तुकयाची नॅनो---६
६) "न, ना" ची श्रवणसुलभता :
म्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.
एरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.
ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्या वर्णांचा जसे : न, म,
म्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s ! ). ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा