तुकाराम महाराजांच्या ग़झला
साहित्यात वेगवेगळे अभिव्यक्तीचे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. आता जुने कवी घेतलेत तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. एवढेच नव्हे तर त्या काळी कवी लोक त्या कवितेची चालही कशी आहे त्याचा नमूना देत असत. आजकालचे कवी हे बहुतेक मुक्तछंदातच कविता करताना दिसतात. हेच निरिक्षण मग आपल्याला असे नोंदवावे लागेल की मुक्तछंद हा काव्यप्रकार वृत्तात कविता करण्यापासून उत्क्रांत झालेला आहे. किंवा आपल्या जुन्या शालेय पुस्तकात "नाट्यछटा" नावाचा छोटेखानी नाटुकल्यांचा प्रकार खूपच प्रचलित होता असे आठवेल. आजकाल हा प्रकार अजिबात दिसेनासा झाला आहे. तर साहित्यिक उत्क्रांतीच्या इतिहासात ह्याबद्दल म्हणावे लागेल की आता "नाट्यछटा" हा प्रकार "नाटका"तच विलीन झाला आहे. शेक्सपियरच्या प्रभावाखाली सुनीत नावाचा १२+२ ओळींचा ( अथवा ८+६ ओळींचा) प्रकार आजकाल लुप्तच झाला आहे. त्यालाच मुरड घालून पूर्वी कवी अनिल दशपदी नावाच्या कविता करीत. हे प्रकार जसे बदलतात तसाच काहीसा प्रकार ग़झलेच्या बाबतीत झाला असावा.
मराठीत ग़झल तशी जोमाने आणली माधव ज्युलियनांनी व ती जोपासली सुरेश भटांनी. तुकाराम महाराजांच्या काळात ग़झल हा काव्यप्रकार अस्तित्वात होता. तशात तुकाराम महाराज उर्दू, हिंदीतही अभंग रचीत हे आपण गाथेत पाहतोच. जसा अभंग हा काव्यप्रकार केवळ भक्तीमार्गासाठी खासा होता तसेच सूफी विचार व ग़झला ही त्याकाळी प्रचलित होते. राज्य तर मोंगलांचे होतेच. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या एकूण लिखाणावर ग़झलेचा काही परिणाम दिसतो का हे ह्या लेखात पाहण्याचा मानस आहे. अर्थातच हे सर्व ऐतिहासिक पुराव्यांशिवाय करण्याचे योजले असल्याने केवळ भाषेच्या दृष्टीने हे पहावयाचे आहे.
उर्दूतली पहिली गझल कोणती असा प्रश्न पडतो. "हिस्ट्री ऑफ द पर्शियन लॅंग्वेज ऍट मुघल कोर्ट" नावाच्या श्री. एम.ए.गनी ह्यांच्या पुस्तकात एक सहा ओळीची रचना दिलेली आहे ( पहिली ग़झल म्हणून ) ती अशी: "हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या". दख्खनी उर्दूत ह्याअगोदरच्याही ग़झला आहेत. ( भीमराव पांचाळे ह्यांनी एका सदरात हीच ग़झल पुढे कबीराच्या नावे अशी दिली आहे: "हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या
रहे आजा़द या जग में, हमन दुनियांसे यारी क्या
जो बिछुडे है पियारे से, भटकते दरबर फिरते
हमारा यार है हम में, हमन को इंतजा़री क्या
"कबिरा" इश्क का नाता, दुई को दूर कर दिल से
जो जलना राह नाजुक है, हमन सरबोज भारी क्या" ह्यावरून कबीरानेही ग़जला लिहिल्यात असेच वाटते. )
रामबाबू सक्सेना नावाच्या एका लेखकाने "ए हिस्ट्री ऑफ उर्दू लिटरेचर" ह्या पुस्तकात चंद्रभान नावाच्या एका ब्राह्मणाने ग़झल लिहिलेली नमूद केलेले आहे. तुकारामाच्या गाथेत ज्या कबीराचा उल्लेख येतो त्याच्या रचनांविषयी लिहिताना श्री.प्रभाकर माचवे ( कबीर--साहित्य अकादमी प्रकाशन) म्हणतात की "कबीराने जरी उर्दू -फारसीतले वृत्त छंद हाताळलेले नसले तरी त्याने सुफी कलाम ऐकलेले असावेत. कबीराच्या काव्यात आढळून येणारे "प्रेम" व "दैवी मदहोशी" यांचे उल्लेख हे सुफी शैलीशी जुळणारे वाटतात". असेच निरिक्षण आपण तुकारामाच्या काही रचनांबाबत करू शकतो. कारण तुकारामही कबीराच्याच काळचा आहे व तुकारामाच्या कितीतरी रचनांवर कबीराचा प्रभाव पडलेला आपण पाहतो.
ग़झल चारशे वर्षे जुनी तर तुकाराम साडेतीनशे वर्षे जुने. म्हणजे त्याकाळात त्यांनी ग़झला नक्कीच ऐकल्या असतील. त्याकाळी अभंग ह्या वृत्तात दुसर्या व तिसर्या चरणानंतर यमक ही परंपरा काटेकोरपणे सांभाळीत असत असे दिसते. ग़झलेत मात्र कायदे कडक असतात. जसे: ती एकाच वृत्तात असते, त्यात एक अंत्ययमक ( रदीफ ) असते, तर एक यमक ( काफिया) असते. २-२ ओळींचे किमान पाच किंवा त्याहून अधिक, शेर ग़झलेत असतात. प्रत्येक शेराचे स्वत:चे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते.
अभंगात चार चरण असतात, सहा अक्षरांचे तीन, व शेवटचे चरण चार अक्षरांचे असते. दुसर्या व तिसर्या चरणा अंती यमक असावे लागते. ग़झल एकाच वृत्तात असावी लागते तर अभंग ही लवचिक रचना असलेला असतो.
(क्रमश: )
Appala blog nuktach open kela, anandane vachin aani mag aapnas lihin. Thanks
उत्तर द्याहटवाsuresh kulkarni, indore
तुकारामाचा एखादा गझल उदाहरणादाखल दिला असता तर बरे झाले असते.
उत्तर द्याहटवाश्री प्रभाकर फडणीस,
उत्तर द्याहटवापुढच्या भागात एकूण १५ गजला वानगी व रसग्रहणासाठी दिलेल्या आहेत.
एकदोन आठवड्यात बघायला मिळतीलच.
----अरुण अनंत भालेराव