तुक्याची ग्वाही-१
"चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काई ।
स्वहित ते ठायी आपणापें ॥" ( जोग प्रत: ५५०)
ग्वाही म्हणजे साक्ष देणे, हमी देणे, ग्यारंटी देणे. आपण आजूबाजूला नेहमी पाहतो की सर्वांसमक्ष मारामारी, लूट, खून झालेला असतो, पण कोणी साक्ष द्यायला पुढे येत नाही. कारण असते, नसत्या लचांडाचे. उपदेश देण्यातही असेच असते.बघा बुवा, करून पहा, गुण येईल असे सांगणारे, मोघम सांगतात व त्यामुळे ऐकायला बरे वाटले तरी फारसे आपण त्या वाटेला जात नाही.पण संतांचे तसे नसते. त्यातही तुकाराम महाराज हे स्वत: साधक राहून, सामान्य माणसाचे हाल सोसून, संतपदी पोहोचलेले. त्यांच्या सर्व शिकवणुकीत अगदी कळवळा असतो तो माणसाला "स्वहित" कसे साधता येईल,त्याचा. अध्यात्म सांगते परोपकाराच्या गोष्टी पण इथे तुकाराम महाराज सांगत आहेत, त्या स्वहिताच्या गोष्टी.अगदी स्वार्थ म्हटले तरी हरकत नाही. आणि ते म्हणत आहेत की तुमचे स्वहित कशात आहे ते तुमच्या मनाशिवाय, चित्ताशिवाय दुसरे कोण अधिक जाणेल बरे ? लोक काय म्हणतील किंवा लौकिकाची चाड धरण्याचे काही कारण नाही. आपल्या स्वहितासाठी आपले चित्तच साक्षी ठेवावे व त्याप्रमाणे वागावे. बरे हे सांगणे अगदी आधुनिकतेचे आहे. कारण आजकाल मोठमोठ्या कंपन्यातल्या अधिकार्यांना त्यांचे मालक विचारतात "तुमचे गट फीलींग काय आहे". हीच आहे "चित्ताची ग्वाही !"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा