सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१
भक्त : अडचणीचे कोपरे
———————————
तुकाराम महाराजांचे अभंग मोठे मनोज्ञ व सार्वकालिक असतात. ते फक्त त्यांच्या काळातच लागू होत होते असे नसून ते सर्व काळात लागू पडतात असे जाणवते.
भक्तांसंबंधी एका अभंगात निरूपण करतांना ते भक्तांना “ अडचणीचे कोपरे “ म्हणतात. काय अफलातून विचार आहे ! नाही तरी , आजकाल आपण पाहतो की भक्त हे कोपऱ्या कोपऱ्याने तिष्ठत असतात व अडचण करून असतात.
भक्तांच्या दाटीने गुरूला जी अडचण होते ती मोठ्या मार्मिकतेने “ अडचण “ हा शब्द ध्वनित करतो. अडचण ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहिली तर अंतर + चण् अशी देतात व चण हे stature / frame ह्या अर्थाने असते. फ्रेमला जसे चार कोन किंवा कोपरे असतात तसे भक्त म्हणजे गुरू/ परमेश्वराचे चार कोपरेच जणु.
परत हे चार कोपरे चपखल ह्यासाठी की भक्तांचे जे चार प्रकार सांगितले आहेत ( आर्त ( रंजलेला-गांजलेला), अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी ) त्या चार कोनांवर हा अभंग उभा ठाकलेला आहे.
अभंग :
तुझ्या रूपे माझी काया । भरों द्यावी पंढरीराया ।
दर्पणीची छाया । एका रूपें भिन्नत्वें ।।
सुख पडिलें सांठवणे । सत्ता वेंचें शनें शनें । ( शनै शनै )
अडचणीचे कोन । चारी मार्ग उगवले ।।
वसो डोळ्यांची बाहुली । कवळें भिन्न छाया आली ।
कृष्णांजन चाली । नव्हे परती माघारी ।।
जीव ठसावला शिवें । मना आले तेथें जावे ।
फांटा पडिला नांवें । तुका म्हणे खंडले ।।
( जोग प्रत- अर्थ : हे पंढरीराया , तुझ्या स्वरूपाने माझे ह्रदय भरून जाऊ दे. आरशामध्ये बिंबाची छाया जरी दिसली तरी तो भेद एकरूपानेच आहे. तुझ्या ऐक्याचे सुख संचयास शिलकी पडले आहे. हळुहळु तुझ्या सत्तेने त्याचा वेंच होत आहे. अडचणीचे कोपरे ( भक्तांचे चार प्रकार : आर्त , जिज्ञासु , अर्थार्थी, ज्ञानी ) नाहीसे केले. डोळ्यातील बाहुली असूनही काविळीचे दोषाने आरशातील प्रतिबिंब भिन्न, पिवळे भासते. कृष्णांजनाचे योगाने परत माघारी दृष्टी चाल घेत नाही. डोळ्यात कृष्णांजन घालताच ती पुन: भेद आणि पिवळेपणा पाहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जीवात शिवाचा बोध ठसला गेला. आता मनास जिकडे जावयाचे वाटेल तिकडे जावे. त्याला विधींचे बंधन राहात नाही. द्वैताला फाटा दिला जातो. आता त्याला फाटा फुटला हे म्हणणे नाहीसे झाले. ).
परमेश्वराची भक्ति करताना रंजलेले-गांजलेले ( आर्त ) न होता , त्यावर अर्थार्जन न करता ( अर्थार्थी ) , त्याचे सर्वार्थाने शोध घेऊन ( जिज्ञासु ) , ज्ञानी व्हावे हाच श्रेष्ठ मार्ग भक्तीचा हेच खरे !
—————-
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा