रविवार, २९ मे, २०११

तुकारामाच्या गजला 2

तुकाराम महाराजांच्या ग़झला---२

ग़झल चारशे वर्षे जुनी तर तुकाराम साडेतीनशे वर्षे जुने. म्हणजे त्याकाळात त्यांनी ग़झला नक्कीच ऐकल्या असतील. त्याकाळी अभंग ह्या वृत्तात दुसर्‍या व तिसर्‍या चरणानंतर यमक ही परंपरा काटेकोरपणे सांभाळीत असत असे दिसते. ग़झलेत मात्र कायदे कडक असतात. जसे: ती एकाच वृत्तात असते, त्यात एक अंत्ययमक ( रदीफ ) असते, तर एक यमक ( काफिया) असते. २-२ ओळींचे किमान पाच किंवा त्याहून अधिक, शेर ग़झलेत असतात. प्रत्येक शेराचे स्वत:चे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते.
अभंगात चार चरण असतात, सहा अक्षरांचे तीन, व शेवटचे चरण चार अक्षरांचे असते. दुसर्‍या व तिसर्‍या चरणा अंती यमक असावे लागते. ग़झल एकाच वृत्तात असावी लागते तर अभंग ही लवचिक रचना असलेला असतो.
ह्या फरकांमुळे रचनेच्या तुलनेने अभंग व ग़झल हे वेगळेच पडतात. पण रचनेशिवाय ग़झलेचे जे नियम असतात ते आपल्याला अभंगात दिसू शकतात. अभंग व ग़झल हे सबंध काव्यप्रकारच तुलना करण्यापेक्षा कुठे कुठे तुकाराम महाराजांचे अभंग अगदी ग़झलच्या वळणाचे वाटतात, ते एकेका स्वतंत्र उदाहरणावरून पाहू .
१) कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा: कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥ कैं भोज्य नानापरी । कैं कोरडया भाकरी ॥ कैं बसावे वाहनी । कैं पायीं अनवाणी ॥ कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसने ती जीर्णे ॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ॥ कैं सज्जनाशी संग । कैं दुर्जनाशी योग ॥तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥
आता एक बहादुरशहा जफर ह्याची ग़झल ह्या अभंगाशेजारी अशी ठेवा :
कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं
कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं
कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं
कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं
कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं
कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं
कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं
इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि "कही" व "कैं" हे सारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयात सुद्धा जो सारखेपणा आहे त्याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ).तुकाराम महाराजांचा "सज्जनाशी संग" हाच जफरचा "शोरे-कुलकुल" आहे तर "दुर्जनाशी योग" हा " शोरे-मस्तां " ( वेडयांचा गदारोळ) आहे. जफरच्या गजलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना. बहादुरशहा जफर हा तुकारामाच्या नंतरचा असल्याने त्याच्या ग़झलेवर तुकारामा महाराजांचा प्रभाव आहे असे आपण म्हणू शकतो. पण अभिव्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर दोन्ही रचनांमध्ये किती साम्य आहे हे जाणवावे. अर्थात वृत्त हा तांत्रिक भाग सोडला तर. ह्या तुलने नंतर तुकाराम महाराजांचा हा अभंग एक ग़झलच वाटावा.
ग़जलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ग़जल हे वृत्त नसून एक वृत्ती आहे. आणि तिच्यात एक सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ही वृत्ती अभंगांतून फार ठळकपणे दिसते.
२) कवण जन्मता कवण जन्मविता ?
तुकाराम महाराजांचा हा एक अभंग पहा:
कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
ह्या अभंगाचा पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
आता ह्या अभंगाचे हिंदीत किंवा उर्दूत सरल भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !
ग़झलेचे तांत्रिक अंग सोडले तर आता हा भाषांतरित अभंग ग़झलच वाटावा असा होतो. ग़झलेत जसे एकेका शब्दाभोवती पिंजण घालीत त्याचे नाद-माधुर्य खुलवतात तसेच ह्या अभंगात "न कळे" व "कवण" हे शब्द रुंजी घालतात अगदी ग़झलेसारखे !
३) बरे जाले देवा निघाले दिवाळे
आता तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग पहा:
बरे जाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
बरे जाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ॥
बरे जाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे जाले तुझे केले देवाईल ॥ लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥
चांगल्या गजलेत एक प्रकारचा नाद असावा लागतो. इथे "बरे जाले देवा" हा नाद टिकवून ठेवलेला दिसून येतो. गजलेत शब्दांशी खेळही असतो. इथे काही शब्द पहा : देऊळ किंवा देवालय ऐवजी देवाईल, जे बाईल शी यमक साधताना बेमालूम साम्य साधते. तसेच रोजच्या वापरात असते गुरेढोरे तर इथे कवी त्याचे करतो ढोरे गुरे. खर्‍या गजलेत जो दर्द कवीने स्वत: घेतलेला असावा लागतो तो तुकाराम महाराजांचे चरित्र पाहिले तर दिवाळे, दुष्काळ, कर्कशा बाईल, दुर्दशा, अपमान, भक्तिशरणता ह्या शब्दांनी नेमके चित्रित होते व दर्द कसा साक्षात पुढे उभा राहतो.
पारंपारिक गजलेत शेवटी यमक यावे असा जर चंग बांधायचा तर अभंगाच्या रचनेत थोडा फेरफार करून ते सहजी जमले असते. जसे शेवटचे चरण तिसरे करणे, उदाहरणार्थ :
बरे जाले देवा निघाले दिवाळे । पीडा केली बरी या दुष्काळे ॥
बरे जाले जगी पावलो अपमान । ढोरे गुरे बरे गेले धन ॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । शरण देवा बरा आलो तुज ॥
बरे जाले तुझे केले देवाईल । उपेक्षिली लेकरे बाईल ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । जागरण केले उपवासी ॥
गजलेत जसे प्रत्येक शेर स्वतंत्र एकटा उभा राहायला हवा तसा इथला प्रत्येक अभंग एक स्वतंत्र सांगणे आहे व सगळे मिळून त्याची बेरीज, एकादशीच्या व्रताला घडणार्‍या उपवासाने दाखविली आहे.
नाद माधुर्याचे बर्‍यापैकी ज्ञान कवीला असल्याने त्याने "बरे झाले" असे न योजता "बरे जाले" असे योजले व झाले मुळे जे नाद-ओरखडे उमटले असते ते " जाले" मुळे सौम्य केले आहे. हे केवळ गजल-कवीलाच जमणारे कसब तुकाराम महाराज सहजी वापरताना पाहिले की तुकाराम महाराजांना गजल-सम्राटच का म्हणू नये असे कोणालाही वाटावे !
४) हेचि माझे तप हेचि माझे दान
एक बहादुरशहा ज़फरची ग़जल पहा:
रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में "ज़फर" जिनके वास्ते
वो जानते नहीं कि "ज़फर" किसका नाम है
इथे ज़फर काही प्रश्न विचारत आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते ? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते कोणाचे नाव आहे? आम्हाला कोणाच्या कला कुसरीची माहीती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब कशाचे नाव आहे?. ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही की ज़फर कोणाचे नाव आहे ?
आता तुकारामाचा हा अभंग बघा :
हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त
ग़जलेच्या मुख्य लक्षणात एक लक्षण असते की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपल्या आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. ग़जलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय ग़जलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्‍या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्‍या ओळीत त्याचा परमोच्च आहे, हाच माझा नित्यनेमही आहे ! असेच धोरण सर्व अभंगात आहे.
परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिले चरण सहा अक्षरांचे ( ह्या चरणा शेवटी यमक नसते ) , दुसरे चरण सहा अक्षरांचे, तिसरे चरण सहा अक्षरांचे ( दुसर्‍या व तिसर्‍या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथे चरण चार अक्षरांचे ( शेवटी यमक नसते. ) . ( सोयीसाठी चार चरण दोन ओळीत मांडले आहे कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता ग़जल मध्ये दुसर्‍या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती "नाम तुझे" हे यमक योजतात हे लक्षणीय आहे आणि ग़जलाच्या वळणाचे आहे. ग़जलच्या पाच किंवा सहा शेरापैकी पहिला शेर ( ह्याला मतला म्हणतात ) मध्ये दोन्ही ओळीशेवटी यमक ( क़ाफिया व रदीफ ) असते पण तुकारामांना अभंगातली दुसर्‍या तिसर्‍या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी "तुका म्हणे दुजे " हे "नाम तुझे" ला जुळणार यमक शेवटच्या शेरात जोडले आहे तसे त्यांना सुरुवातीला "हेचि दान माझे" असे जराशा फरकाने सहज जमते.ते केले तर ग़जलेची तांत्रिक बाजूही सांभाळल्या गेली असती. ग़जलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते ( जसे "ज़फर") .ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच ( जसे: "तुका म्हणे").
ग़जलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ग़जल हे वृत्त नसून एक वृत्ती आहे. आणि तिच्यात एक सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ही वृत्ती अभंगांतून फार ठळकपणे दिसते.
ग़जल-सम्राट सुरेश भट तुकारामा संबंधी म्हणतात : "तुझे दु:ख तुझे नाही , तुझे दु:ख अमचे आहे." इथे दु:खाचा सण साजरा करणार्‍या मध्ये आपल्याला तुकाराम आठवतात जे म्हणतात : बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली...शेक्स्पीयर सुद्धा म्हणतो "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी"
आणि मोठ्ठा योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे "किसका नाम है" आणि तुकारामांनी उत्तर दिल्यासारखे म्हणावे "नाम तुझे" ! हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक ग़जलच आहे.
५) नव्हती ते संत करिता कवित्व
नव्हती ते संत करिता कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥
येथे नाही वेश सरते आडनावे । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥
नव्हती ते संत धरिता भोपळा । करिता वाकळा प्रावरण ॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे । कर्म आचरणे नव्हती संत ॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे । सेविलिया वन नव्हती संत ॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे । भस्म उद्धळणे नव्हती संत ॥
तुका म्हणे नाही निरसला देहे । तो अवघे हे संसारिक ॥
आता वरील रचनेची मिर्झा गालिब ह्यांच्या खालील रचनेशी तुलना करून पहा :
दीवानगी से दोष पे जुन्नार भी नहीं
यानी हमारी जैब में इक तार भी नहीं
दिल को नियाजे-हसरते-दीदार कर चुके
देखा तो हममें ताकते-दीदार भी नहीं
मिलना अगर तेरा नही आसां तो सहल है
दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं
बे इश्क उम्र कट नही सकती है और यां
ताकत बकदरे-लज्जते-आजार भी नहीं
शोरीदगी के हाथ से सर है वबाले-दोष
सहरा में ऐ खुदा कोई दीवार भी नहीं
गुंजाइशे-अदावते-अगयार इक तरफ
यां दिल में जोफ से हवसे-यार भी नहीं
डर नाला-हाए-जार से मेरे खुदा को मान
आखिर नवाए-मुर्गे-गिरफतार भी नहीं
दिल में है यार की सफे-मिजगा से रूकशी
हालांकि ताकते-खालिशे-खार भी नहीं
इस सादगी पे कौन न मर जाए ऐ खुदा
लडते है और हातमे तलवार भी नहीं
देखा "असद" को खल्वत-ओ-जल्वत में बारहा
दीवाना गर नही है तो हुशियार भी नही
अर्थ तूर्त जरा बाजूला ठेवा व ग़ालिब व तुकाराम " भी नही" आणि "नव्हती" ह्या शब्दांचा जो दरवळ ग़झलेत घुमवतात तो अनुभवा. किती सारखे वाटेल.
----(क्रमश: )
----अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

२ टिप्पण्या:

  1. वाह! आपण केलेले विवेचन खूप पटण्या सारखे आहे,ग़झल हा माझ्या आवडीचा विषय म्हणून व कुतुहल म्हणून आपले विचार वाचले. सुफ़ी ग़झल व मरठीतिल अभंग हे सारखेच आहेत..
    अभिनंदन व धन्यवाद
    पुढील लिखाणची प्रतीक्षा असेल!
    सरिता भावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपला प्रतिसाद मी खूपच उशीरा पाहिला त्याबद्दल दिलगीर आहे. उत्क्रांतीत जसे एका रूपातून दुसरे रूप येते तसेच साहित्यप्रकारांचीही उत्क्रांती होत असावी. अभंगांची पारंपारिक गेयता आणि ग़झलेची गेयता ह्यावर आपण काही प्रकाश टाकू शकाल का ?
      मला ह्यावर चर्चा करायला आवडेल. आपला ई-मेल दिलात तर बरे.
      ---अरुण अनंत भालेराव
      arunbhalerao67@gmai.com

      हटवा