गुरुवार, ७ मार्च, २०१३

यमक-भक्ताचे विभक्त यमक !

यमक-भक्ताचे विभक्त यमक
---------------------------------
मार्जोरी बोल्टन ने यमकांचा अजून एक प्रकार सांगितलाय. अपूर्ण यमक किंवा विभक्त यमक. तुकाराम महाराजांच्या बर्‍याच अभंगात हे यमक दिसून येते. इथे अगदी कमी कमी अक्षरांचे चरण असणे ही अभंगाची रचना अथवा घाट अशा अपूर्ण यमकांसाठी जबाबदार असावी हे सहजी लक्षात येते. विशेषत: शेवटच्या चरणात चारच अक्षरे योजावयाची असल्याने तिसर्‍या चरणाचे शेवटचे दोन अक्षरी यमक व चौथ्या चरणाची चार अक्षरे असे मिळून एक सहा अक्षरी शब्द दिला तर सर्वच साधल्या जाते. तिसर्‍या चरणाचे यमक व चौथ्या चरणाचे चार शब्द. फक्त म्हणताना यमकानंतर थोडेसे थांबले की झाले. उदाहरणार्थ : "मृत्युलोकी आम्हा । आवडती परि । नाही एका हरिनामाविण ॥ ( २२४ जोग प्रत, हरि हे परि चे यमक आहे हे हरि-नामाविण असे फोडले तर लक्षात येते.)" ; "व्यभिचार माझा । पडिला ठाऊका । न सर ती लोकांमाजी आले ॥ ( १० देहू प्रत. इथे ठाऊका ला यमक जुळते लोकां, पण पूर्ण शब्द लोकांमाजी असा असल्याने तो यमकासाठी तोडलेला आहे. )." ; "तुका म्हणे येणे । जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायीं ॥ ( १४, देहू प्रत, इथेही अनंताचिये पैकी अनंता वर यमक जुळवलेले आहे. )" ; "याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥ ( १६ देहू प्रत, इथे सहा अक्षरांचा चरण केला तर सांडि व येले तोडावे लागते व परपुरुषाशी मधल्या पर शी भरतार शी यमक होते, ) "; "तुका म्हणे जालो । उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥ ( १९ देहू प्रत, इथेही गोवळ्यासवे तोडून मोकळ्या शी यमक जुळते.) " ; "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ( २७३ देहू प्रत, इथे धीराविण तोडून धीरा व हिरा ही यमक जोडी चांगली जमते.)" ; "खासेमध्ये धन पोटासी बंधन। नेणे ऐसा दानधर्म काही ॥ ( ४५३ देहू प्रत, इथे दानधर्म तोडून दान यमक बनते बंधन शी .)"; "तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ती ॥ ( ७९१, देहू प्रत, इथे विष्णु व शिवा वेगळे केल्यावर वाचुनि हे विष्णु ला यमक जुळते तर विष्णुशिवा ला देवा हे यमक जुळते. )" ; "जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥ ( ३६९३, देहू प्रत, इथे लोकांसारिखा तोडून तुका ला लोकां चे यमक बनते." ; "आता परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥ ( ४१२०, देहू प्रत, इथे लोकांवेगळा तोडावे लागते.) ". उस्फूर्त प्रतिभेशी जी रोमांचकारी नाळ जोडलेली असते तिला जरा ही धक्का न लावता इथे अपूर्ण अथवा अर्ध-यमकाची ही कलाकुसर तुकाराम महाराजांच्या कवित्वाची रोख पावतीच आपल्याला देते. शिवाय तुकाराम महाराज लिखित कविता करीत असत हा कयासही इथे संभवनीय़ ठरतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा