविवारी बॅंकॉक-सिंफनी नावाचा प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ५ ते ८ वेगवेगळे संगीत ऐकवतो. आपल्याकडे जसे काही मंदीरातून गायक देवाला सेवा म्हणून गातात तसाच हा लोकांना अर्पण करण्याचा प्रकार तिथे खूप वर्षांपासून सुरू आहे. अभिजात संगीताची जाण ह्याने जन-सामान्यांना पोंचते. तर एका रविवारी ते दाखवीत होते की संगीत-दिग्दर्शकाचे वेगवेगळे मूडस संगीतातून कसे पहायला मिळतात. जसे दिग्दर्शक रागावलेला असेल तर संगीत कसे जोर जोरात व वेगळ्या लयीत वाजते.
असेच तुकाराम महाराजांनी एक अनोखा प्रकार केला आहे. धाव किंवा धावता अभंग. असे एकूण ३४ अभंग गाथेत आढळतात. हे अभंग अगदी धावत्या चालीत व जणु आपण धावतच म्हणत आहोत अशा लयीत केलेले आहेत. हे जरा धावत्या चालीत म्हणून बघा म्हणजे ह्या शैलीची प्रतीती येईल व तुकारामाला धावती भेट दिल्यासारखेही होईल. ( नेऊरगावकर प्रतीत अभंग क्रमांक ७१३ ते ७४५ ह्यात "धाव" ह्या शीर्षकाने हे अभंग दिले आहेत. इथे फक्त दोनच वानगीदाखल देत आहे ):

आळस आला अंगा । धांव घाली पांडुरंगा ॥ सोसू शरीराचे भाव । पडती अवगुणांचे घाव ॥ करावी व्यसनें । दुरी येउनि नारायणे ॥ जवळील दुरी । झालो देवा घरी करी ॥ म्हणवुनि देवा । वेळोवेळा करी धांवा ॥ तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नको अंगा ॥


इथे क्लिक करा व ऐका

येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥ ऐसी असोनिया वेसी । दिसतो मी परदेशी ॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावे देवा ॥ तुज आड काही । बळ करी ऐसे नाही ॥ तुका म्हणे ऋषिकेशी । काय उशीर लाविलासी ॥


इथे क्लिक करा व ऐका

------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

निर्मळ तुका, तमिळ तुका

ई-तुका : ११
निर्मळ तुका, तमिळ तुका
परवा आय आय टी पवईला गणेशकुमार ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. हे गणेशकुमार चेंबूरच्या फाइन आर्टस सोसायटीचे अध्यक्ष असून त्या संस्थेत गायन वादन नृत्य वगैरे कलांचे ९०० विद्यार्थी शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. त्यांना पंढरपूर देवस्थानाने "अभंग-रत्न" हा किताब दिलेला आहे. ते वामनराव पै चे मोठे भाऊ मोहनराव पै ह्यांचे शिष्य आहेत. त्यांनी सांगितले ते असे:
१) सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे.
२) तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात। तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात.
३) त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे.
४) एकदा मलेशियाला गेले असता त्यांना तिथल्या स्थानिक मंडळींनी अभंग म्हणायचा आग्रह केला तर काय आश्चर्य तिथले २०० लहान मुले "सुंदर ते ध्यान" व्यवस्थित म्हणत होते. देश वेगळा भाषा वेगळी पण अभंग तेच मराठी.
५) प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
६) सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात.
म्हणूनच वाटते, निर्मळ तुका आता तमिळ तुका झाला आहे !

अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

शनिवार, ३ एप्रिल, २०१०

तुकारामाच्या गजला

ई-तुका: १०
तुकारामाच्या ग़जला
ही एक बहादुरशहा ज़फरची ग़जल पहा:

रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में "ज़फर" जिनके वास्ते
वो जानते नहीं कि "ज़फर" किसका नाम है
इथे ज़फर काही प्रश्न विचारात आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते ? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते कोणाचे नाव आहे? आम्हाला कोणाच्या कला कुसरीची माहीती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब कशाचे नाव आहे?. ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही की ज़फर कोणाचे नाव आहे ?
आता तुकारामाचा हा अभंग बघा :
हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त
ग़जलेच्या मुख्य लक्षणात एक लक्षण आहे की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपल्या आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. ग़जलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय ग़जलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्‍या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्‍या ओळीत त्याचा परमोच्च आहे, हाच माझा नित्यनेमही आहे ! असेच धोरण सर्व अभंगात आहे.
परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिले चरण सहा अक्षरांचे ( ह्या चरणा शेवटी यमक नसते ) , दुसरे चरण सहा अक्षरांचे, तिसरे चरण सहा अक्षरांचे ( दुसर्‍या व तिसर्‍या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथे चरण चार अक्षरांचे ( शेवटी यमक नसते. ) . ( सोयीसाठी चार चरण दोन ओळीत मांडले आहे कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता ग़जल मध्ये दुसर्‍या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती "नाम तुझे" हे यमक योजतात हे लक्षणीय आहे आणि ग़जलाच्या वळणाचे आहे. ग़जलच्या पाच किंवा सहा शेरापैकी पहिला शेर ( ह्याला मतला म्हणतात ) मध्ये दोन्ही ओळीशेवटी यमक ( क़ाफिया व रदीफ ) असते पण तुकारामांना अभंगातली दुसर्‍या तिसर्‍या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी "तुका म्हणे दुझे " हे "नाम तुझे" ला जुळणार यमक शेवटच्या शेरात जोडले आहे तसे त्यांना सुरुवातीला "हेचि दान माझे" असे जराशा फरकाने सहज जमते.ते केले तर ग़जलेची तांत्रिक बाजूही सांभाळल्या गेली असती. ग़जलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते ( जसे "ज़फर") .ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच ( जसे: "तुका म्हणे").
आणि मोठ्ठा योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे "किसका नाम है" आणि तुकारामांनी म्हणावे "नाम तुझे" हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक ग़जलच आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

तुकाराम आणि शेक्सपियर 3

ई-तुका: ९

तुकाराम आणि शेक्स्पीयर:(३)

शिर्डीच्या साईबाबांचे प्रसिद्ध वचन आहे :"सबूरी का फल मीठा ". ह्याच सबूरीबद्दल रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलेय की "वि आर टू पुअर टु वेट ( आपण सबूरी राखू शकत नाही इतके गरीब आहोत )." ऑथेल्लो ह्या शेक्स्पीयरच्या नाटकात असेच एक प्रसिद्ध सुभाषित येते : "हाऊ पुअर आर दे दॅट हॅव्ह नॉट पेशन्स" ऑथेल्लो नाटकात इऍगो हे पात्र डेस्डेमोनाला ऑथेल्लो पासून खलनायक रॉड्रीगोला मिळवून देण्याचा कट रचतो. पण उतावीळ होऊन रॉड्रीगो लवकरच व्हेनिसला परततो व त्याला डेस्डेमोना मिळत नाही, असा ह्या वचनाचा संदर्भ आहे. अधीर असणे ह्या दोषामुळे शेक्स्पीयरच्या बर्‍याच पात्रांना अपयश येते असे दाखवण्यात येते. धीराचे महत्व सांगणार्‍या ह्या वचना पुष्ट्यर्थ शेक्स्पीयर म्हणतो की, "असा कोणता घाव आहे जो थोडा थोडा न भरता एकदम मिळून येतो ?". अर्थातच शेक्स्पीयरच्या काळातली युद्धसदृष्य परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळी नसावी म्हणून धीराचे महत्व ते वेगळ्या उदाहरणांनी सांगतात. "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥". इथे हिरा कसा तयार होतो हे जाणावे लागते. पृथ्वीच्या आत खोल थरात असा प्रचंड दाब यावा लागतो की कार्बन असलेल्या वस्तू "हिरा" होतात. जुन्या चित्रपटात खाणींची दृश्ये आठवून पहा. ह्या हिरा होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड काळ वाट पाहणे व दाब सोसणे ह्या सद्‍गुणांचा निर्देश तुकाराम महाराज असा करतात, ( फळाची वाट पाहण्यासाठी धीर धरावाच लागतो असे ते एका अभंगात असे म्हणतात) :"फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजी काये ॥ धीर नाही ते वाउगे धीर झाले । फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥". केळीच्या झाडास केळी व फूल अगदी शेवटी येणार. त्या अगोदर उतावीळपणा करून सर्वत्र उपटले तर सर्व व्यर्थच जाणार. हेच प्रमेय ते एके ठिकाणी असे देतात : "धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥". धीर धरणार्‍या सृष्टीतली काही मनोज्ञ उदाहरणे तुकाराम महाराज अशी देतात : "धीर तो कारण एकविध भाव । पतिव्रते नाहो सर्वभावे ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी । वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥ सूर्यविकसिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची ॥ धेनू येऊ नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ तुका म्हणे नेम प्राणां संवसाटी । तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या ॥ ( १३२१, जोग प्रत ) ." असं म्हणतात की, चातक हा पक्षी प्रत्यक्ष पडणार्‍या पावसाचेच थेंब पितो, इतर पाण्य़ाकडे बघत नाही. त्याचे हे वाट पाहणे अगदी धीराचे आदर्श उदाहरण आहे. जी कमळे सकाळी उमलतात ती रात्रीचे चांदणे सोडून सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहतात. गाय इतर वासरांना दूध न देता आपले वासरू लुचायला येण्याची वाट पाहते. धीराचा मूलमंत्र अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज असा देतात : " चरफडे चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशी ॥" किंवा "धीर शुद्धबीजें गोमटा तो । ". धीराचा महिमा हा कसा वैश्विक आहे हेच जणुं इथे तुकाराम व शेक्स्पीयर मिळून सांगत आहेत.

---अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

तुकाराम आणि शेक्सपियर 2

-तुका :
तुकाराम आणि शेकस्पीयर --

असेच एक प्रसिद्ध सुभाषित आहे, शेक्स्पीयरचे, "चमकते ते सर्व सोनेच नसते"(ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड). मर्चंट ऑफ व्हेनिस (ऍक्ट २ सीन ७) ह्या नातकातल्या ह्या वाक्याचा संदर्भ मजेशीर आहे. पोर्टियाचे स्वयंवर असते. तिच्या बापाच्या मृत्यूपत्राबरहुकूम. तीन परडया असतात. एक सोन्याची,एक चांदीची, नि एक शिसाची. परडीत पोर्टियाचे चित्र निघाले तर तो राजपुत्र तिला वरणार. मोरोक्कोच्या राजपुत्राला वाटते हिचे चित्र सोन्याच्या परडीतच असणार. तो सोन्याची परडी उचलतो. पण त्यात पोर्टिया ऐवजी मरणाचे चित्र असते व ओळी असतात : "ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड;ऑफन हॅव यू हर्ड दॅट टोल्ड; मेनी ए मॅन हिज लाइफ हॅथ सोल्ड; बट माय आउटसाइड टु बिहोल्ड; गिल्डेड टूम्ब्‍स डू वर्म्स एनफोल्ड ". राजपुत्र तिथून पळ काढतो व पोर्टिया म्हणते : ए जेंटल रिडन्स ! ( कटकट गेली!). सुभाषिताचा रूढ मतितार्थ आहे की सोन्यासारखे चमकणारे दिसत असले तरी सगळेच सोने नसते. म्हणचे खर्‍या खोटयाचा निवाडा नीट समजून उमजून करावा. ह्याच थेट अर्थाचे तुकाराम महाराजांचे वचन आहे : "तांबियाचे नाणे न चले खर्‍या मोलें । जरी हिंडवले देशोदेशी ॥". अजून एका अभंगात असेच आहे: "सोने दावी वरी तांबे तया पोटी । खरियाचे साठी विकू पाहे ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवीचे । निवड दोहींचे वेगळाले ॥ क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ तुका म्हणे थिता आपणचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥ ( ५४५ जोग प्रत )." थोडासा फरक करीत अशाच अर्थाचे अजून एक वचन आहे : " सोनियाचा कळस । माजी भरिला सुरा रस ॥ काय करावे प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांठ ॥ तुका म्हणे हित । ते मज सांगावे त्वरित ॥ ( ६७३ जोग प्रत )." इतक्या थेट, सारख्या विचाराचे असणे पाहून आसमंतातच असे सारखे विचार असतात की काय असा संशय यावा. कारण त्या काळात दळणवळण अगदी नगण्य आणि तरीही विचार पहा थेट ताजे आणि शेक्स्पीयरीयन ! भारतात आज जगाच्या एकूण सोन्याच्या उत्पादनातले जवळ जवळ ६० टक्के सोने वापरले जाते. आणि हे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यामुळे शेक्स्पीयरपेक्षा तुकाराम महाराजांना सोन्यासंबंधी ज्यास्त जाण असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे सोन्यासारखे चकाकणारे पितळ व खरे सोने ह्यासंबंधी तुकाराम महाराज सांगतात : "काळकूट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्ष देती ॥". म्हणजे पितळ हे जरी पिवळे आहे तरी कलंकाने काळेकुट्ट होते; आणि सोने हे पिवळे असून निरंतर शुद्ध राहते.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२

बुधवार, ३१ मार्च, २०१०

ई-तुका सकल संपूर्ण

ई -तुका : ७

ईतुका सकल संपूर्ण !

तुकाराम महाराज जर संगणकावर अवतरले तर आपल्याला त्यांना ई-तुका म्हणावे लागेल. पण फरक इतुकाच राहणार नाही तर बरेच नवे काही संगणक आपल्याला सांगेल.
संगणकाचे युग हे वेगाचे युग असते. संगणकावर लिहिण्याचा वेग, तो अपलोड होण्याचा वेग, तुकारामाचे अभंग डाऊनलोड करण्याचा वेग, असे सगळे वेगवान जग, प्रथम मोजते तो वेगच ! तुकाराम महाराजांना सगळ्यात अप्रूप कशाचे होते तर ते शब्दांचे. म्हणूनच ते म्हणाले होते : "आम्हा घरी धन, शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या, जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन, जनलोका ॥ तुका म्हणे पाहा, शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव, पूजा करू ॥" तुकाराम महारांच्या गाथेचे देहू प्रत, जोग प्रत, शासकीय प्रत वगैरे अनेक प्रती आहेत. पैकी देहू प्रत संगणकावर उपलब्ध असून ती तुकाराम.कॉम ह्या वेबसाईटवर ही पाहता येते. तुकाराम महाराजांच्या ह्या गाथेत एकूण ४५८३ अभंग आहेत. आता इतक्या प्रचंड गाथेत एकूण शब्द किती असतील बरे ? प्रत्यक्ष पुस्तकात (हार्ड कॉपी) एकेका पानावर शब्द मोजायचे म्हणजे फार जिकीरीचे काम. शिवाय संगणक युगात असं मोजत बसलं तर हसं होईल ते होईलच. संगणकाकडूनच एकूण शब्द मोजता आले तर मात्र ते आधुनिक वाटेल. तर ही प्रत वर्ड हया प्रकारात उघडून त्यातल्या वर्ड-काऊंट सवलतीचा उपयोग केला तर? करून पाहिले तर एकूण शब्द गाथेत निघाले : दोन लाख,तीन हजार आणि सातशे पन्नास ( २,०३,७५० शब्द ). संगणकावर फार विश्वास टाकता येत नाही. कधी कधी आपल्या चुकीने चुकीचे उत्तरही येऊ शकते. म्हणतातच की संगणक म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट ( कचरा आत तर कचरा बाहेर ! ). मग ह्याचा प्रत्यक्ष प्रतीतल्या (हार्ड कॉपी) एका पानावरचे शब्द मोजले तर ते निघाले :२१५ व अशी पाने भरली ९५५. म्हणजे अंदाजे शब्द २,०५,३२५. हे संगणकाच्या वर्ड-काऊंटच्या २,०३,७५० शब्दांच्या बरेच जवळचे आहे म्हणून बरोबर असणार. आता तुकाराम महाराजांनी हे सर्व शब्द वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत लिहिलेले आहेत. साधारण विसाव्या वर्षी त्यांचे कवित्व सुरू झाले असेल असा अंदाज धरला तर २२ वर्षांचा सर्जनशील कालखंड मिळतो. भागाकार केल्यावर हे भरतात दिवसाकाठी २५ शब्द !
दिवसाकाठी २५ शब्द हा वेग प्रचंड का खूप कमी हे आता पाहू या। मागच्या वर्षी महाराष्ट्र-काव्य भूषण हा किताब मिळालेले बहु-प्रसव कवी मंगेश पाडगावकर यांचा वेग तुलना करण्यासाठी बघू. मंगेश पाडगावकरांचे समग्र साहित्य तसे त्यांच्या प्रकाशकांकडे संगणकावर उपलब्ध असणार. पण ते आपण थोड्याशा अदमासाने ताडू शकतो. त्यांच्या "गिरकी" ह्या काव्यसंग्रहात एकूण शब्द आहेत ८,८००. त्यांचे अशी एकूण पुस्तके आहेत:४५ (शेवटच्या "शब्द" पर्यंत ). तर त्यांची एकूण शब्दसंपदा भरेल अंदाजे: ४५*८८००=३,९६,००० शब्द ! आणि त्यांनी हे सर्व उभे केले वयाच्या २० व्या वर्षापासून आत्ताच्या ८२ व्या वर्षापर्यंत म्हणजे एकूण ६२ वर्षात. मग हा वेग भरतो दिवसाकाठी १७ शब्द ! सध्याच्या युगातले अगदी हातखंडा चपखल शब्द देणारे कवी सराव करतात दिवसाकाठी १७ शब्दांचा, तर ईतुका त्यांच्या दीडपट ! कवी मंगेश पाडगावकरांना ह्या तुलनेचा राग येणार नाही हे तर नक्कीच पण इथे तुकाराम महाराजांच्या प्रचंड प्रतिभेचे दर्शन घडते आणि ईतुका आकाशाएवढा हे सप्रमाण पहायला मिळते ! अगदी त्यांच्याच शब्दात " सकल संपूर्ण गगन जैसे ! "

अरुण अनंत भालेराव , १८६ / ए -१ , रतन पलेस ,गरोदियानगर ,घाटकोपर (पूर्व ) मुंबई -४०००७७ टेलिफोन : ९३२४६८२७९२

न कळे कृपावंता माव तुझी

ई -तुका : ६

न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२
३ मार्च २०१०

भारवाही तंत्राची मंत्र-गीता

ई -तुका : ५

भारवाही तंत्राची मंत्र-गीता !
माझ्या नातवंडांना जेव्हा मी त्यांच्या आई-वडिलांचे ( म्हणजे आमच्या मुलांचे ) पहिली दुसरीतले पेपर दाखवतो तेव्हा, उलटे बी, डी, त्रिकोणात उगवलेल्या फुलाचे फ्लॉवर-पॉट,वगैरे बालसुलभ चुका पाहून त्यांना खूप हसू फुटते व मग दिवसभर नातवंडे त्यांच्या आई-वडिलांची खिल्ली उडवत राहतात. आता भले ते खूप हुशार आहेत, पण लहानपणी ते ही चुका करतच शिकले होते हा बोध मग नातवंडांना होतो.
"आऊटलायर्स" नावाच्या नुकत्याच आलेल्या माल्कम ग्लॅडवेल च्या पुस्तकात तर त्याने मांडलेय की जीनीयस अशी कोणी व्यक्ति नसते तर ज्याला खूप सराव होतो, तोच मग जीनीयस होतो. आता सचिनचेच बघा ! काय प्रचंड मेहनत ! त्याची ९३ शतके झळाळतात पण त्याने किती नाना तर्‍हेचे लाखो चेंडू सरावात झेलले ते आपल्याला माहीत नसते. गणिताचे तर हे नेहमीचे ठरलेलेच आहे. जितका सराव ज्यास्त तितका गणित कमी लचका तोडते. हुसेन आता प्रसिद्ध चित्रकार आहे पण किती असंख्य सिनेमाची पोस्टर्स त्याने रंगविली असतील ते तोच जाणे. तर सरावाची महती अशी !
तुकाराम महाराजांच्या गाथेची अशीच करावी तितकी मोजदाद कमीच भरेल. दोन लाख तीन हजार सातशे पन्नास शब्द, चार हजार पाचशे चौर्‍यांशी अभंग, एकूण २५६७० खंड किंवा चौक आणि हे सगळे वयाच्या बेचाळिस वर्षाच्या आत ! प्रत्येक चौकात एक यमक जोडी म्हणजे २५६७० यमके ह्या कवीने निर्माण केली. किती सराव, कसा हातखंडा !
आता इतका हातखंडा असलेला कवी अगदी सुरुवातीला कच्चा होता, असे कोणी म्हटले तर त्याचे कोण मानणार ? कुसुमावती देशपांडे ह्या खूप विद्वान बाई. त्यांनी साहित्य अकादेमी साठी "A History of Marathi Literature" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात तुकारामासंबंधी लिहिले आहे :His first important work was Mantra Geeta. It was written after years of suffering and spiritual contemplation.Tukaram had studied sacred works and also composed some abhangas before he attempted this interpretation of Geeta. However, it was not a work of quality of the Jnaneshwari. It is tentative, more an expression of views of Tukaram and of contemporary conditions than than an elucidation of the Geeta. It is also unsophisticated and downright in its style, with the unadorned language of everyday usage..." सरावाने कवी महाकवी होतो हे जरी आपल्याला मंजूर असले तरी ते तुकाराम महाराजांना लागू करायला धीर होत नाही. आणि आजकाल तर हा विचार आधी कोणाची कोणती जात आहे त्यावरून ठरविला जाण्याची शक्यता. जे तुकाराम भक्त आहेत ते तर लागलीच म्हणतात की हा वेगळा तुकाराम आहे. हा कोणी नगरचा तुकाराम होता देहूचा नव्हे !
खुद्द तुकाराम महाराज लीनतेने म्हणतात :फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥ पण तुकाराम भक्तांना वाटते हा काही सन्मान नाही, असे कसे असेल ? पण सुरुवातीची रचना कच्ची असणे, ह्यात सरावाचा व नंतरच्या प्रतिभेचा बहुमानच आहे. शिवाय हे किती जिवंत कलाकाराचे दर्शन आहे. मला तरी वाटते, हाच खरा तुकाराम आहे, कारण ह्यात भारवाही तंत्राची मंत्र-गीताच सांगितली आहे !

--अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

मौखिक परंपरेचे मुख

Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

तुकाराम आणि शेक्सपियर 1

ई-तुका:३
तुकाराम महाराज आणि शेक्स्पीयर-१
नावात काय आहे ?
सर्व मोठी माणसे एकसारखाच विचार करीत असावेत. भाषा काळ वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का ? असा विचार शेक्स्पीयर आणि तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचून करण्याचे ठरविले, तर खूपच सारखेपणा आढळतो. वानगीदाखल शेक्स्पीयरचे एक प्रसिद्ध वाक्य घेऊ: "नावात काय आहे ? " मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलियट मध्ये ज्युलियटच्या तोंडी असे येते:"नावात काय आहे ? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसर्‍या कुठल्याही नावाने तेवढेच गोड, सुवासिक लागेल . ( व्हाट इज इन ए नेम? दॅट विच वि कॉल ए रोज, बाय एनी अदर नेम, वुड स्मेल ऍज स्वीट ! )." ह्याला समविचारी मराठी वाक्प्रचार लोक देतात: नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा ! म्हणजेच नावात काय आहे ? हाच मतितार्थ. हेच तुकाराम महाराज म्हणतात असे म्हणतात : "तुका म्हणे राजहंस ढोरा नावें । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥ ( अभंग २००६,जोग प्रत ) ." म्हणजे एखाद्या बैलाचे राजहंस असे नाव ठेवले तर ह्या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग ? असाच मतितार्थ असणारा अजून एक अभंग आहे : "सावित्रीची विटंबना । रांडपणा करीतसे ॥ काय जाळावे ते नाव । अवघे वाव असे तें ॥ कुबेर नाव मोळी पाहे । कैसी वाहे फजीती ॥ ( १४७७,जोग प्रत ). " नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजीती. नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या . अशी नावे काय जाळायची ? शेक्स्पीयरच्या अवतीभवतीच्या सुबत्तेमुळे गुलाबासारखे गोड उदाहरण तो घेऊ शकला असेल व जीवनाच्या खडतर धबडग्यामुळे तुकाराम महाराज रोखठोक, पण जमीनीवरचे ( भले ते गोड, आशावादी नसेल ) उदाहरण घेत असतील. पण मुळातला विचार दोघांचाही सारखाच !

अरुण अनंत भालेराव
टेल: ९३२४६८२७९२

संपत्ती

ई-तुका: २
संपत्ती
कवण दिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥
चौदा चौकडिया लंकापती । त्याची कोण जाली गती ॥
लंकेसारिखे भुवन । त्याचे त्यासी पारखे जाण ॥
तेहतीस कोटी बांदवडी । राज्य जाता न लगे घडी ॥
ऐसे अहंतेने नाडिलें । तुका म्हणे वाया गेले ॥

आयुष्यभर संपत्ती कमावयाची, अपार मेहनत करायची, दिवस-रात्र एक करायचा आणि आयुष्य़ाच्या उतरणीवर कळू यावे की हे सगळे "वाया गेले !" ही केवढी मोठी शोकांतिका ! कमवायला सुरुवात करताना आदर्श ठेवायचा "दहा पिढया बसून खातील एवढे कमवायचे" हा. आणि शेवटी शेवटी जाणवते की जगराहटीत हे शक्यच होत नाही.
रावण, लंकापती, लंकेत सोन्याच्या विटा, चौदा चौकडया ( म्हणजे खूप खूप ज्यास्त !)संपत्ती, तेहतीस कोटी बांदवडी, वगैरे जाऊ द्या. आजच्या काळातली उदाहरणे घ्या. एकेकाळी किर्लोस्कर घराणे किती श्रीमंत वाटायचे. पण आता तिसर्‍या पिढीत ते साधारण-श्रीमंतच म्हणायचे. आजुबाजूच्या श्रीमंतांची दखल घेऊन बघा, तिसर्‍या पिढीतच संपत्ती कंटाळायला लागते. आणि रहाटी अशी की मग पुढची पिढी परत कर्तबगार निघते, प्रयत्न करते, व परत संपत्ती जमवावयाला लागते.
संपत्तीचे हे चक्र कोणाला न टळणारे आहे. शिवाय ती वारसां मध्ये भांडणे लावते ते निराळेच.तसे हिशोब केला तर एका माणसाला लागते तरी किती संपत्ती.सरासरी आयुष्य समजा धरले ८० वर्षांचे तर: जेवण-खाण दरमहा:१०००+कपडालत्ता दरमहा:२००+दळणवळण:५००+शिक्षण:५००+इतर:५००=एकूण रु.२७०० दरमहा कींवा पूर्ण ८० वर्षांसाठी २५ लाख रु.घर साधारण १२० वर्षे टिकेल असे धरले तर ४० लाखाचे घर ८० वर्षांसाठी पडेल २५ लाखाला.म्हणजे एका माणसाला पूर्ण
आयुष्यभरासाठी लागतात फक्त ५० लाख आणि तो आजकाल मागे ठेवतो १ कोटी. अर्थात ह्या रकमा सगळ्यांनाच सरसकट लागू होणार नाहीत पण सरासरी सुखवस्तु माणसाला लागू होतील व त्यातून हे सहजीच जाणवेल की संपत्ती शेवटी "वाया जाते !"
तुकाराम महाराज हे अहंकाराने होते असे म्हणतात ते प्रथम आपल्या ध्यानात येत नाही. आपल्याला वाटते संपत्तीचे वाया जाणे हे मोहापायी घडते आहे. मोह हा आपल्या अहंकारापायीच होत आहे ही बारीक बाब आपल्या ध्यानात येत नाही.

---अरूण अनंत भालेराव
दूरभ्रमण: ९३२४६८२७९२

मंगळवार, ३० मार्च, २०१०

तुकारामाच्या गजला

इ-तुका
तुकारामाच्या गजला:
तुकाराम महाराज गजल लिहीत असतील असं कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करणार नाही. मोंगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा बहादुर शहा जफर हा जसा साम्राज्य ब्रिटिशांना हवाली करण्यासाठी प्रसिद्ध होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी ज्यास्त त्याची प्रसिद्धि आहे गजलांसाठी. त्याची एक गजल पहा उदाहरणादाखल:
कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं

कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं

कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं

कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं

कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं

कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं

कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं

आता हाच अंदाज जपत ’कहीं ’ ऐवजी मराटीत ’कैं’ वापरत तुकाराम महाराजांची ही गजल पहा:
कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥
कैं भोज्य नानापरी । कैं कोरडया भाकरी ॥
कैं बसावे वाहनी । कैं पायीं अनवाणी ॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसने ती जीर्णे ॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ॥
कैं सज्जनाशी संग । कैं दुर्जनाशी योग ॥
तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥
इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि कही व कैं हे सारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयात सुद्धा जो सारखेपणा आहे त्याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ).तुकाराम महाराजांचा "सज्जनाशी संग" हाच जफरचा "शोरे-कुलकुल" आहे तर "दुर्जनाशी योग" हा " शोरे-मस्तां " ( वेडयांचा गदारोळ)
आहे. जफरच्या गजलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना.