बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

मी चोर तू पोलीस

चोर पोलीस खेळू ! मी चोर तू पोलीस !

-----------------------------------

आमच्या लहानपणीचा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता चोर पोलीस. ह्यात कोणालाही पोलीस व्हायला आवडायचे नाही. प्रत्येकाला चोरच व्हायचे असायचे. अगदी नाईलाजाने ज्याच्यावर राज्य येई त्याला पोलीस व्हावे लागे.

चोराला लपून बसायला मिळे, पळून जायला मिळे, तर पोलिसाला एकेकाला पकडावे लागे.

व्यवहारात सुद्धा चोर हे नेहमी पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतात. चोर हुशार असतात.

जे पदार्थ तब्येतीला वाईट असतात नेमके तेच चवीला छान असतात. आपल्याला वाईटच आवडते. अळणी नको असते.तुकाराम महाराज हेच सांगताना म्हणतात की चांगले सुगंध सोडून माशी पहा कशी दुर्गंधीपाशी जाते : राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुर्गंधीशीं अतिआदरें॥3॥तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥

ह्या सगळ्याच्या मुळाशी म्हणे माणसाचे रॅशनल नसणे आहे. आपण म्हणे ईरॅशनल बुद्धीचे असतो. आपली ठेवणच तशी आहे म्हणे ! अनेक लोकांच्या अथक प्रयत्नांनी आपण रॅशनल होतो ( ते ही झालो तर...!).

---------------------

-------------

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

कारणा कारण

कारणा कारण
विज्ञानाच्या अभ्यासामुळे आपला असा समज होतो की जे काही आपल्या अवती भवती घडते आहे त्याला काही ना काही कारण असतेच. सगळ्याच ज्ञानशाखांचा रोख हे कारण शोधण्याकडे असतो.
आग, पाणी, तेज, वायू, आकाश, ही आदिम पंचमहाभूते घेतली तरी विज्ञान म्हणते की ती काही स्वयंभू अशी असत नाहीत. काही तरी कारण घडते आणि ही पंचमहाभूते प्रकटतात. सगळे जगच जर पंचमहाभूतांचे बनलेले असेल तर मग जगात विनाकारण असे काही नाहीच म्हणायचे !
आपण माणसे ह्या जगात अगदी एकमेवाद्वितीय आहोत असा भ्रम जरी खरा मानला तरी आपल्यावरही कोणा कोणाचा प्रभाव पडतच असतो असे कोणतेही प्राथमिक मानसशास्त्र आपल्याला सांगून जाते.
एकूण काय कुठलेही निरिक्षण, कुठलाही विचार, कुठलेही प्रमेय, कुठलाही वाद, काहीही घेतले तरी ह्या कार्य-कारणातून आपल्या समजाची काही सुटका दिसत नाही. आणि हे वैज्ञानिक कार्यकारण शोधणे इतके धोक्याचे असते की इथे किती टक्क्याचे कारण हे खरे कारण असा काही ठोकताळा नाही. अगदी नोबेल पारितोषिक मिळालेल्या ग्रॅंगर-कॉज च्या समीकरणातही किती टक्क्याचे प्रमाण म्हणजे खरे कारण असे काही सापडत नाही. म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आटापिटा हा असा मोघमच !
ह्या गदारोळातून तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गाचा उपाय सुचविला आहे. ते म्हणतात : ( २८७१, जोग प्रत,) : कारणा कारण ( कार्यकारण ) वरियेले जेथे । जातों तेणे पंथे सादावित ॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरवंसेनी ॥ ( जोग प्रतीतला अर्थ : ज्या ठिकाणी कार्यकारण नाहींसे होते ( शेतात बी पेरले असतां धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारण भाव प्रवृत्तीमध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सारली आहे त्या निवृत्तीच्या ) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही ह्याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल.
-------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------