सध्याच्या करोनाच्या
काळात जिकडे तिकडे रोगच रोग दिसले तर कोणाला नवल वाटू नये. तुकाराम महाराजांच्या
काळात म्हणजे साडेचारशे वर्षापूर्वी तर अनेक रोग नांदत असणार. त्यांचे संदर्भ
गाथेत कसे मिळतात ते पाहू.
म्हातारपणी लोक आपापल्या रोगांचे कौतुक करीत असतात, हे आपण पाहतोच. जणु काही,
हे रोग त्यांना आप्तस्वकीयच वाटतात. असाच रोगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण तुकाराम
महाराज एका अभंगात बहारदार विनोद-बुद्धी वापरीत असा घेतात :
पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावे आप्तवर्ग ॥1॥
रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥2॥
तैसें शरीराचें नातें ।
तुका ह्मणे सर्व आप्तें ॥3॥
अध्यात्मात भवताप म्हणजे संसाराचा
ताप , तसेच सर्व रोगात ताप येणे, ज्वर हे फार सामान्य लक्षण आहे. आज जसे एकाला करोनाची लागण झाली व तिथेच असलेल्या दुसऱ्याला
नाही झाली की आपण जसे म्हणतो की एकेकाचे नशीब असते, तसेच तुकाराम महाराजांच्या
काळात कोणाला ताप आला तर ते त्याचे नशीब किंवा ते संचित असे वाटले असेल तर नवल
नाही. म्हणूनच एका अभंगात म्हटले आहे, ज्याला ताप आला आहे त्याला काही गोड लागत
नाही, अगदी साखरही नाही. तसेच अभक्ष्य ( माती ) भक्षण केल्याने ताप आला तरी दुसरे
तसेच करतात, ह्याला त्यांचे संचितच म्हणावे लागेल. :
अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥१॥
एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥
चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥२॥
तुका म्हणे नसे संचित हें
बरें । तयासि दुसरें काय करी ॥३॥
ताप हे त्या काळी तीन
प्रकारचे समजत आणि त्यांना तापत्रय म्हणत. १) आध्यात्मिक ताप : ह्यात देह, इंद्रिये आणि
प्राण यांच्या संयोगाने माणूस जेव्हा दुःख भोगतो, त्रास सहन करतो
तेव्हा त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात, अशी व्याख्या करून त्या
तापाची लक्षणे पुढे सांगितली आहेत. त्यातून शरीरात उद्भवणाऱ्या विविध व्याधी
सांगितल्या आहेत. खरूज, नायटा, खवडे, नारू, गोवर, देवी, काखमांजरी, काळपुळी, मूळव्याध
इत्यादी. त्यानंतर शरीर, पाठ, पोट, कंबर, गळा, तोंड, दात, कान, शरीरातील हाडे, थंडी वाजून दात
वाजणे, हुडहुडी भरणे यासंबंधीच्या अनेक व्याधींचा उल्लेख करतात. तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, आंधळेपण, मुका, बहिरा, भ्रमिष्ट, वेडसर, पांगळा, तिरळा, अतिलठ्ठ, तोतरा, बोबडा वगैरे अशा
अनेक यातनांचा ह्यात समावेश आहे.हे सारे ‘आध्यात्मिक ताप’ आहेत.
२) आधिभौतिक ताप : आध्यात्मिक
तापाच्या यातना देहाच्या आतून आलेल्या असतात. आता बाहेरच्या वातावरणाच्या आघाताने
जी दुःखे निर्माण होतात, त्यांचे वर्णन ‘आधिभौतिक ताप’ या समासात येते.
ठेच लागणे, पायात काटे मोडणे, अंगाची आग आग करणाऱ्या आग्या वनस्पतीचा स्पर्श
होणे, अंगाला खाज सुटणारी खाजकुहिरी वनस्पती अंगाला लागणे, गांधील माशा
चावणे इत्यादींमधून जे दुःख होते ते या तापाचे लक्षण. या झाल्या शेतातील घटना. आता
बाहेरील घटना पाहा. साप, विंचू चावणे, वाघ, लांडगे, रानडुक्कर, रानगाई, रानबैल, रानहत्ती यांनी
केलेला हल्ला किंवा त्यांची भीती. तसेच मगरी, सुसरी या जलचर
प्राण्यांची भीती, या जंगलातील गोष्टींचा उल्लेख येतो. त्यानंतर
शत्रूंनी हल्ला करून पळवून नेलेल्या माणसांचे हाल वर्णन केले आहेत. रोग बरा
होण्यासाठी केलेले अघोरी उपाय, आगीमुळे झालेले नुकसान, शेतातील धान्य, गवताच्या गंजी, ऊस इत्यादी
उत्पादने आगीने जळून खाक होणे, ही आग लागली असो वा कोणी लावली असो. होणारे
दुःख काही कमी नसते. हा ‘आधिभौतिक ताप‘ होय. तसेच ग्रहांची दशा, चंद्राचे अशुभ
भ्रमण, अपशकुन, कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे इ. गोष्टींपासून होणारा त्रास आधिभौतिक. राजाकडून केल्या जाणाऱ्या
शिक्षांचाही यात समावेश आहे. ३) ‘आधिदैविक ताप’ : माणूस शक्ती, पैसा, सत्ता यांच्या
जोरावर अनेक बरीवाईट कर्मे करीत असतो. माणसाने केलेल्या कुकर्माची फळे या जन्मी
किंवा मृत्यूनंतरही भोगावी लागतात. जीवाची त्यातून सुटका नसते. ही ‘आधिदैविक तापा’मागील भूमिका
आहे. अंगबळाच्या अथवा द्रव्यबळाच्या किंवा सत्तेच्या बळावर नीतिनियम धुडकावून
दुष्कर्मे करीत असतो. उन्मत्तपणे जीवांचा संहार करणे त्याला आवडते. तो समाजविघातक
कामे करीत असतो. अशा माणसाला मेल्यावर यमयातना भोगाव्या लागतात. त्या यातना म्हणजे
‘आधिदैविक ताप’ होय.
अशा तापत्रयासंबंधी तुकाराम महाराज म्हणतात :
१)
होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय
ताप निवविले ॥ ;
२) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥
म्हणउनी
शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥;
३) ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों। भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥ स्नान हें करितां
त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥2॥
जसे करोना मध्ये सगळ्यात जास्त धोका वृद्धांना असतो तसेच कुठल्याही रोगांसाठी
म्हातार्यांना वेठीस धरतात. म्हातार्यांचे रोग, पीडा, व त्यांचे शारीर वर्णन
तुकाराम महाराज फारच दाहक असे करतात. ते म्हणतात :
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥1॥
नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥2॥
शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥3॥
तुका ह्मणे अजूनि तरी ।
स्मरें श्रीहरी सोडवील ॥4॥
हे कमी म्हणून की काय अजून एके ठिकाणी ते असेच म्हणतात :
वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥1॥
आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥
दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥2॥
हात पाय राहिलें कान। नेत्रा पाझर हाले मान ॥3॥
अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥4॥
आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥5॥
लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥6॥
तुका ह्मणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥7॥
आजकाल काही ठिकाणी लोकांना त्रास झाला की ते डॉक्टर लोकांवर हल्ला करतात
तेव्हा आपण त्यांना सांगतो की जे करोना-योद्धा आहेत त्यांना मारू नका, कारण तेच
आपल्याला करोनापासून सोडवीत आहेत. अशाच अर्थाच्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणत
आहेत की रोग हे काही वैद्याच्या अंगी नसतात, ते त्याने आपल्याला दिलेले नसतात, तर
तो जगावर उपकारच करीत असतो :
अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥
जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
करोना हा विषाणू नवीनच असल्याने
त्यावर अजून निश्चित असे काही औषध आलेले नाही. पण लोक आणि डॉक्टर काहीबाही औषधे
देत घेत राहतात. तुकारामाच्या काळात औषधे तरी कशी असतील ह्याचा अंदाज ह्या एका
अभंगातून येतो. कडू निंब हेच औषध :
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥
पन्नास साठ वर्षांपासून टीबी किंवा क्षय रोग हा खूपच धुमाकूळ घालून आहे. तसाच
तो तुकाराम महाराजांच्या काळातही होता असे काही अभंगावरून ताडता येते. जसे :
पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥;
क्षयरोगी ह्मणे परता । सर रोगिया तूं आतां ॥
हा क्षयरोग जास्त प्रमाणात स्त्रियांशी संग केल्याने होतो असा त्याकाळी समज
असावा, कारण एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात :
सेज बाज विलास भोग । करी
कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥
एका रोग्याने दुसऱ्यास हसू नये, त्याचा राग करू नये असा सल्ला देत असताना त्या
काळातले जे सामान्य रोग होते त्याची जंत्रीच तुकाराम महाराज एके ठिकाणी देत आहेत.
ते म्हणतात, ज्याच्या अंगाला खरूज आहे त्याने मुळव्याध झालेल्याला हसू नये, सोसाने
श्रम करणाऱ्यास आळशी माणसाने हसू नये ( आळस हा एक रोगच ), ज्याच्या अंगावर कोडाचे
डाग आहेत त्याला पाहून क्षयरोग्याने तू बाजूला हो असे म्हणू नये, ज्याच्या दोन्ही
डोळ्यात वडस वाढलेले आहेत त्याने दुसऱ्याला चकणा वा तिरळा म्हणू नये,प्रत्येकाने
आपले आपण बरे व्हावे, शुद्ध व्हावे, दुसऱ्याला दोष देऊ नये :
ते चि करीं मात । जेणें होइल तुझें
हित ॥1॥
काय बडबड अमित । सुख जिव्हारीं
सिणविसी ॥ध्रु.॥
जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन
हांसे खरजुला ॥2॥
आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी
॥3॥
क्षयरोगी ह्मणे परता । सर रोगिया तूं
आतां ॥4॥
वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें
कोंचें ह्मणे ॥5॥
तुका ह्मणे लागों पायां । शुद्ध करा
आपणियां ॥6॥
नुकतेच सरकारने दारूंची
दुकाने उघडली तेव्हा मद्यपि लोकांनी त्यासमोर प्रचंड गर्दी केली व मग सरकारला ही
दुकाने काही काळ बंद करावी लागली. त्यावेळी असे आश्चर्य वाटले की किती बेवडे लोक
आहेत आपल्या आजूबाजूला. पण गाथा वाचताना अजूनही आश्चर्य वाटते की हे लोक किती
पूर्वापार चालत आले आहेत. मद्यपानाची आवड हा एक रोगाचाच प्रकार मानत तुकाराम महाराज
एका अभंगात म्हणत आहेत की, मद्यपानाच्या आवडी पायी ह्यांना नवनीत सुद्धा गोड लागत
नाही. ह्याच अभंगात कावीळ झालेल्याला चंद्र सुद्धा पिवळा दिसतो असे म्हटले आहे.
ह्याचा अर्थ कावीळ सुद्धा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. कावीळ ऐवजी कामिनी
हा अप्रतीम काव्यमय शब्द त्याकाळी रूढ होता हे नव्यानेच कळते आहे. :
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥2॥
तुका ह्मणे मद्यपानाची
आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥3॥
आजकाल आपण डिप्रेशन, विस्मरण, आदि मानस-विकारांचे बरेच महत्व जाणतो व त्यावर
योग्य उपचार करतो. पण पूर्वी हे सगळे “वेड ” ह्या एकाच शब्दाने चितारले जायचे.
त्यातही कोणी रागाने वागला तर तेही जर तात्पुरता आजारच समजले तर तशा प्रकाराचेही
एक वर्णन एके ठिकाणी पाहायला मिळते. इथे एक वेडा एका तेलणीशी रुसला आहे. आणि कालवण
म्हणून तेल कसे मागायचे ह्या भीडेपायी कोरडेच खातो आहे. कोणी एक आचरट स्त्री
दुसरीस अपशकून म्हणून आपला नवरा जिवंत असताना डोके भादरून घेते. एक स्त्री
रागारागाने घर तसेच टाकून जाते व मग घरात कुत्री येऊन घाण करतात. पिसवा झाल्या
म्हणून कोणी आपले घरच जाळून घेतो. तर एक वेडी लुगड्यात फार उवा झाल्या म्हणून लुगडे
फेडते व जग तिला नागडे बघते. अशा वेडाच्या नाना तऱ्हा इथे तुकाराम महाराज अशा
दाखवीत आहेत:
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वांच्या रागें
। फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥
आजही पाइल्स किंवा मूळव्याध हा रोग असा अवघड जागीचा आहे की लोक त्याला
लाजतातच. आणि पूर्वीही ह्या रोगाला असेच अवघडलेपण होते हे तुकाराम महाराजांच्या
खालील अभंगावरून दिसते. ह्यात पूर्वी “गांड ” हा शब्द अगदी रूढ होता हे फारच गमतीचे
आहे. इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत की ( मोडसी ) मूळव्याध झालेल्याने उगाच देखीचा
दिमाख न बाळगता उपचार करून घ्यावेत.
नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥1॥
देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥
आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥2॥
तुका ह्मणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥3॥
कोड किंवा पंडू रोग हा सुद्धा किती जुना रोग आहे हे गाथेत त्याचा संदर्भ येतो
तेव्हा जाणवते. आजही कोड असलेल्या मुलींची लग्ने मोठ्या
मुष्किलीने होतात. पण आपण
उघडपणे दाखवत नाही पण जरा कसेसेच वाटते हे खरे. तुकाराम महाराजांचे सगळेच रोखठोक
असते. ते चक्क म्हणतात की कोड असलेल्यांच्या जवळ जाताना किळस येते.
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारी मन ॥1॥
त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाणे ॥ध्रु.॥
प्रेतदेह गौरविलें। तैसें विटंबवाणें जालें ॥2॥
तुका ह्मणे खाणें विष्ठा
। तैशा देहबुद्धिचेष्टा ||
आज करोनापायी आपण जसे हतबल झालो आहोत व दिग्मूढ झालो आहोत तशीच काहीशी
परिस्थिती तुकाराम महाराजांची हे रोग का होतात व ते न होण्यासाठी काय करावे हे न
कळण्याने झालेली दिसते ती ह्या अभंगात :
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥1॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥
पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥
आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥
तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4॥
--------------------