रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

काळाचा वळसा

 काळाचा वळसा

आजकाल भौतिक शास्त्रात काळ ही चौथी मिति धरतात. लांबी, रुंदी, उंची ह्या तीन मिति आपण सहज समजू शकतो, पण काळ काही दिसत नाही. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तर ते लोक दहा अकरा मिति आहेत असे सांगतात. ते तर अजिबातच कळत नाही. पृथ्वीच्या स्वत:भोवती घुमण्याने एका फेरीत एक चोवीस तासांचा दिवस होतो व मग त्याचे लहान मोठे भाग करीत आपण काळ मोजतो खरा, पण तो कळत नाही का वळत नाही. बालपण किती लवकर संपले असे वाटते तर तेव्हढ्याच वर्षांचे म्हातारपण सरता सरत नाही. असा कसा हा काळ ? 

तुकाराम महाराजांना काळाचा हा वळसा चांगला माहीत आहे. चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस आले की त्या काळाचा तो वळसा त्यांना सोसावा लागलेला असल्याने ते म्हणत आहेत की किती या काळाचा सोसावा वोळसा ? आणि हे काळाचे वळणे अगदी सारखे पाठोपाठ लागलेले आहे. 

जो जन्मतो त्याला मरण आहेच. तसेच त्याला लगेच मेल्यानंतर कुठ्ल्याना कुठल्या जीवजातीत जन्मही घ्यावा लागतो अशीही एक समजूत आहे. आणि हे अशा चौर्यांशी लक्ष योनीत जन्म घ्यावा लागतो. हे चक्र भेदायचे असेल तर भक्तिमार्गाचे पुरस्कर्ते असल्याने तुकाराम महाराज म्हणताहेत की पांडुरंगाला शरण या. 

जन्म मरणाच्या ह्या रहाट-गाडग्यात आपण एक केवळ गाडगे आहोत आणि आपली सुटका तेव्हाच होइल जेव्हा हे गाडगे फुटेल.

------------------  

किती या काळाचा सोसावा वोळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥1॥

लक्ष चौर्यांशीची †करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥

उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेंचि तें ॥2॥

तुका म्हणे  माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥3॥

-------------------- 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा