मंगळवार, २६ जुलै, २०११

भेसळीचे बीज

-----------------------------------------------------------
१) भेसळीचे बीज
--------------------------------------------------------------
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥
नये पाहों कांहीं गोर्‍हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥
-------------------------------------------------------------
आजकाल जेव्हा आपण काही शेतकर्‍यांच्या व्यथा पाहतो तेव्हा भेसळीच्या बियाणांपायी त्यांना किती नुकसान होते त्याचा भीषणपणा आपल्यासमोर उभा राहतो. आधी शेताची मशागत करावी, बैल अथवा ट्रॅक्टरने नांगरणी करावी, योग्य ती खते द्यावीत व पावसाची प्रतिक्षा करावी, पाऊस झाल्यावर चांगली बियाणे घेऊन पेरणी करावी, उगवलेल्या पिकाचे संवर्धन करावे त्याची राखण करावी हे सगळे खटाटोप करीत असताना बियाणेच जर भेसळीचे असेल तर सर्व श्रमच वाया जातात. पीक चांगले येत नाही. शेतकर्‍यांच्या ह्या सर्व कष्टाच्या वाया जाण्यामागे केवळ भेसळीचे बियाणे हेच असते. अशावेळी ह्या भेसळीमागे जे लोक आहेत त्यांची निर्भत्सना करावी तेव्हढी कमीच पडेल.
तुकाराम महाराजांनी नेमके हेच हेरून जे बियाणात भेसळ करतात त्यांची यथेच्छ कान-उघाडणी व छीथू केली आहे. हे लोक किती नीच असतात असे दाखविताना ते त्यांना विष्ठा भक्षण करणारे असेही म्हणतात. असल्या ओंगळ माणसांचे मित्रही ओंगळच असतात असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा बियाणाची भेसळ करणारे शेतकरी, अधिकारी, व्यापारी ह्यांची जी चांडाळ चौकडी असते त्यालाच तुकाराम महाराज दूषणे देत आहेत हे सहजी ध्यानात यावे. ह्यांची छी:थू करताना मग तुकाराम महाराज त्यांच्या ह्या कुकर्माची तुलना हागणदारीशी करतात व त्याचा अंत जसा चांगल्या लोकांनी पाहू नये असा सल्ला देतात तसेच असल्या दुर्जनांचे संग, संत व चांगल्या मंडळींनी धरू नये असेही बजाऊन सांगतात. भेसळीच्या बियाणाला अस्सल बियाणासारखे गुण नसतात तर अमंगळ असेच अवगुण असतात. असल्या भेसळीच्या बियाणाकडे नुसते पाहणेही म्हणजे शीण आणणारे आहे. असल्या भेसळ करणार्‍यांकडे "आपली छी:थू" हेच भांडवल असल्याने त्याचा काही फायदा होईल, अशी सुतराम शक्यता नसते.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी", हे शुद्ध बियाणाची महती सांगणारे वचन सगळयांनाच माहीत असते. पण भेसळीच्या बियाणाचा धि:कार करणे हे ज्यास्त महत्वाचे आहे, हे पटून तुकाराम महाराज भेसळीची निर्भत्सना करतात. ती फारच अगत्याची आहे. कारण ह्याच भेसळीच्या बियाणापायी शेतकरी उध्वस्त होतो व मग त्याला जगवणे अवघड जाते. शेतकर्‍यांशी संबंधित असणार्‍या सगळ्या व्यक्तींनी, संस्थांनी, सरकारी अधिकार्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ह्या वचनाप्रमाणे भेसळीविरुद्ध मोहीमच काढावी इतका महत्वाचा हा अभंग आहे.

-----------------------------------------------------------------------------

२ टिप्पण्या:

  1. फार चांगलं लिहिलं आहे. आवडलं मला. तुमच्या इतर लेखनाबाबतही असं म्हणण्याची तुम्ही संधी द्यावी.

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या प्रतिसादाबद्दल/अभिप्रायाबद्दल आभारी आहे. नक्कीच प्रयत्नशील राहीन.-----अरुण अनंत भालेराव ( arunbhalerao67@gmail.com)

    उत्तर द्याहटवा