मंगळवार, १७ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १४      
----------------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१४ -------- शेती अगोदर माणूस भाकरी करायला शिकला म्हणे !
-------------
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥

भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥

योगियांच्या ध्याना न नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥

तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
--------------- 
इतिहास संशोधकांना म्हणे असे एक ठिकाण गवसले आहे की जिथे माणसाला शेती करण्याअगोदर भाकरी ( ब्रेड ) भाजणे जमले होते. ह्यावरून मानव जातीला भाकरीचे किती प्राधान्य होते हेच समजते. ह्यावर तुकाराम महाराजांनी माणसाने ज्याला देव ( हरि ) कल्पिले त्याच्याबद्दल एक मजेशीर विशेष टिपले आहे. तुकाराम महाराज इथे म्हणतात, हरि सर्व गोपाळांना गळ्यास गळा लावून भेटतो. जो मनोभावे त्याला भेटतो, त्याला तो आपले मनातले गुपितही सांगतो. जो एरव्ही मोठमोठ्या योग्यांनी तप केले तर त्यांच्या ध्यानातही येत नाही, तो हरि गोपाळांच्या भाकरी सलगीने मागून खातो. अगदी फुशारकी मारणाऱ्या “शहाण्या”पासून हरि दूर राहतो, पण भाव-भक्तीने मानणाऱ्या बोबड्या माणसाला हाका मारीत त्याच्याजवळ दास होऊन राहतो. जिथे देवच भाविकाकडे भाकरी मागत आहे तिथे तो शेती आधी भाकरी करायला/भाजायला  शिकला तर नवल नाही !
----------------------  

सोमवार, १६ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १३     
----------------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१३   -------- दूध आटणार ( दुधाचा संप )
-----------------
 रिद्धिसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥1॥
लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
पुसाल तरि आह्मां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥3॥
--------------- 
जणू काही सध्याची प्रजा ही संतांप्रमाणे उदास झाली आहे व म्हणून दारी कामधेनू सारख्या अखंड दूध देणाऱ्या गाई-म्हशी असूनही दूध आटणार आहे ! घरी लोड, पलंग आहेत पण नेसायला लंगोटी नाही. म्हणायला आम्ही स्वर्गात आहोत पण राहायचा ठावठिकाणा नाही. आहोत राजे पण कोणाचा सम्बन्ध नाही. अशी संतांसारखी उदासी यायला आता वेळ लागणार नाही !
---------------  

रविवार, १५ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १२    


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१२  -------- मुलाने सांभाळ नाही केला तर दिलेले घर मातापिता परत घेऊ शकतात असा हायकोर्टाचा निर्णय
------------
लेकरा आइतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥1॥
 त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
 भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥2॥
 आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥3॥
--------------------- 
( लहान लेकराला मातापित्यांचे आयते संरक्षण मिळते. पित्याने जे द्रव्य व गृहवस्त्रादिक मिळवून ठेविले असते, ते तो सर्व आपल्या मुलाला त्याच्या मोठेपणी दाखवितो, त्याच्या स्वाधीन करतो. त्याप्रमाणे अहो देवा,तुम्हाकडून आमचा प्रतिपाळ झाला आहे. आम्ही काळाला पाहिलेच नाही. बालकाला भूक लागल्याबरोबर जर स्तनपानाचा योग जवळच असेल तर पोट भरण्याकरिता निराळा उपाय करण्याची काही गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा प्रकारे पांडुरंगाला आळवून पलीकडील तीरावर उभा राहिलो. ते पाहून मला आश्रय द्यायला पांडुरंगाने उडी टाकली.---जोग प्रत )
--------------    


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ११    


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
११ -------- उरले फक्त ३०० खड्डे , वाटा बुझल्या !
---------------

ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥1॥
 भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥
 अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥2॥
 एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥3॥
 तुका ह्मणे वाट दावूनि सद्ग‍ुरू  । राहि हा दुरू पांडुरंग ॥4॥
( हे देवा, ह्या संसाररूपी अरण्यात तुजवाचून मला सर्व दिशा उजाड झाल्या आहेत, त्या मला भयंकर दिसतात आणि त्या ठिकाणी मला कोणी सखा आहे असे दिसत नाही. हे पांडुरंगा, अशा अरण्यामध्ये अनेक श्वापदांचा थाट ( कामक्रोधरूपी पशूंचा समुदाय ) पाहून मला भय वाटते, त्यामुळे मला धीर निघत नाही. पुढे मोठा ( अज्ञानरूपी ) अंधार पडल्यामुळे मला वाट चालवत नाही व माझ्या अंगास कांटे व खुंट ओरबाडतात. ह्या आडरानामध्ये अनेक मत-मतांतराच्या वाटा फुटल्या आहेत, तेथे मला कोणी सोबती नसून मी एकटा असल्यामुळे भय वाटून पुढे चालण्यास रिघाव होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा सद्गुरू पांडुरंग ह्याने मला पहिल्याने जीव-ब्रह्मैक्याची व  नामभक्तीची वाट दाखविली, पण आता तो दूर राहिला आहे.---जोग प्रत )
--------------- 




तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १०   


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१० --------- भाषेचा “नाद” खुळा ! ( निरनिराळ्या भाषा
लोक कसे शिकत आहेत त्यावर )
---------------
सांठविला  वाण । पैस घातला दुकान ॥1॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्धचि जवळी ॥ध्रु.॥
निवडिलें साचें । उत्तम-मध्यम-कनिष्ठाचें ॥2॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥3॥
( खरे तर हा अभंग सात्विक, राजस, तामस हे रस तुकारामाने दुकानात माल ठेवावा तसे ठेवले आहेत व जसा भाव मागाल तसा देऊ असे म्हणण्यासाठी आहे.). पण जगात निरनिराळ्या भाषाच जणू देवाने दुकानात विकण्यासाठी ठेवल्या आहेत व जसा तुमचा भाव असेल तशी भाषा देऊ असा चपखल अर्थ आज आपण त्यात काढू शकतो ! हाच तो  
“भाषेचा नाद-खुळा” !
किंवा
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥
तुका म्हणे आहें पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥
किंवा
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥1॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥2॥
तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥3॥
---------------------------

बुधवार, ११ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ९   


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
९  ---- नवीन मंत्रालय, “आनंद मंत्रालय” सुरू होणार !
-------------------
आनंदाचे डोहीं आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचें॥1॥
 काय सांगों झालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
 गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥2॥
 तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥3॥
( मी आनंदाचा, ब्रह्मानंदाचा, डोह झालो आहे, म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्या लाटा येतात, कारण आनंदाचे अंग आनंदच असते. मला जे काही सुख झाले ते काहीच्या बाहीच आहे ; त्याचे मी काय वर्णन करू ? कारण त्याच्या प्रीतीने ( प्रपंचाची पुढील हाव संपली. पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात, कारण त्या ठिकाणचा ( गर्भाचा ) स्वभाव तेथेच आईमध्ये प्रगट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे जो अनुभवाचा ठसा माझ्या अंत:करणात उमटला आहे तोच माझ्या वाणीवाटे प्रगट झाला. ---जोग प्रतीप्रमाणे ).
म्हणजे आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आल्याशिवाय त्यांच्याद्वारे आनंद प्रगट होणार नाही !
----------------       

सोमवार, ९ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ८  


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
८ ---- पावसाचा सर्वत्र कहर !
------------------- 
 देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥1॥
नव्हे मत गूढ उमान कांहीं । तूं आपआपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाटे पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥2॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥3॥
तुका ह्मणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥4॥
---------- 
( देव स्वरूपाच्या देवळातून मीपणाच्या घराला आल्यामुळे मायामय जळाने सर्व ब्रह्मांड व्यापले आहे. तो देव आपले देवळात गेल्यावर मायामय जळ नाहीसे होऊन सर्व कोरडेच आहे. हे बोलणे काही माझे मताचे नाही अथवा काही अवघड उमान ( उखाणा, कोडे ) मी घातले नाही ; तू आपल्या ठिकाणी आपलेपणाचा ( मी कोण आहे त्याचा ) विचार करून पहा. प्रथमत: मी देही आहे असा मायामय जळाचा थोडकासा पाट आला ; तोच जास्त वाढून सर्व नद्या व समुद्र भरून ब्रह्मांडभर व्यापला. वांझेचे घरी लेकरू तान्हे असून त्याने एक भिकबाळी मी आणि माझे ह्या दोन्ही कानात घातली हे सर्व म्हणणे जसे खोटे आहे ( तसे मी व माझे तुझे हे सर्व म्हणणे खोटे आहे ) तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या अंत:करणामध्ये मीपणादि सर्व विकार नसून मोकळी जागा आहे त्या अनुभवी लोकास-संतास ह्या रसाची गोडी माहीत आहे. --- जोग प्रतीप्रमाणे
माणसाच्या मीपणामुळे त्याला वाटत असते की आपण सगळे व्यवस्थित केले आहे पण असा पाऊस आल्यावरच हा भ्रमनिरास होतो !