सोमवार, ९ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ८  


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
८ ---- पावसाचा सर्वत्र कहर !
------------------- 
 देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥1॥
नव्हे मत गूढ उमान कांहीं । तूं आपआपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाटे पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥2॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥3॥
तुका ह्मणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥4॥
---------- 
( देव स्वरूपाच्या देवळातून मीपणाच्या घराला आल्यामुळे मायामय जळाने सर्व ब्रह्मांड व्यापले आहे. तो देव आपले देवळात गेल्यावर मायामय जळ नाहीसे होऊन सर्व कोरडेच आहे. हे बोलणे काही माझे मताचे नाही अथवा काही अवघड उमान ( उखाणा, कोडे ) मी घातले नाही ; तू आपल्या ठिकाणी आपलेपणाचा ( मी कोण आहे त्याचा ) विचार करून पहा. प्रथमत: मी देही आहे असा मायामय जळाचा थोडकासा पाट आला ; तोच जास्त वाढून सर्व नद्या व समुद्र भरून ब्रह्मांडभर व्यापला. वांझेचे घरी लेकरू तान्हे असून त्याने एक भिकबाळी मी आणि माझे ह्या दोन्ही कानात घातली हे सर्व म्हणणे जसे खोटे आहे ( तसे मी व माझे तुझे हे सर्व म्हणणे खोटे आहे ) तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या अंत:करणामध्ये मीपणादि सर्व विकार नसून मोकळी जागा आहे त्या अनुभवी लोकास-संतास ह्या रसाची गोडी माहीत आहे. --- जोग प्रतीप्रमाणे
माणसाच्या मीपणामुळे त्याला वाटत असते की आपण सगळे व्यवस्थित केले आहे पण असा पाऊस आल्यावरच हा भ्रमनिरास होतो ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा