सोमवार, २ जुलै, २०१८

तुकाराम टाइम्स 
------------------------ 
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख ---१ 
--------- 
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१ --- धुळे येथे लोकांनी पाच जणांना मुले पळवण्याच्या संशयावरून ठेचले :
------------------------------------------------
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धी तेणें न्यायें ॥
ह्मणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥
विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥
तुका ह्मणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥
( जसा उगवलेला मोड पाण्यावाचून वाळला म्हणजे तो निष्फळ होतो, त्याप्रमाणे ज्याच्या अंगी धीर नाही त्याची बुद्धी व्यर्थ समजावी. ह्याकरिता संतावाचून दुसऱ्या कोणाचा संग करू नये, कारण त्या संगतीने चित्त मळकट होऊन त्या द्वाराने आपले वाईट होते. सर्पाचे मुखात विष असते, त्याकरिता लोक त्यास भितात. हे प्रकार तुम्हा सर्वांस माहीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जे कच्चे असते ते वाईट ( कु ) लाकुड असते म्हणून ज्याच्यामध्ये जो अवगुण असतो तो त्यास बाधक होतो. ).
----------
धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥
कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥
आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥
तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥
( ज्या दुर्जनाला भूतदया नाही त्याचा धिक्कार असो. त्याला त्याची माय व्यर्थच प्रसवली. त्या चांडाळाचे ह्र्दय कठीण असून त्याला दुसऱ्याचे काही दुःख नसते. आपला जसा प्राण आहे तसाच तो सगळ्या लोकांनाही आहे असा विवेक न करणारा तो पशुच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो सुखाने इतरांचे गले कापतो तो आपली वेळ आली की रडतो. ).
-------
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइल न कळे काय ॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ||
भल्या बुऱ्या मारी । होतां कोणी न निवारी ॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥
तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥
( ज्या गावातल्या लोकांचे एकमेकाशी जमत नाही, चांगल्याने त्या ठिकाणी राहू नये, कारण एका क्षणात तेथे काय होईल हे कळणार नाही. काही अन्यायाचे वर्तन न करता बळजबरीने तिथे शिक्षा करतात. ज्या गावातील लोकांची पुराणाचे ठिकाणी प्रीती नसून ठिकठिकाणी पंचाईती करीत बसतात. वाईट लोक चांगल्याला मारीत असताना त्यांचे कोणी निवारण करीत नाहीत. अविचारी लोकांच्या हाती अधिकार देऊन त्यांच्या हाताने प्रजेला बुडवितात. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या गावात राहण्यापेक्षा सुखाने पर्वताच्या दरीचे सेवन करणे हे चांगले.).
------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा