मंगळवार, १२ मार्च, २०१३

तुकारामाचे अभंग-बिभंग !


तुकारामाचे अभंग-बिभंग !
ध्वनीच्या सारखेपणामुळे जसा यमक हा शब्दालंकार घडतो व तो तुकाराम महाराज आपल्या पद्यरचनेत यथेच्छ वापरतात, तसाच ध्वनीच्या सारख्या व पुनरावृत्तीत होणार्‍या उच्चारामुळे निर्माण होणारा एक खासा "लोकोच्चार" तुकाराम महाराज मुबलक प्रमाणात वापरतात. ही एक खाशी लकब असून विशिष्ट प्रांतीयपण हिला असते. जसे: पंजाबी लोक द्विरुक्ती करीत एखादा शब्द वापरतात. जसे: शादी-वादी ; खाना-पीना ; दारू-शारू ; रोना-धोना ; वगैरे.  मूळ क्रियेच्या शब्दाला यमक देत अशा जोड्या बनवण्यात पंजाबी लोक माहिर-फाहिर असतात. नेहमीच्या बोलण्यातल्या ह्या ढबीला एक प्रकारचे लोककलेचे रूपच मिळते. द्विरुक्ती मुळे मुद्दा ठसतो, उच्चार साधर्म्यामुळे लक्ष वेधल्या जाते, नाद-माधुर्य येते, तर नेहमीच्या वापरातल्या ह्या लकबीमुळे काव्याला संवादमयता लाभते. त्याचबरोबर हे शब्द मूळ आवाजाचेच वर्णन करणारे वाटतात. ना.गो.कालेलकर "ध्वनिविचार" ह्या पुस्तकात अशा शब्दांना ध्वन्यनुकारी शब्द म्हणतात ( इंग्रजीत ओनोमाटोपिया ) . शब्दांनी व्यक्त करण्याच्या कल्पनेला साह्यभूत असे ध्वनी अशा शब्दात वापरलेले असतात. उदाहरणार्थ : पंख; फडत्कार, मासा, कोकिळ ( इंग्रजीतला कक्कू ), कावळा, चिमणी, कावकाव , चिवचिव वगैरे. तसेच नुसते आनंद म्हटल्याने जो बोध होतो तो आनंदी-आनंद या द्विरुक्तीने अधिक परिणामकारक बनतो. अशी उदाहरणे तुकाराम महाराजांच्या गाथेत मुबलक प्रमाणात दिसतात व ते आपल्या वेगळेपणाने आपले लक्ष वेधून घेतात. जसे : "तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥" ; "सोंवळ्या-ओवळ्या  राहिलो निराळा । पासूनि सकळां अवघ्या दुरीं ॥" ; "तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदु:ख जीव भोग पावे ॥" ; "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ "; "मनाच्या तळमळे । चंदने ही अंग पोळे ॥"; "होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥"; "लये लये लखोटा । मूळबंदी कासोटा ॥"; "बहु केली वणवण । पायपीटी जाला सीण ॥ "; "तुका म्हणे येर दगडाची पेवें । खळखळ अवघे मूळ तेथे ॥"; "जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥"; "नानामृत कल्लोळ । वृंदे कोंदली सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥"; "जनकाची नंदीनी दु:खे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥"; "मनीं धृढ धरि विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणिवेस रे ॥ "; "जे का रंजले-गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । "; "बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अंगी कांटीवरी मारविले ॥"; "पावलो पावलो । देवा पावलो रे ॥"; "भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट । चाले झडझडा उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥": ...वगैरे. ( विस्तारभयापोटी चरण न उद्‌धृत करता नुसते असे लोकोच्चारी शब्द वानगीदाखल आता देत आहे. ते असे : येणे-जाणे ; परता-परता ; सासू-सून ; काज-काम ; धांवति-धांवति ; बहुती बहू : बोभाटा; बाप-माय ; जाणीव-नागवण ; जाणीव-नेणीव; मोलाची महिमा ; फजीती फुका ; प्रवृत्ती-निवृत्ती; धांगडा-धिंगा ; बोध-बिरडे ; पाहे-बाहे ; ठायी ठायी ; जन धन तन ; ऋद्धि-सिद्धि ; शुभाशुभ ; हर्षामर्ष ; जीव-शीव ; कर्म-अकर्म ; पाटी-पोटीं ; थोडें-फार ; अंत-पार ; नव्हे नव्हे ; बहु थोडे ; ठकावला ठायी ; लाभ हानी ; देखीचा दिमाख ; जीवाचे जीवन ; वेळ-अवेळ ; भीड-भार ; दान-धर्म-शीळ ; शिणले-भागले ; तान-भूक : घात-पात ; रानी-वनी ; घडी घडी ; पडपडताळा ; क्षराक्षरावेगळा ; ठावा ठाव ; दुमदुमले ; खेळीमेळी ; नटनाट्य ; कर्मधर्म ; जैसा तैसा ; लीनदीन ; जें जें तें तें ; जप तप अनुष्ठान ; बोलोंचालों ; तुकी तुकला ; काढाकाढी ; पाठी-पोट ; कोंडा-कणी ; वटवट ; जन वन ; सडा संमार्जन ; देणे घेणे ; कर कर ; बाळ बडिवार ; आशा पाश ; भेदा भेद ; टाळ घोळ ; उभा उभी ; रात्रंदिस ; दिवस रजनी ; हाड हाडी ; ताळा वाळा ; चाळवा चाळवी ; तोंवरी तोंवरी ; रूप नाव ; आकार विकार ; निर्गुण सगुण ; चरफडे चरफड ; धिंदा धिंद ; गाठ पडली ठका ठका ; टाळाटाळी ; साटो वाटी ; यावा गांवा ; खण खणां ; भेदा भेद ताळा ; तडा तोडी ; गदारोळ ; फाडा फाडी ; बुर बुर ; घस घस ; घडघडाट ; थू थू ; डग मगी ; झाडा पाडा ; ठेला ठेली ; वादा वादी ; बळ जोडा ; कौडी कौडी साठी ; सोईरे-धाईरे ; ठेवा ठेवी ; बुट बुट ; भव भय ; आहाचेच आहाच ; भड उभंड ; आम्ही तुम्ही ; हीनवर बिजवर ; ...वगैरे. आवाजाचे उच्चाराचे कौतुक असणारे हे शब्द बोली भाषेत प्रामुख्याने वापरले जातात. ते काव्यात आणल्याने काव्याला साक्षात बोलीचे, संवादाचे  स्तर आपोआप विणल्या जातात व लौकिक अर्थाने काव्य वाचणार्‍याला ते "आपले" वाटू लागते

1 टिप्पणी: