तुक्याची ग्वाही--९
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
शाळेत ससंदर्भ स्पष्टीकरणाखाली वैशिष्ट्य लिहण्याची सवय नवनीतने लावली होती. तसे या तुझ्या स्पष्टीकरणावर मी एक वैशिष्ट्य नोंदवतो:
उत्तर द्याहटवावैशिष्ट्य: भौतिक हिताचे उदाहरण देऊन तुकोबा पारमार्थिक हितासाठी तद्वत आसक्त होण्याचा संदेश देत आहेत.
असो. माझी एक शंका आहे. की आस, आसक्ती यांचे निरसन जर परमार्थासाठी आवश्यक असते, तर परमार्थासाठी आस, आसक्ती हा आंतरविरोध नाही का? म्हणजे भौतिकाची आसक्ती काय आणि अभौतिकाची काय मूळ आसक्ती, स्वार्थ यांचे निरसन कुठे होते? त्यामुळे मोक्षलाभ हा शब्दातच एक contradiction आहे. तसे मोक्षेच्छा. जिथे लाभ, इच्छा यांचेच संन्यसन करायचे आहे, तिथे तेच शब्द वापरणे आलंकारिक होणे आहे, असे म्हणावे लागेल. पण हे भक्क्तिमार्गी लोक सगळे असे काही प्रेमात असतात ईश्वाराच्या की ती आसक्ती पाहूनही गम्मत वाटते. त्यापेक्षा बुद्ध बरा किंवा पूर्णवाद तरी कधीही वरचढ, जिथे ध्येये खूप सुस्पष्ट आहेत, ऐच्छिक जीवनलाभ आणि मरणभयनिवृत्ती. असो. हा स्वतंत्र प्रतिपादनाचा विषय आहे. इथे पाल्हाळ नको.
प्रिय चिन्मय,
उत्तर द्याहटवातू प्रश्न तर मोठा अवघड विचारला आहेस. परमार्थात परमेश्वराची तरी आसक्ती का असावी ? आसक्तीच नसावी !
क्षणभर व्यवस्थापनशास्त्रातला एक विषय घेऊ. ऑफीसातले काम कसे करावे ? अगदी मन लावून, पेटून निघून की पाट्या टाकत ? ह्यावर प्रसिद्ध तत्वचिंतक पीटर ड्रकर ने व्यवहारी सल्ला दिलाय की तुमचे आनंदाचे क्षेत्र ( जसे संगीत, नाटकात कामे करणे वगैरे छंद ) व कामातल्या गुंतण्याचे क्षेत्र वेगवेगळे असावे. का ? तर तुम्ही अगदी समरसून देहभान विसरून काम केलेत व समजा बढती तुम्हाला डावलून दुसर्यालाच मिळाली तर निष्कारण अपेक्षाभंग, डिप्रेशन वगैरे. बरे, नुसत्या पाटया टाकणे आपल्या सगळ्यांनाच आवडणारे व जमणारे, पण त्याने मग पगार कसा जस्टिफाय करणार ? नुसते कार्यक्षमतेचा ( जसे परमार्थात आपण करायला हवे ) विचार केला तर पेटून काम करणे कदाचित ज्यास्त कार्यक्षम ठरेल. पण असे आपल्याला अव्याहत कसे जमावे ?
आसक्ती ही अशी देहाची कमजोरी आहे. देह तर आपल्याला मोक्ष मिळेपर्यंत टाकता येत नाही. मग जर एखाद्या प्रॅक्टिकल संताने, साधकाने जर युगत सांगितली की संसाराची आसक्ती पारमार्थिक विषयांकडे वळवा, तर ते करून बघायला काय हरकत आहे. आईला बाळाबद्दल वाटणारे वात्सल्य ही देहाचीच भावना आहे. पण तीच जर तिने दु:खितांकडे वळवली तर ती मदर टेरेसा होऊ शकते व ते चांगलेच आहे. अगदी पारमार्थिकही म्हणता येईल.
आशा हे दु:खाचे मूळ कारण आहे असे म्हणणार्या बुद्धाला जर उजवे ठरवायचे ते अचूक निरिक्षणासाठी, तर करून पहायला सोपा मार्ग सांगणार्या तुकारामाला अगदीच नापास करता येत नाही, गाईडात जसे प्रमेय सोपे करून समजावलेले असतात तसे हा एक गाईडच !
अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com