बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

तुकारामाची नोटबंदी
तुकारामाच्या काळात नोटा होत्या का ? तसे म्हणतात की नोटांचा शोध चीन मध्ये हान वंशात ख्रिस्तपूर्व ११३ सालीच लागलेला होता व त्या नोटा चामड्याच्या केलेल्या असत. नंतर त्या कागदाच्या व्हायला इ.स.१६०० उगवावे लागले. बँकनोट म्हणजे एक प्रकारचा कायदेशीर कागद असतो ज्यात काही मौल्यवान देण्याचा करार केलेला असतो. I promise to pay the bearer a sum of two thousand rupees असे उर्जित पटेल हे रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर नव्या दोन हजाराच्या नोटेवर लिहून देतात. तसेच काही कायदेशीर कागद असतील तुकारामाच्या काळात. अमेरिकेत तर त्यांच्या नोटांना ते बिल म्हणतात. तसे तुकारामाच्या काळात “हुंडी” नक्कीच असणार कारण तसा उल्लेख आहे : ( पहा :
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥
 भरियेली हुंडी नरसी मेहत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
 मिराबाइसाठी पी जो विषाचा प्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥2॥
 कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥
 आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळा ॥4॥)
नरसी मेहता हे गुजरातीतले आदी संत कवी व कृष्ण भक्त. महात्माजींचे प्रसिद्ध भजन, “वैष्णव जन तो तेणे रे कहिये...” ह्या भजनाचे कवी, व त्यांना हुंडी मार्फत असलेले कर्ज कसे देवाने भरले त्याची ही कथा आहे. मी १९६७ मध्ये जेव्हा मुकंद कंपनीत होतो तेव्हा जेव्हा जेव्हा एखाद्या कंपनीला अॅडव्हांस द्यायचा असे तेव्हा आम्ही तो हुंडीच्या समोर देत असू. हुंडीचा कागद असा असे :
1951_Bombay_Province_Rs_2500_Hundi (1).jpg

राजाचा शिक्का असला की एखाद्या हलक्या वस्तूला सुद्धा कशी किंमत येते, असे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा चामड्यावर राजाचा शिका मारून त्याच्या नोटासारखा उपयोग होत असेल असे अनुमान काढता येते. तो अभंग असा :
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥1॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
वाहिले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षिलें ॥3॥
राजाने कातड्याचे पैसे केले तरी ते चालतात. असे सांगणारा हा अभंग इतका ताजा, इतका समकालीन आहे की नव्या पाचशेच्या नोटात काही नोटात महात्मा गांधीच्या चेहऱ्याभोवती एक पांढरा शेड चुकून आला तरी तो सरकारने स्वीकारला म्हणून आजही चालतो आहे, हे आपण पाहतोच आहोत. तर तुकारामाला नोटांची किती माहिती होती हे इथे कळते.
मोदींनी जशा नोटा बाद केल्या व त्या जुन्या नोटांची किंमत शून्य झाली तसे पैशाचे अवमूल्यन तुकारामाच्या वेळीही झालेले असावे. कारण एके ठिकाणी तुकाराम महाराज देवाचा सुद्धा भाव कमी झाला आहे व मंदी आली आहे तेव्हा तुम्ही तो फुकट घ्या. तुकारामाने तो उधारीत कर्जावू घेतला आहे, असे एका प्रसिद्ध अभंगात असे म्हणतात :
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥
देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥
मराठी पोरांना लहानपणापासून “पैसा झाला खोटा” हे ये रे ये रे पावसा तून शिकायला मिळते व त्यामुळे अध्यात्मात वा प्रत्यक्ष व्यवहारात पैसा खोटा होतो, होऊ शकतो हे आपल्याला सहजी समजू शकते व असेच तुकाराम महाराज एका गंमतीच्या अभंगातून आपल्याला दुकान केला मोठा पण पदरी खोटा रुपया आला कसा ते असे सांगतात :
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥ घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥ घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥ दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥

---------------------------








---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा