मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

कवित्वकवित्व
गुजरातीतले एक प्रसिद्ध कवी आहेत, सुरेश दलाल नावाचे. त्यांना आम्ही एकदा आमच्या लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला बोलावले होते. जेवताना मी त्यांना विचारले होते की आजकालच्या साहित्यिकांचे साहित्य हे आठ दहा वर्षातच विस्मरणात जाते, पण आज साडे चारशे वर्षे होऊनही तुकारामाचे अभंग अजून कसे टिकले आहेत ? त्यावर त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. त्यांच्या मते आजकालचे साहित्यिक हे मुद्दाम काही पोज / आव  ( भूमिका ) घेवून लिहितात, तर त्या मानाने तुकारामाचे लिहिणे हे कुठलीही भूमिका न घेता, सहज सरळ प्रवृत्तीने आहे व म्हणून ते भिडणारे आहे, तसेच टिकणारे आहे .
भले, तुकारामाने आव आणला नसेल, पण आपण काव्य का लिहितो, कोणासाठी लिहितो, कसे लिहितो, ह्याबाबत त्याने विचार केला होता काय हे पाहणे मोठे मनोहारी ठरावे. तुकारामाबद्दल दुसऱ्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा खुद्द तुकारामानेच आपल्या कावित्वाबाद्द्ल काय लिहिले आहे ते पहावे असे ठरवले तर काय सापडते ?
कलियुगात अनेक पाखंडी लोक कुशलतेने कविता करीत आहेत पण ते सगळे दंभी असून बोलतात एक व वागतात वेगळे. द्रव्य व संसार ह्यातच ते रममाण होतात. देहाहून अलिप्त राहून ते वेदांनी सांगितलेले स्वहित करणारे नाहीत. असे रास्त वर्णन तुकाराम महाराज इथे असे करतात :    
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥1॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी। मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥2॥
वेदाज्ञे  करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥3॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥4॥
आपण बोलतो कसे व कोण आपल्याला बोलवतो हे अजून गूढच असले तरी तुकारामाची अशी नितांत श्रद्धा आहे की पांडुरंगच त्याला बोलका करीत आहे. हे मी केलेले, जोडलेले कवित्व नसून ते देवानेच माझ्याकडून वदवून घेतलेले आहे. मी केवळ मोजायला असलेला मापारी आहे अशी तुकारामाची श्रद्धा आहे. कवी जरी अश्रद्ध असेल तरी कविता कशी सुचली हे तो आजही ठामपणे सांगू शकत नाही. सश्रद्ध तुकारामाला मग  पांडुरंग हे करवितो आहे असे वाटल्यास नवल नाही.
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥
तुका म्हणे आहें पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥
ह्याच श्रद्धेपोटी खुद्द नामदेवांनी स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत दिलेला आहे व त्याबरहुकूम आपण कवित्व करीत आहोत असे तुकारामाला वाटत असावे.
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥1॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥2॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥3॥
तुकारामाच्या दृष्टीने कवित्व हे काही फावल्या वेळात करायची विरंगुळ्याची गोष्ट नसून ती एक भक्तीसाधना आहे व त्यासाठी तो कवित्व करतो आहे.
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥1॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥2॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥3॥
पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥4 ॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥5॥
तुका ह्मणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥6॥
केवळ कवित्व केले म्हणून काही कोणी संत होत नाही हा साधा विचार तुकाराम असा सांगतात : नव्हती ते संत करितां कवित्व
दणादण टाकसाळी सारखे कवित्व पाडणे हे काही सोपे काम नसून ती एक साधना आहे असा तुकारामाचा विचार आहे :
 नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥
 लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥
 तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥
लोकां सांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण, ह्या प्रकारचे लोकांना केवळ सांगण्याचे कवित्व हे काम नसून ते आचरण करण्याचेही काम आहे असे तुकाराम सांगतात :
ब्रह्मज्ञान  भरोवरी । सांगे आपण न करी॥1॥
 थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥
 कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥2॥
 तुका ह्मणे कवित्व करी । मान लोभ हे अंतरी  ॥3॥
कवित्व करणे हे काही सहज साध्या होणारे फळ नसून ती एक साधना असून जिव्हाळ्याची ओल त्यासाठी आवश्यक आहे असे तुकाराम इथे असे सांगतात:


लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची  ॥1॥
 नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥
 लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥2॥
 तुका ह्मणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥3॥
कवित्व करणे हाच काही शेवट असू शकत नाही तर भक्ती हे अंतिम ध्येय असून कवित्व केवळ एक माध्यम आहे असे तुकाराम सांगतात :
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥1॥
करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥
तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥2॥
तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥3॥