बुधवार, १३ एप्रिल, २०११

तुकयाची नँनो 10

तुकयाची नॅनो---१०


१०) भाषासंपत्ती, भाषांतरे व अल्पाक्षरे :
शब्द-संपत्ती ( व्होकॅब्युलरी ) हा मोठा गहन विषय आहे. असे म्हणतात की पहिल्या इयत्ते पर्यंतच्या बालकाला साधारण २५००ते ५००० शब्द माहीत असतात व ते बालक दर वर्षाला ३००० हजार शब्द शिकत असते. किंवा दर दिवशी ८ शब्द ! कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: "आम्हा घरी धन । शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे । यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या । जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन । जनलोका ॥ तुका म्हणे पाहा । शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव । पूजा करू ॥" तुकाराम महाराजांच्या गाथेतली शब्दसंपत्ती आहे, ३०,००० शब्दांची. केव्हढी ही उपलब्धी !
इंग्रजी भाषेतला दहा लाखावा शब्द नुकताच शब्दकोशात आला. तो होता : "जय हो". त्या तुलनेत मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर ) आहेत फक्त: ६०,५५९ शब्द. इंग्रजी भाषेत शब्दकोशांवर प्रचंड संशोधनही झालेले आहे. फ्रान्सिस व कुसेरिया ह्यांनी किती शब्द भाषेतले किती व्याप सांभाळतात त्याचे कोष्टकच तयार केलेले आहे. जसे : १००० शब्द ७२ टक्के भाषा व्यापते, २००० शब्द ७९.७ टक्के भाषा व्यापते, ३००० शब्द--८४ टक्के, ४००० शब्द---८६.८ टक्के, ५००० शब्द--८८.७ टक्के, ६००० शब्द ८९.९ टक्के, तर १५,८५१ शब्द--९७.८ टक्के भाषा व्यापते. मायकेल वेस्ट ह्याने तर २००० सामान्यत: वापरल्या जाणारे शब्द असे निवडले आहेत की त्यातून ५० लाख शब्दांचा संभार उभा राहू शकतो.
इराक युद्धात सैन्याला वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने जे संगणक तयार केले होते त्यात तर सर्व इंग्रजी-इराकी भाषेतले व्यवहार सहजी पार पाडण्याची क्षमता केवळ १ हजार शब्दांमार्फत केलेली होती. इतके हे मूलगामी १ हजार शब्द होते. असेच प्रत्येक भाषेत जोरकस वापराचे साधारण असेच हजार शब्द असतात. व बहुदा ते सर्व असे छोटे छोटे शब्दच असतात. तेव्हा दुसर्‍या भाषेत भाषांतर करायचे असेल तर अल्पाक्षरी शब्दच वापरणे हे चांगले धोरण ठरते. व ते तुकारामाला ठाऊक होते हाच त्याचा मोठेपणा आहे ! ( क्रमश: )

गुरुवार, १७ मार्च, २०११

तुकाराम बीज

तुकाराम-बीज :
आज, २१ मार्च २०११. आज तुकाराम बीज आहे. आज २ ते ३ लाख वारकरी भाविक देहूला जमा होतील. इ.स.१६५० मध्ये ह्याच दिवशी तुकाराम महाराज, शेवटचे कीर्तन करताना सदेह वैकुंठाला गेले . त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ( दर वर्षी फाल्गुन मासातल्या कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला ) तुकाराम -बीज म्हणून साजरा करतात. ही प्रथा, गेल्या शंभरावर वर्षापासून, देहू येथे पाळल्या जाते. गोपाळपुर्‍यातील नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तन करताना तुकाराम महाराज अदृश्य झाले, त्याचे स्मरण म्हणून तुकाराम-बीजेच्या सोहळ्यात, भल्या पहाटे मुख्य देवळात विश्वस्तांच्या हस्ते पूजा होते ; तुकारामांच्या पादुका पालखीने वैकुंठगमनस्थानाकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, पुष्पवृष्टीत प्रस्थान करतात ; गोपाळपुरातल्या मंडपात गाथाचे सामुदायिक पठण होते, वैकुंठगमनाचे कीर्तन होते व नांदुरकीच्या झाडाची पाने सळसळू लागली की "तुकाराम-तुकाराम" असा जयघोष होतो ; फुले उधळल्या जातात व वारकर्‍यांचा "जय जय रामकृष्ण हरी" चा घोष दुमदुमू लागतो. हाच तो क्षण तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठी जाण्याचा ! हीच तुकाराम-बीज !
आषाढ महिन्यातल्या एकादशीला १० ते १२ लाख वारकरी , पायी पंढरपुरची वारी करतात. ह्यात डोक्यावर तुळसीवृंदावन घेतलेल्या स्त्रिया, वीणाधारी, टाळकरी, मृदुंगवाले वगैरे वारकरी असतात. वारकरी संप्रदायात भेदभाव मानत नाहीत, भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात, गुरू कडून तुळसीची माळ घालतात, दारू, अभक्ष्य भक्षण करीत नाहीत, एकादशीचा उपास करतात व नित्यनेमाने "हरिपाठ" व भजन करतात. वारी ज्या दिवसात असते त्यावेळी शेतीची कामे असतात. आजकाल आपण पाहतो की कुठल्याही सामाजिक कार्याला माणसांचा उत्साह व संख्या कमी पडते. अशात, आजही एवढया प्रचंड संख्येने वारकरी पायी चालत जातात व चालताना तुकारामाचे अभंग म्हणत जातात, हे पाहिले की ह्यांच्या भक्तिमार्गावरच्या विश्वासाचे व उत्साहाचे अपार कौतुक वाटते.
अशीच पावती आपल्याला ह्या भाविकांच्या तुकाराम-बीज साजरी करण्याला द्यावी लागेल. विज्ञानाच्या आधारे आपण पुष्पक विमान तुकाराम महाराजांना न्यायला आले होते, असे अजून तरी सिद्ध करू शकत नाही. एरव्ही पुण्यतिथीला तसबीरीसमोर किंवा समाधीच्या फरशीसमोर सरावाने माथा टेकवणार्‍या भाविकाला तुकाराम महाराजांचे असे अदृश्य होणे अदभुत व भांबावणारे खरेच. पण इथे विनोबा भावे एक दिशा दाखवतात. ते म्हणतात, भक्तियोगात चित्त ईश्वराने भरून जाते असा अनुभव येतो. तुकाराम महाराज भक्तिमार्गाचे कळसावर ह्यासाठी आहेत की त्यांचे नुसते चित्तच नाही तर त्यांची "कायाही हरिमय होते", अशा प्रकारची मुक्ती त्यांना साधलेली आहे. "गोविंद गोविंद मना लागलिया छंद । मग गोविंद ते काया ॥". अशी मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज ह्यावर म्हणून गेले आहेत की असे झाल्यावर "घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं, मुक्तां आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ॥". आयुष्यभर खस्ता खाताना ज्या विठठलभक्तीने तुकाराम महाराजांची काया कीर्तनात ब्रह्मरूप झाली, तिचाच पुन:प्रत्यय भाविकांना तुकाराम वैकुंठी जाताना येत असावा. ज्या ज्ञानदेवाने भक्तिमार्गाचा पाया रचला त्याच्या कळसावरून, मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज, वैकुंठाला जाताना वारकरी भाविकांना निरोप देत आहेत: "आम्ही जातों आमुच्या गावां । आमुचा रामराम घ्यावा ॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनिया जन्मतुटी ॥ आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पायां ॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥"

---------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

( १८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व) , मुंबई : ४०००७७ ( भ्र: ९३२४६८२७९२ ) )

--------------------------------------

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

ई-तुका
तुकयाची नॅनो---९

९) गेयता व अल्पाक्षरे :
गेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.
तामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे. तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात. त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते. ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

तुकयाची नँनो 1

ई-तुका
तुकयाची नॅनो

८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :
मराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले "स" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर " स"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.
आपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.
हे अल्पाक्षरी काव्य करणे "येरा गबाळ्याचे " काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. "दृश्यांतर" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते. ( क्रमश: )

-------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

तुकयाची नँनो 7

ई-तुका
तुकयाची नॅनो--७

७) "न, ना" चे सांगणे संदर्भातले महत्व:
मतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये "माळ" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून "न", "ना", "नाही" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला "सांगत" असतात.
प्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे ? त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर "सांगणे" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात "हे हे करू नको" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.
हे "सांगणे" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे "हिंदू" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे "सांगणे" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज "काय करू नका" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना "न", "ना", "नाही" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 6

तुकयाची नॅनो---६
६) "न, ना" ची श्रवणसुलभता :
म्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.
एरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.
ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्‍या वर्णांचा जसे : न, म,
म्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्‍या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s ! ). ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 5

तुक्याची नॅनो---५
"न, ना" द्वारे सुजाण पालकत्व :
तुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.
संसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात "जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी ॥ ". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की "नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥".
इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com