तुकाराम महाराजांचे अध्यात्म
-------------------------------------
एकदा एका कुटुंब
नियोजनाच्या कार्यक्रमाला मुख्य वक्ते होते नरेंद्र मोदी आणि मुख्य पाहुणे होते
अटल बिहारी बाजपेयी.
दोघांनाही अनुभव शून्य !
असेच काहीसे अध्यात्मावर बोलताना होते ! आपल्याला माहीत सगळे असते पण प्रत्यक्ष
स्वानुभव ? माझी “कीर्ती” तशी सर्वख्यात असल्याने, तुम्ही ताडलेच असेल की आत्म्या-बित्म्या विषयी मला नक्कीच
काही स्वानुभव नाहीय. पण माझा विषय इतका सोयीचा आहे की मला नसला तरी तुकाराम
महाराजांना नक्कीच ह्याबाबत स्वानुभव आहे. तर आता, आपण पाहणार आहोत
की तुकाराम महाराजांचे अध्यात्म काय आहे ?
अध्यात्म हे इतके मोघम
प्रकरण आहे की कोणी अंदाजाने, गैरसमजाने , अर्थ काढला तरी
तो गहन आणि महान असू शकतो. तुकाराम महाराजांचा ह्या गैरसमजावर एक अभंग आहे :
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न
अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥ बोलों नयें मुखावाटां ।
म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥ ( कोणी एक वृद्ध पुराणिक देवळामध्ये
नित्यशः पुराण सांगत असत. त्यांना दाढी होती. तेथे बहुत श्रोते श्रवणास येत असत.
त्या मध्ये एक धनगर येत असे. पुराणिक बुवा पुराण सांगू लागले म्हणजे त्यांची दाढी
हालत असे. ते पाहून पुराणिक व इतर श्रोते ह्यांना असे वाटले की हा खरोखर प्रेमळ
आहे. पण त्या धनगराची रडण्याची अंतःकरणातील भावना वेगळी होती. ते त्याचे रडे
त्याला आवरत नसे, कारण त्याच्या
प्रीतीचा एकुलता एक बोकड मेला होता. त्याचे खूर व नख्या त्याला क्षणोक्षणी आठवत
असत. तो म्हणे, आता मुखाने काय बोलावे ? ह्या हजारो
शेरड्यामध्ये माझा बोकड “ब्याचा” म्हणजे बेण्याचा
असा एकुलता एक होता. पुराणिक बोवा पुराण सांगताना एक पुरुष व दुसरी प्रकृति असे
दोन बोटे करून श्रोत्यांना सांगत. पुराणिक बुवांनी दोन बोटे पुढे केलेली पाहून तो
धनगर श्रोता म्हणे, “होय हो, माझ्या बोकडाला
दोनच शिंगे होती. तुम्ही बरोबर त्याच्या खुणा दाखविता, पुराणिक बुवा !”. हे ईशाचे देह चार
आहेत, असे चार बोटे
पुढे करून पुराणिक बुवा सांगू लागले, ते पाहून तो धनगर श्रोता म्हणे, “होय हो, त्याला चारच पाय
होते. तुम्ही त्याच्या बरोबर खुणा दाखविता.”. त्या धनगराचे अंतःकरण जे तळमळत होते ते केवळ मेलेला बोकड
मनात आणल्याने होय. शेवटी आपल्या रडण्याविषयीचा पोटातील बोकडासंबधी भाव पुराणिक
बुवाजवळ तो धनगर ओकला. तुकाराम महाराज म्हणतात अंत:करणातली खोटी गोष्ट छपून न
राहता लोकांना ती स्पष्ट कळून येते.---जोग प्रती मधून ) .
अध्यात्म ह्याचा
शब्दकोशातला अर्थ आहे : आत्म्याबद्दलचे, ( अधि + आत्मन् ), आत्मविद्या, वेदांत. वेदांत हे तांत्रिक दृष्ट्या वेदाच्या शेवटी येणारे
म्हणजे आरण्यके व उपनिषदे. आरण्यके म्हणजे वेद भागांचे अरण्यात करण्याचे पठण.
उपनिषदे ही आरण्यकेच होत. उपनिषदे म्हणजे गुरूच्या पायाशी बसून शिकायची
अध्यात्मविद्या.
अध्यात्म प्रकरण ही
प्रामुख्याने संस्कृत मध्ये सांगितलेली विद्या आहे. मग ती वाणी असलेल्या
तुकारामाला अवगत होती का ?
खुद्द तुकाराम
महाराज एके ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने
म्हणतात की त्यांच्या घरी साक्षात वेदांत
पाणी भरते आहे :
सर्वपक्षीं हरि साहेसखा
जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता ॥1॥ सहजचाली चालतां त्याला पायवाटे । चिंतामणीं समान होती
गोटे ॥2॥ तुका तरी सहज
बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥3॥
आत्मा हा शब्द ‘अत्’ (सतत चालत राहणे)
अथवा ‘अप्’ (व्याप्त होणे) या
धातूंपासून बनला आहे, असे यास्काने
निरुक्तात (३.१२.२) म्हटले आहे. पण त्याच्याशी समानार्थक असलेल्या ग्रीक शब्दाशी
तुलना करून ‘अन्’ (श्वासोच्छ्वास
करणे) या धातूपासूनसुद्धा पाश्चात्त्य पंडित त्याची व्युत्पत्ती देतात. सामाजिक
मानवशास्त्राच्या दृष्टीने या दोन्हीही व्युत्पत्ती जुळवून घेता येतील.
आत्मा हा शब्द तुकारामाला
नुसता माहीतच नव्हता तर त्यावर त्याचे अभंगात खूप ठिकाणी भाष्य येते. जसे :
ब्रह्मयाचे वेद शंखासुरें
नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥1॥ तेणें आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडासी । काय ब्रह्मयासी
नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥ परि तेणें धावा
केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥2॥ तुका ह्मणे विठोबा मी नामधारक । पोसणे सेवक भेटी देई
॥3॥
किंवा
करूनि राहों जरी आत्मा चि
प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥1॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते
॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान
। आह्मासी चरण न सोडणें ॥2॥ विरोधें विरोध वाढे पुढतापुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥3॥ सांडीमांडी
अंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥4॥ तुका ह्मणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण
बळी निरसी देह ॥5॥ ( देवा, मी असंग, शुद्ध, बुद्ध आत्मा आहे, असा निश्चय
करावयास गेल्याने माझे मन निश्चळ होत नाही, ह्याला कसे करू ? खरे जेवल्यावाचून ढेकर कशाची येणार ? बाकी ( आत्म्याचा
अनुभव नसता, आत्मा असा तसा
आहे हे ) सर्व शब्दाचे प्रकार शब्दच आहेत. हे देवा तुमचे ब्रह्मज्ञान आता पुरे !
आम्हाला तुमचे पाय सोडवत नाहीत. वाकडेपणाने वाकडेपणाच ( विरोधाने विरोध )
उत्तरोत्तर वाढेल. जन्म हा अंतकाळी होणाऱ्या वासनेवर अवलंबून आहे. अन्य काही
(विधी-निषेधांच्या ) खटाटोपी करण्यामध्ये पाप-पुण्य उत्पन्न होते. ( मग
चित्तशुद्धी कशी होणार ? देहादिकांना मी व
स्त्री-पुत्रादिकांना माझे समजावणे ह्या भ्रमालाच ह्या संकल्पालाच बंध म्हणतात.).
तुकाराम महाराज म्हणतात, मुक्तस्थिती ही
सहज मिळणारी नाही, ती प्राप्त करून
घेण्यास देह-निरसन ( देहाभिमानाचे निरसन ) केले पाहिजे; ते करील असा
बलाढ्य कोण आहे ? ).
तुकाराम महाराज हे नुसतेच
आत्मा मानणारे अध्यात्मिक नसून एक क्रांतिकारी अध्यात्मिक आहेत. आज पावेतो लोकांची
प्रत्येक माणसाला आत्मा असतो इथवरच मजल गेली आहे. पण तुकाराम महाराज एवढे
क्रांतिकारी आहेत की ते प्राण्यांनाही आत्मा असतो असे मानतात :
जीवें जीव नेणे पापी
सारिका चि । नळी दुजयाची कापू बैसे ॥1॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये
॥ध्रु.॥ देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठाचे हात वाहाती कैसे ॥2॥ तुका ह्मणे तया
चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥3॥
तुकाराम महाराजांची
अध्यात्मिक तयारी पहायची तर त्यांचा हा अभंग पहा :
रक्त श्वेत कृष्ण पीत
प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥1॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टी जाली । कल्पना निमाली
द्वैताद्वैत ॥ध्रु.॥ देशकालवस्तु भेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥2॥ न जाला प्रपंच
आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥3॥ तत्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तें चि जाला अंगें तुका
आतां ॥4॥
तांबडा वर्ण रजोगुणाचा
आहे, पांढरा
सत्वगुणाचा आहे व काळा तमोगुणाचा आणि पिवळा वर्ण शुद्ध सत्वाचा आहे. ह्या ज्या
गुणप्रभा आहेत त्याहून निराळे चिन्मात्र ( ज्ञानमात्र ) असे काजळ माझ्या
बुद्धीच्या डोळ्यात सद्गुरूने घातले. त्या
अंजनाच्या योगाने माझ्या बुद्धीवरील मल, विक्षेप, आवरण, हे दोष जाऊन दृष्टि दिव्य झाल्यामुळे द्वैत व अद्वैत ह्या कल्पना
नाहीशा झाल्या. देशपरिच्छेद, कालपरिच्छेद, व वस्तुपरिच्छेद हे नाहीसे होऊन यावत विश्व हे आत्मरूपाने
सोज्वळ झाले आहे. प्रपंच हा झालाच नाही. एक परब्रह्म आहे; अहं ब्रह्म, सोहं ब्रह्म, अशा भावनेच्या
अभ्यासाने त्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान मला झाले. तुकाराम महाराज म्हणतात, तत्वमसि
महावाक्याच्या विचाराने ब्रह्मसाक्षात्कार झाला. मी ब्रह्मानंदात पूर्ण निमग्न
झालो, किंबहुना संपूर्ण
ब्रह्मानंदच स्वतः मी झालो आहे.
मोक्ष ही अध्यात्मातली
मोठी गूढ संकल्पना आहे. तुकाराम गाथेत मोक्ष हा शब्द ३८ वेळा येतो. त्यावरून
त्याबद्दल तुकारामांनी सखोल उहापोह केलेला आहे असे कळेल. मोक्ष म्हणजे कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट
बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम
अवस्था. जगातील विविध धर्म व संप्रदाय आपल्या अनुयायांना मोक्ष देण्याचे आश्वासन देत
असतात आणि त्यासाठी आपण उपदेशिलेल्या मार्गाचा लोकांनी अवलंब करावा, असा त्यांचा
आग्रह असतो. मोक्ष हा धर्म,
अर्थ व काम ह्या
तीन पुरुषार्थापैकी मोठा असा चौथा पुरुषार्थ मानलेला आहे. ऋग्वेदादी संहितांच्या
काळात इंद्रादी देवतांच्या कृपेने इहलोकीचे जीवन सुखी करणे, हे उद्दिष्ट
लोकांच्या डोळ्यापुढे होते. हे उद्दिष्ट मोक्षापासून तत्त्वतः भिन्न होते.
उपनिषदांपासून पारमार्थिक कल्याणाचे उद्दिष्ट अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले.
पुरुषार्थांच्या संकल्पनेचा इतिहास पाहिला, तरी प्रथम धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची कल्पना करण्यात आली होती आणि
नंतरच्या काळात मोक्षासह चतुर्वर्गाची कल्पना स्वीकारण्यात आली. भारतीय
संस्कृतीमध्ये मानवी जीवनातील मूलभूत उद्दिष्टे म्हणून मानण्यात आलेल्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष या
चार पुरुषार्थांपैकी मोक्ष हा अंतिम व सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ होय. जन्ममरणाच्या
दुःखदायक फेऱ्यातून कायमची सुटका झाल्यामुळे होणारे सर्वश्रेष्ठ पारमार्थिक कल्याण, हा स्थूलमानाने
मोक्ष या संज्ञेचा पारिभाषिक अर्थ आहे. बंध व मोक्ष या परस्परविरुद्ध अर्थाच्या
संज्ञा असून अज्ञानामुळे बंध व ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे बहुतेक
भारतीय दर्शनांनी व संप्रदायांनी मानले आहे. आता ह्यावर तुकाराम महाराज
मोक्षाविषयी काय म्हणतात ते पाहू :
मन करा रे प्रसन्न । सर्व
सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा
स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे
दुसरें ॥३॥;
हरि तैसे हरीचे दास ।
नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥1॥ धरूनि पाय
त्यजिलें जन । न लगे मान मृत्तिका धन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें
जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे
मिठी । गिऱ्हे तरी वेठी राबवीती ॥2॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार
देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥3॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धिसिद्धि
देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥4॥ जन्ममृत्यु स्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें ।
तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥5॥ ( जसे हरि
सच्चिदानन्द आहेत तसेच हरीचे दासही आहेत. त्यांनाही हरिप्रमाणे भय, मोह, चिंता, व आशा नाही. उदास
स्थितीने राहून त्यांनी भक्तीचा कांचा बळकट घातला आहे. श्रीहरीचे पाय त्यांनी बळकट
धरून लोकांचा त्याग केला आहे. लोकांकडून मान मिळावा अशी त्यांना जरूरी नाही व पैसा
हा त्यांना मातीप्रमाणे भासत आहे. निरंतर ते श्रीहरीच्या नामामृताचेच पान करीत
आहेत. ह्या खेरीज दुसरे काही नको असे त्यांस वाटत आहे. त्यांच्या ह्रदयात अवकाश
पुष्कळ आहे. ते सिंधूप्रमाणे धैर्यवंत असे जगतात मल्ल आहेत, त्यांनी जी
श्रीहरीच्या चरणांना मिठी मारली आहे ती कामक्रोधाना देखील सुटत नाही. हे कामक्रोध
जरी मोठे ग्रह आहेत तरी त्यांना ते बिगारीला राबवितात. ते हरिदास इतके बलाढ्य आहेत
की त्यांच्यापुढे काळाचेही काही चालत नाही. ते इतके नम्र असतात की ते सर्वाच्या
खाली असतात. सर्व देहाविषयी ते उदार आहेत; चौसष्ट कला जाणून सर्व काही न जाणल्यासारखे आहेत. संसार हा
हरिदासांचा दास आहे. मोक्ष हा त्यांची वात पाहत आहे. रिद्धिसिद्धी तर त्यांनी
आपल्या देशाच्या हद्दपार केल्या आहेत. इतका त्यांना त्यांचा त्रास आहे. वैष्णव जन
हे त्यांना स्पर्श करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, ते हरिदास
जन्ममृत्यू हे स्वप्नाप्रमाणे मानतात. आपले आणि परके हे त्यांना भासत नाही. निरंतर
ते सुखी असतात. व त्या स्थितीत त्यांची वाणी प्रेमामृतस्वरूप जे हरीचे नाव त्याचे
स्मरण करीत असते.).
तुकाराम महाराजांच्या
काळात ब्राह्मणांचे वर्चस्व माजलेले होते व धर्माचे अवडम्बर बोकाळलेले होते.
त्यामुळे तुकाराम महाराज हे विद्रोह करण्याकडे साहजिकच वळलेले होते. त्यात परत
सामान्य जणांचा कळवळा ( बुडते हे जन न देखवे डोळा ) असल्याने अध्यात्म सोपे करून
सांगण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे नामसंकीर्तन परंपरेला ते मोक्षापेक्षा सोपे
मानतात व तेच आपण आचरावे असे सांगतात : बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां
चित्तीं काय नव्हे ॥1॥ आणिकां उपायां
कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥ गीत गावों नाचों छंदें वाहो टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥2॥ अनंत
ब्रह्मांडें एके रोमावळी । आह्मी केला भोळीं भावें उभा ॥3॥ लटीका हा केला
संवसारसिंधु ॥ मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥4॥ तुका ह्मणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत
त्याच्या बळें ॥5॥ ( सुबुद्धिदाता
लक्ष्मीचा पती विष्णू आहे. त्याचा चित्तात आठव केल्यावर काय प्राप्त होणार नाही ? सुखाचा ठेवा जो
पांडुरंग त्यास सोडून अन्य उपायांचे ठिकाणी मनाची वाटणी कोणी करावी ? वैष्णवांच्या
समुदायामध्ये आनंदाने गाऊ,
नाचू, आणि तालछंदात
टाळी वाजवू. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या एका रोमावर आहेत अशा श्रीहरीस आम्ही वर
निर्दिष्ट केलेल्या भोळ्या भावाने विटेवर उभा केला आहे. हा भवसागर आम्ही मिथ्या
जाणला म्हणून ह्यापुढे मोक्ष-बंधावस्था आमचे ठिकाणी वास्तविक नाहीत. तुकाराम
महाराज म्हणतात, ज्याच्या
नामाच्या अंकित आम्ही झालो आहो त्याच्याच बलाने आम्ही चिंताविरहीत आहो. ).
घेइऩ मी जन्म याजसाठीं
देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥ हरिनाम न कीर्तसंतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं
॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥2॥ आणीक सायास न
करीं न धरीं आस । होइऩ उदास सर्व भावें ॥3॥ मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका
ह्मणे ॥4॥
पुनर्जन्म ही अध्यात्मात
अगदी लोकप्रिय असलेली समजूत आहे. एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यात राहणाऱ्या जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्या कर्माची फळे
भोगण्यासाठी योग्य अशा योनीत म्हणजे देव, पितर, मनुष्य, पशू,
पक्षी, वनस्पती अशा
प्रकारच्या योनींत दुसरा देह प्राप्त होणे हा त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होय.
यास कर्मविपाक म्हणजे कर्माचे फळ म्हणतात. असे माणसाला एकूण ८४ लक्ष जन्म घ्यावे
लागतात व त्यानंतर मनुष्य जन्म लाभतो. पृथ्वीवरील सजीव वस्तू मोजण्याचे शास्त्र
आहे टॅक्सॉनॉमी नावाचे. गम्मत म्हणजे त्या शास्त्राचा आव आणत तुकाराम महाराज एकूण
८४ लक्ष योनी कोणकोणत्या त्याची जंत्री देतात ती अशी : भक्तिवीण जिणें जळो
लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥1॥ वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या
नवलक्ष ॥ध्रु.॥ अकरालक्ष योनि किड्यामाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये
॥2॥ तीसलक्ष योनि
पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥3॥ एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहवारा मग लागे ॥4॥ तुका ह्मणे
तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥5॥ मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख
जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥1॥ लक्ष चौयाशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥2॥ पशु काय
पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध
होती पांगुळ मुकीं ॥3॥ नरदेह निधान लागलें
हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न
धरावें ॥4॥ ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र
॥1॥म्हणउनि फावलें
तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें
क्रियमाण ॥2॥ तुका ह्मणे घुबडा
ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥ क्षण एक मन िस्थर करूनी । साव होइप डोळे उघडोनी । पाहें
वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥5॥
पूर्वकर्म व ह्या
जन्मातल्या क्रमानुसार कसे जन्म मिळतात ह्याची यादी गरुडपुराणात दिलेली आहे आणि
कोणते पाप केल्याने कोणता जन्म मिळतो हे भले वैज्ञानिक नसेल पण मोठे मनोरंजक आहे.
उदाहरणार्थ : पुण्यवंताला चांगला जन्म मिळतो आणि पाप्याला पशुपक्षी, वृक्ष इ. क्षुद्र
योनींतून जन्मावे लागते, असे स्मृतिपुराणे
सांगतात. कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो, याविषयी त्यांनी अनेक वर्णने केली आहेत. कर्मविपाकाची
तपशीलवार सुसंगत व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न श्रुतिस्मृतिपुराणांत व विशेषतः
गरुडपुराणात केलेला आढळतो. याज्ञवल्क्यस्मृतीत व तिच्या मिताक्षराटीकेत कोणत्या
पापामुळे कोणती योनी प्राप्त होते याचे थोडक्यात दिग्दर्शन करणारे वर्णन केले आहे, ते असे :
महापातकामुळे घोर नरकाची प्राप्ती होते. नरकातील भोग भोगून महापातक्यांना या जगात
जन्म मिळतो तो असा; ब्रह्यहत्या
करणारा हरण, कुत्रा, डुक्कर, उंट या योनींत; सुरापान करणारा
गाढव, अंत्यज इ. योनींत; सुवर्ण चोरणारा
कृमी, कीट, पतंग या योनींत
आणि गुरुपत्नीशी संभोग करणारा गवत, झुडुप, वेल या योनींत जन्मतो. त्याचप्रमाणे सुवर्ण हरण करणारा वाईट
नखाचा, गुरुपत्नीगामी
वाईट कातडीचा, अन्नाचे अपहरण
करणारा अजीर्ण रोगी, पुस्तके चोरणारा
मुका, धान्य चोरणारा
वाजवीपेक्षा अधिक अवयवांचा,
चहाडखोर
घाणेरड्या नाकाचा, तेल चोरणारा
तेलातला किडा, गुप्तपणे बातम्या
पुरविणारा दुर्गंधी तोंडाचा, ब्रह्मस्वाचा (ब्राह्मण धनाचा) वा परस्त्रीचा अपहार करणारा
ब्रह्मराक्षस, परस्वाचा अपहर्ता
सोनारपक्षी, पालेभाजी चोरणारा
मोर, सुगंधी द्रव्ये
चोरणारा चिचुंदरी, धान्यचोर उंदीर, यान चोरणारा उंट, फळे चोरणारा वा एकटाच
गोड खाणारा वानर, पाणी चोरणारा
पाणकोंबडा, दूध चोरणारा बगळा
किंवा कावळा, घरातील उपकरणे
चोरणारा चिमणी, मध चोरणारा
गांधिलमाशी, मांस चोरणारा
गिधाड, मातेचा वा गाईचा
वध करणारा जन्मांध, ठेव गडप करणारा
काण्या डोळ्याचा, खोटे बोलणारा
चाचरा आणि कौमार्यावस्थेतील परस्त्रीशी संभोग करणारा षंढ बनतो.
पुण्य केले असता स्वर्ग
मिळतो व पाप केले असेल तर नरक मिळतो ह्या अध्यात्मातल्या खूप लोकप्रिय कल्पना
आहेत. आणि ह्या बहुतेक सर्व धर्मात लोकप्रिय आहेत. स्वर्गात मेनका, रंभा, उर्वशी असतात व
प्यायला अमृत असते हे सर्व-विदितच आहे. तुकाराम गाथेत वैकुंठ हा शब्द ३२ वेळा येतो
व बहुतेक ठिकाणी वारकऱ्यांना पंढरी हेच वैकुंठ आहे असा भाव तिथे आहे. तुकाराम
महाराजांनी स्वर्गाचेच जणू काही वर्णन केले आहे असे वाटावे असा अभंग आहे “ आनंदाचे डोही
आनंद तरंग | आनंदची अंग
आनंदाचे ||”
सदेह वैकुंठाला जाणे हे
मोठे अध्यात्मिक प्रकरण तुकारामाला एकमेवाद्वितीय करून सोडते. कोणताच माणूस सदेह
स्वर्गाला जाऊ शकत नसताना तुकाराम महाराजांना गरूड-वाहन येऊन पुष्पक विमानातून कसे
नेले असेल ? कदाचित असे तर
नसेल की तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात तसे: मरण माझें मरोन गेलें । मज केलें
अमर ॥1॥ ठाव पुसिलें
बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥ आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥2॥ तुका ह्मणे
बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥3॥ ( माझ्या मरणास मरण आले. सर्व देहादि प्रपंचभान नाहीसे
झाले. म्हणून मी अमर झालो. त्याचे ठावठिकाण जी मिथ्या देह-अहंता, ती समूळ नाहीशी
करून टाकली. ज्या वाटेने हा पूर आला होता तो त्या वाटेने गेला आणि माझे धैर्य
नामरूपी जीवनाच्या ठिकाणी राहिले. तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रकार माझ्या
ठिकाणी जुने होते त्यांचे ज्ञान नसल्यामुळे जन्म-मरणाचे दुःख आजवर भोगीत आलो
त्याचे आज खरोखरी सार्थक झाले.). किंवा
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं
तिन्ही त्रिभुवनें | सर्वात्मकपणें
भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा
॥2॥फिटलें सुतक
जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे
दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥ बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण
नाहीं॥1॥ आकाराशी कैंचा
ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥ तुका ह्मणे औघा
योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥3॥
ज्यांची तुकारामावर अपार भक्ती आहे ते त्याच्याच एका अभंगावर विसंबून
पुष्पक विमान खरे वाटून घेऊ शकतात, कारण इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत : आह्मी जातों आपुल्या
गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥1॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥ आतां
असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥2॥ येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥3॥ रामकृष्ण मुखीं
बोला ।तुका जातो वैकुंठाला ॥4॥.. हे
सदेह वैकुंठाला जाणे इतके संभ्रम निर्माण करणारे आहे की आज आठ दहा वर्षापूर्वी
कॅलिफोर्नियात २६ संगणक इंजिनियर एका धूमकेतूच्या येण्याच्या वेळेवर आत्महत्त्या
करून पोकळीत विलीन झालेले आपल्याला आठवत असेल.
आत्म्याचे आच्छादन असलेले
पाच कोष असतात म्हणतात. जसे : अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञान कोष, व आनंदमय कोष. आपण सगळीच माणसे जेव्हा मरतो तेव्हा
आत्म्याचे काही कोष नष्ट न होता आपल्याबरोबर येऊ शकतात. म्हणजे एकप्रकारे आपण
सगळेच “सदेह” वैकुंठाला जाऊ
शकतो. ह्या अर्थाने तुकाराम महाराजही सदेह वैकुंठाला गेले असे म्हणता येते.
होस्पेट हे कर्नाटकातले
तसे छोटे गाव. माझ्या नोकरीतली शेवटची तीन
वर्षे तिथे गेली. तिथला एक खाणमालक, बलदोटा, माझा मित्र होता. रविवारी संध्याकाळी कधी त्याचा मला फोन
येई की तुमच्या अंगणात या,
मी वरून जातोय,तुम्हाला हाय
करायचेय. त्याच्याकडे रशियन बनावटीचे एक मागे एक्सोस्ट फॅन सारखे एका माणसाचे
विमान होते. तो अगदी खालून विमान नेई व हाय करी. आता जर मी हे तुम्हाला सांगितले
तर तुम्हाला खरे वाटणार नाही. मग बिचाऱ्या पुष्पक विमानाचे कसे वाटणार ? पाच हजार
वर्षापूर्वीची विमाने कशी होती ह्यावरचे हजारो यू-ट्यूबवर व्हिडीओ आहेत.
विज्ञानाच्या अभ्यासामुळे
आपला असा समज होतो की जे काही आपल्या अवती भवती घडते आहे त्याला काही ना काही कारण
असतेच. सगळ्याच ज्ञानशाखांचा रोख हे कारण शोधण्याकडे असतो. आग, पाणी, तेज, वायू, आकाश, ही आदिम
पंचमहाभूते घेतली तरी विज्ञान म्हणते की ती काही स्वयंभू अशी असत नाहीत. काही तरी
कारण घडते आणि ही पंचमहाभूते प्रकटतात. सगळे जगच जर पंचमहाभूतांचे बनलेले असेल तर
मग जगात विनाकारण असे काही नाहीच म्हणायचे ! आपण माणसे ह्या जगात अगदी
एकमेवाद्वितीय आहोत असा भ्रम जरी खरा मानला तरी आपल्यावरही कोणा कोणाचा प्रभाव
पडतच असतो असे कोणतेही प्राथमिक मानसशास्त्र आपल्याला सांगून जाते. एकूण काय कुठलेही
निरिक्षण, कुठलाही विचार, कुठलेही प्रमेय, कुठलाही वाद, काहीही घेतले तरी
ह्या कार्य-कारणातून आपल्या समजाची काही सुटका दिसत नाही. आणि हे वैज्ञानिक
कार्यकारण शोधणे इतके धोक्याचे असते की इथे किती टक्क्याचे कारण हे खरे कारण असा
काही ठोकताळा नाही. अगदी नोबेल पारितोषिक मिळालेल्या ग्रॅंगर-कॉज च्या समीकरणातही
किती टक्क्याचे प्रमाण म्हणजे खरे कारण असे काही सापडत नाही. म्हणजे सगळ्या
ज्ञानाचा आटापिटा हा असा मोघमच ! ( हीच सोय वापरून पिणारे लोक असे कारण देऊ शकतात
की दारूत काही वाईट नसते,
पाण्यातच काही
तरी गडबड आहे. कारण व्हिस्कीत पाणी घालून प्याले तरी चढते, ब्रांडीत पाणी
टाकले तरी चढते, रम मध्ये पाणी
टाकले तरी चढते,तर पाणी हेच
चढण्याचे कारण असले पाहिजे ! )
आईन्स्टाईन नंतर जे
भौतिकशास्त्र क्वांटम-मेकॅनिक्स ह्या शाखेने प्रसिद्ध झाले आहे त्यात तर चक्क
म्हटले आहे की हायसेनबर्गच्या अनसर्टनिटी प्रिन्सिपल प्रमाणे इलेक्ट्रोनची स्थिती
माहीत असेल तर त्याचा वेग निश्चितपणे माहीत होत नाही व वेग माहीत असेल तर स्थिती
नक्की नसते. ठामपणे सांगणारे डिटरमिनीझम आता विज्ञानानेही टाकले आहे. अशा संभ्रमात
भक्तिमार्ग दिलासा देणारा एक गंभीर पर्याय आहे.
वेद अनंत बोलिला । अर्थ
इतका चि शोधिला॥1॥ विठोबासी शरण
जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार
॥2॥ अठरापुराणीं
सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥3॥
ह्या गदारोळातून
तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गाचा उपाय सुचविला आहे. ते म्हणतात : ( २८७१, जोग प्रत,) : कारणा कारण (
कार्यकारण ) वरियेले जेथे । जातों तेणे पंथे सादावित ॥ संती हे पईल लाविले निशाण ।
ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे
भरवंसेनी ॥ ( जोग प्रतीतला अर्थ : ज्या ठिकाणी कार्यकारण नाहींसे होते ( शेतात बी
पेरले असतां धान्य पिकते,
यज्ञ केला असता
स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारण भाव
प्रवृत्तीमध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सारली आहे त्या
निवृत्तीच्या ) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन
संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज
म्हणतात, अहो जन हो, तुम्ही ह्याच
मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने
पांडुरंगाची भेट होईल.
-------------- -
अरुण अनंत
भालेराव
-------------------------------------