सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

यमकांचा बाप : तुकान्त

ई-तुका
-----------------------
यमकांचा बाप, तुकान्त !
----------------------------------
२५ हजारापेक्षा ज्यास्त असणार्‍या यमक-जोड्या तुकाराम गाथेत एरव्ही वाचत शोधणे हे फारच जिकीरीचे काम . पण संगणकाची मदत घेऊन पाहिजे त्या शब्दांच्या यमकांना सहजासहजी शोधता येते. "हरी"ला जुळणारी यमके आपण वर पाहिलीच. भक्तीमार्गातले इतर काही कळीचे शब्द पाहिले तर असे आढळले की, "नारायण"ला जुळणारी १५० यमके आहेत ज्यापैकी वानगीदाखल ही पहा वैशिष्टयपूर्ण असणारी अशी आहेत : अभिमान, मेदिनी, जनार्दन, धणी, खाणी, वेदवाणी, समचरणी, पाळण, स्वगुण, वदन, वगैरे. "वाणी" ह्या शब्दाला जुळणारी ७५ यमके आढळली ज्यातली ही वानगीदाखल पहा : घाणी, कारणी, गणी, व्यभिचारिणी, शिरोमणी, आणी, प्राणी, छळणी, कडसणी,अंत:करणी वगैरे. "पांडुरंग" ह्या दैवताला जुळणारी यमके आढळली ७५, ज्यातली ही उदाहरणार्थ पहा : अंग, रंग, संग, चांग, पटंगा, तरंग, लिंग, मृदंग, पांग, भंगा वगैरे. "कीर्तन" ह्या शब्दाला जुळणारी यमके आढळली ६०, "ध्यान"ला जुळणारी ४०, व सर्वात ज्यास्त ( ५०० ) यमके आढळली "मन"ला जुळणारी. संत रामदासांनी "मनाचे श्लोक" करून "मनाचा" जो मरातब वाढवला व कदाचित भक्तिमार्गात त्याच "मन" ची महानता ओळखून तुकाराम महाराजांनी "मन"ला जुळणारी इतकी प्रचंड यमके जुळविली असावीत. पैकी खास वाटणारी अशी : घाणा, राणा, जना, ध्यान, सपनी, इंधन, आंचवण, दर्शन, खंडण, जन, दहन, मौन्य, दुकान वगैरे.
    इतकी प्रचंड प्रमाणात यमके पाहिल्यावर कोणालाही सजज जाणवावे की तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे, प्रतिभेचे, खरे गमक आहे यमक ! यमकांच्या बाबतीत सहस्त्रावधी यमके अवतरवून यमकाचे जणु "बापपण"च तुकाराम महाराजांनी स्वत:कडे घेतले आहे. पटवर्धनांच्या "छंदोरचना" ह्या पुस्तकात एक मोठी यथार्थ नोंद आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की यमकाला गुजरातीत व हिंदी छंदरचनेत चक्क "तुकान्त" असा शब्द आहे !
--------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा