तुकाराम महाराजांचे आर्तभूत यमक
फक्त शेवटचे एकच अक्षर जुळवलेल्या यमकाला इंग्रजीत पुल्लिंगी यमक म्हणतात व दोन व ज्यास्त अक्षरे जुळवलेल्या यमकाला स्त्रीलिंगी यमक म्हणतात, असे मार्जोरी बोल्टन ही तिच्या "द ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री", ह्या पुस्तकात दाखवते खरी, पण प्रत्यक्षात बहुतेक यमके एकच अक्षर जुळवलेली असतात. ( पुरुष, स्त्री यमके असा भेद करण्यामागे लिंग-सादृष्यता असावी ! ) . बर्याच वेळा आपला समज होतो की यमके ही यांत्रिकतेने, शेवटचे अक्षर तेच ठेवायचे व अगोदरचे क,ख,ग,...असे क्रमाने बदलत करतात व हे "काम" बरेच सोपे असावे. पण लक्षात घ्या, इंग्रजीत "ऑरेंज" ( Orange ) ह्या शब्दाला अजूनही यमक साधणारा शब्द मिळालेला नाही. आणि ही नुकताच दहा लाखावा शब्द डिक्शनरीत नमूद करणार्या भाषेची परिस्थिती, तर केवळ ६०/६५ हजार शब्द असणार्या मराठीत यमकांची हालत कठीणच ! उदाहरण म्हणून व आपलीच परीक्षा घेण्यासाठी एक शब्द घेऊ : "आर्त". ज्ञानेश्वरांनी "विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले" ह्या अभंगातून म्हटलेला हा शब्द : आर्त. शिवाय आपण म्हणतो की तुकाराम महाराजांनी आपल्या सबंध काव्यात भक्तीची जी "आर्तता" दाखविली आहे ते वर्णन करणारा हा शब्द : आर्त. आता शेवटचा "र्त" कायम ठेवीत अगोदरचा "आ" क्रमाक्रमाने क,ख,ग,घ,....असा बदलत बघा काय शब्द मिळतात ते ! मला बर्याच प्रयत्नांती मिळाले : कीर्त ; तूर्त ; अमूर्त ; यथार्त ; शर्त ; ....बस्स. आता तुकाराम महाराजांनी ह्या "आर्त"शी कोणती यमके जुळविलीत ती पहा : पदार्थ ; समर्थ ; सर्वत्र ; मात्र ; आर्त ; आर्तभूत ; पात्र ; गीत ; त्वरित ; मात. एक दोन अभंग पहा ज्यात हे शब्द आर्तशी यमक म्हणून जुळवलेले आहेत . जसे : "पुरवी मनोरथ । अंतरीचे आर्त । धायेवरि गीत । गाईं तुझे ॥" ( ३८८८, देहू प्रत ) . "तुका म्हणे ऐसे । अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित । नारायणा ॥" ( ३८९६, देहू प्रत ) . आर्त हा शब्द यमक जुळवायला असा कठिण जातोय हे पाहून मग एखाद्या हुशार संपादकासारखे तुकाराम महाराज आर्त अशा ठिकाणी दुसर्या शब्दाने जोडुन घेतात की तिथे मग तिथे दुसर्या जोडलेल्या शब्दाला यमक जुळवावे लागते, आर्तला नाही. जसे: "नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटीं ॥ "( १६५३ देहू प्रत ); किंवा "आर्तभूत माझा । जीव जयांसाठी । त्यांच्या जाल्या भेटी । पायांसवे ॥"( १९५८, देहू प्रत ). तर यमक जुळवणे हे काही तसे यांत्रिक काम नाही. प्रतिभेची परिक्षा घेणारेच ते असते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा